मिट्टी अत्तर : पहिल्या पावसाचा सुगंध देणारं अत्तर भारतात अनेक वर्षांपासून मिळतंय आणि आपल्याला पत्ताच नाही !!
"भाव अत्तराचे आज पार कोसळले ...
थेंब पावसाचे जेव्हा मातीत मिसळले...
पहिल्या पावसाच्या शुभेच्छा...."
एकावर्षी या शुभेच्छा संदेशाने धुमाकूळ घातला होता. अति झालं आणि हसू झालं असा तो प्रकार झाला असला तरी पहिल्या पावसात येणारा मातीचा गंध, त्याचा दरवळ किती वेडावणारा असतो हेच या संदेशातून दिसून येतं. हा मातीचा सुगंध तर सगळ्यांनीच अनुभवला असेल. सगळ्यांनाच आवडणारा आणि हवाहवासा वाटणारा. त्याला नावही आहे-पेत्रीचोर.
माती, मातीतली काही द्रव्यं आणि मातीतले जिवाणू यांपासून हा सुगंध तयार होतो. यातले जिवाणू हे या सुगंधाचे खरे उत्पादक. उन्हाळ्यात जेव्हा हे जिवाणू मरून जातात तेव्हा ते एक प्रकारचा जिओस्मिन नावाचा रासायनिक द्रव स्त्रवतात. आपलं मानवी नाक या द्रव्यासाठी अतिशय संवेदनशील असतं. परंतु पहिल्या पावसाचे थेंब जमिनीवर पडत नाहीत तोपर्यंत काही हे द्रव्य काही हवेत पसरत नाही. तर याच जिओस्मिन नावाच्या सुगंधित द्रव्याला कायमचं बाटलीबंद करून हवा तेव्हा त्याचा सुगंध घेता यावा यासाठी उत्तर प्रदेशातलं एक गाव मेहनत घेत आहे!
कनौज असं त्या गावाचं नाव. आग्रा आणि लखनऊच्या दरम्यान गंगेच्या किनारी हे गाव वसलेलं आहे. अत्तरांचा मोठा इतिहास लाभलेल्या या गावात सम्राट हर्षवर्धनच्या काळापासून अत्तरे तयार होतात. मुघल शासकांमध्ये कनौजची अत्तरे फार प्रसिद्ध होती. आज जवळपास तेराशे वर्षांच्या कालखंडानंतरही कनौजमधली पंधरा लाख लोकसंख्या पारंपरिक पद्धतीने अत्तर निर्मितीच्या कामात गुंतली आहे.
दररोज सकाळी कनौजमधले रहिवासी गुलाब, मोगरा, जाई जुई, कमळासारखी डझनभर फुले गोळा करतात आणि ती गावातल्या वेगवेगळ्या २०० अत्तर तयार करणाऱ्या डीस्टीलरीत पोचवतात. ही जमा झालेली फुले नंतर पाण्यात टाकून मोठ्या भांड्यात उकळवली जातात. या मोठ्या भांड्यांना डेग असं म्हटलं जातं. यानंतर तयार झालेली सुगंधित वाफ बांबूच्या पाइपांमधून चंदनाचं तेल असलेल्या एका भांड्यात साठवली जातात. चंदनाचं तेल या अत्तरांसाठी मुख्य घटक म्हणून वापरलं जातं. तयार झालेलं अत्तर मग उंटाच्या त्वचेपासून तयार केलेल्या बाटल्यांत भरलं जातं. या विशिष्ट प्रकारच्या बाटल्यांमधून अतिरिक्त पाण्याचं बाष्पीभवन होत व बाटल्यांत अत्तर साठून राहतं.
कनौजमधील सर्वात प्रसिद्ध अत्तर म्हणजे "मिट्टी अत्तर". इतर अत्तरांसारखच मिट्टी अत्तर तयार केलं जातं. फक्त त्यात फुलांऐवजी कोरड्या मातीच्या विटा वापरल्या जातात. या विटा डेगेत पाण्यासोबत ठेवल्या जातात आणि डेग मातीने सीलबंद केली जाते. जवळपास सहा ते सात तासांनंतर मातीच्या सुगंधाची वाफ तयार होऊन ती बाहेर येते.
काळाचे परिणाम कनौजच्या अत्तर उद्योगावरही दिसून येत आहेत. कृत्रिम अत्तरांमुळे तयार झालेल्या स्पर्धेत कनौजची पारंपरिक अत्तरे मागे पडत आहेत. पारंपरिक महागड्या अत्तरांपेक्षा तोच सुगंध अतिशय स्वस्त दरात कृत्रिम अत्तरांमध्ये मिळत असल्यामुळे ग्राहक त्याकडे वळत आहेत. उदाहरणार्थ, पारंपरिक पद्धतीने तयार केलेलं १०० मिली गुलाब अत्तर १००० रुपयांना मिळत असेल तर तेच अत्तर कृत्रिम पद्धतीने तयार केल्यानंतर केवळ १०० रुपयांना मिळतं. त्यामुळेच बहुतेक ग्राहक कृत्रिम अत्तरांकडे वळत आहेत.
तसं पाह्यलं तर या अत्तर बनवण्याच्या कामात मेहनत खूप आहे. जाई - जुई, पारिजातक यांसारखी फुले सूर्योदयापूर्वी गोळा करावी लागतात आणि त्याच दिवशी त्यांचं सुगंधित अत्तर तयार करावं लागतं. दिवसेंदिवस कच्च्या मालाच्याही किंमती वाढत आहेत. चंदनाचं तेल स्थानिक कारागीर तयार करत नाहीत, ते बाहेरून विकत आणावं लागतं. वाढलेल्या किमतींमुळे अत्तर उत्पादकांची चिंता वाढली आहे. त्याचबरोबर दुसरा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे अत्तराच्या दर्जाचा. अत्तराचा दर्जा किंवा गुणवत्ता ही ते तयार करताना वापरल्या जाणाऱ्या फुलांवर अवलंबून असतो आणि तो दर्जा टिकवण्यासाठी आधुनिक पद्धतीच्या मशिन्स उपयोगी पडतात. मात्र कनौजमधले उत्पादक अत्तर तयार करताना जुन्याच मशिन्सचा वापर करतात ज्यांचा त्यांना अभिमान आहे. त्यामुळे अत्तराचा दर्जा टिकवून ठेवणे दिवसेंदिवस कठीण होत चालले आहे.
"बाजारपेठेत टिकून राहायचं असेल तर तुमच्या उत्पादनाला एक दर्जा असणे आवश्यक आहे आणि स्टँडरडायझेशन (मानकीकरण) केलेली उत्पादनेच आपला दर्जा टिकवून ठेवतात आणि बाजारात आपली छाप सोडतात." अत्तर विक्रेता गौरव मल्होत्रा सांगतात.
या सगळ्या चिंतेच्या ढगांना एक सोनेरी किनार देखील आहे! कनौजमधल्या अनेक उत्पादकांनी आता आपली अत्तरे ऑनलाईन विकायला सुरुवात केली आहे. काही उत्पादक तर आपल्या एकूण उत्पादनापैकी दोन तृतीयांश उत्पादने अमेरिका, युरोप, चीन आणि आफ्रिकेत विकत आहेत. त्याचबरोबर बऱ्याच उत्पादकांनी आता अत्तर बनवताना पारंपरिक तांब्याच्या भांड्यांऐवजी स्टीलच्या भांड्याचा उपयोग करायला सुरुवात केली आहे.
प्रगती अरोमा आणि ऑईल डीस्टीलरीचे पंपी जैन म्हणतात,"सुगंध हा आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे. आपण आपल्या आवडत्या फ्लेवरच्या टूथपेस्टने दात घासतो, आवडत्या वासाच्या साबणाने अंघोळ करतो आणि त्याचबरोबर आपल्या कपड्यांवर देखील आपण अत्तर शिंपडतो. प्रश्न एवढाच आहे की आपण पारंपरिकतेला स्वीकारणार की आधुनिकतेला? आणि तेच खरे आव्हान असणार आहे!"
यंत्रं की माणसाचे कष्ट हा मुद्दा खूप जुना आहे. तो भविष्यातही काही काळ चर्चेत राहिलही. पण तोवर तुम्हांला कनौजचे मिट्टी अत्तर पाहायचे असेल तर ते इथे (https://www.kannaujattar.com/product/mitti-attar/) ऑनलाईन पाहू आणि खरेदी करु शकाल. यात अर्थातच बोभाटाचा काही अर्थिक सहभाग नाही.
लेखक : सौरभ पारगुंडे