computer

५० वर्षे एफबीआयला गुंगारा देणारा २ लाख डॉलर्स घेऊन पळालेल्या आणि अजूनही न सापडलेल्या हायजॅकरची गोष्ट!!

अमेरिकन गुप्तचर संस्था एफबीआय ही प्रचंड कार्यक्षम यंत्रणा समजली जाते. आजवरच्या इतिहासात त्यांनी कठीणातल्या कठीण केसेस सोडवून दाखवल्या आहेत. पण एक केस मात्र त्यांनाच नाहीतर संपूर्ण अमेरिकेसमोर कोडे बनून राहिली आहे. असे कोडे जे आजही सुटू शकलेले नाही.

गोष्ट ५० वर्ष जुनी आहे. १९७१ सालची. एक व्यक्ती सुटाबुटात हातात काळ्या रंगाची बॅग घेऊन अमेरिकेच्या एयरपोर्टवर गेला. या इसमाचे नाव डॅन कूपर होते. त्याला डीबी कूपर नावाने देखील ओळखले जायचे.  त्याने काउंटरवर जाऊन सियाटलला जाणारी फ्लाईट बोइंग ७२७ चे तिकीट घेतले. त्यांनंतर तो विमानात गेला आणि त्याला मिळालेल्या सीटवर जाऊन बसला. पण इतर प्रवाशांप्रमाणे त्याने आपली बॅग वर न ठेवता स्वतःच्या मांडीवर ठेवली. त्याने काळा सूट, स्टायलिश टाय आणि सनग्लासेस घातले होते. उंचापुरा आणि जवळपास चाळीशीतला वाटणारा हा कूपर पुढे काय कांड करणार याबद्दल कुणालाही अंदाज नव्हता.

विमानाने जसे उड्डाण केले तसे कूपरने फ्लाईट अटेंडंट फ्लोरेन्स शाफनरला एक कागद दिला. तिला आधी वाटले हा एखादा बिजनेसमॅन असेल आणि आपला नंबर देत असेल. पण जेव्हा तिने कागद उघडून बघितला तेव्हा तिला मोठा धक्का बसला. कारण त्यात लिहिले होते, 'माझ्याकडे बॉम्ब आहे.' त्याने बॅग उघडून खरोखर त्यात बॉम्ब असल्याचे दाखवले. जराही आगाऊपणा केला तर मला माझे काम करावे लागेल अशी धमकी देखील त्याने दिली.

अतिशय शांत भासणारा कूपर अधूनमधून ड्रिंक्स मागवत होता तसेच त्याला हे ड्रिंक्स पुरवणाऱ्या फ्लाईट अटेंडन्टला टीप देखील देत होता. अधुनमधून तो सिगरेट ओढत होता. पुढे त्याने आपल्या सर्व अटी सांगून जवळच्याच एअरपोर्टवर विमान उतरवून इंधन भरण्यास त्याने सांगितले. त्याला लवकरात लवकर निघायचे होते.

(कूपरची टाय क्लिप)

त्याने सांगितलेल्या अटीत २ लाख डॉलर्स म्हणजेच १ कोटी ३६ लाख रुपये आणि ४ पॅराशूटची मागणी केली. त्यानंतर ही गोष्ट पायलटच्या कानावर टाकण्यात आली. त्याने ही गोष्ट सियाटलच्या ट्रॅफिक कंट्रोलला सूचना देऊन सांगितली. ही बातमी बाहेर फुटल्यावर मात्र प्रचंड मोठा गोंधळ सुरू झाला. एफबीआयला ही गोष्ट समजल्यावर एफबीआय देखील कामाला लागली. पण सरकारने विमानात असलेल्या लोकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत कूपरच्या सर्व मागण्या मान्य केल्या. एफबीआयने आता एक युक्ती केली. त्यांनी कूपरला देण्यात येणाऱ्या पैशांचा नंबर लिहून घेतला.

कूपरचे खरे मिशन तर यानंतर सुरू झाले. त्याने पायलटला सांगितले की, विमानाला मेक्सिकोला घेऊन चला. विमानात त्याने फक्त पायलट आणि इतर स्टाफ राहू दिला. प्रवाशांना त्याने उतरू दिले. त्याला विमानासंबंधी चांगलीच माहिती आहे हे स्पष्ट दिसत होते. अमेरिकेने कूपरला पकडण्यासाठी त्या विमानाच्या मागोमाग दोन विमाने पाठवली.

कूपरने सगळ्या पायलट्सना एका रुममध्ये जाण्यास सांगितले आणि दरवाजा आतून बंद करावा असे निर्देश दिले. काहीच काळानंतर त्या पायलट्सना हवेच्या दबावात फरक दिसला. पायलट बाहेर येऊन बघतो तर विमानाचा दरवाजा उघडा होता. विमान एयरपोर्टवर उतरले तेव्हा विमानाला चारही बाजूने घेरण्यात आले. पण ज्याला पकडण्यासाठी एवढे प्रयत्न केले तो तर आधीच उडून गेला होता. तेव्हापासून आजवर त्याचा पत्ता कुणालाही लागलेला नाही.

अमेरिकन व्यवस्थेसाठी हा प्रतिष्ठेचा मुद्दा होऊन बसला होता. त्याचा छडा लावण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न एफबीआयने केले. कूपरला दिलेल्या पैशांचे नंबर हाती असल्याने ह्या नंबरच्या नोटा कुठे आढळल्यास आणून देण्याची घोषणा करण्यात आली. त्यासाठी बक्षीसही जाहीर करण्यात आले. पण काहीच उपयोग झालां नाही. डॅन कूपर नावाच्या अनेक लोकांना त्यांनी चौकशीला बोलावले. पण मुळात त्याचे नाव डॅन कूपर नव्हते.

युरिक उलीस नावाचा एक गृहस्थ डीबी कूपर केसमध्ये आपलं पूर्ण आयुष्य खपवत आहे. एफबीआयची हजारो कागदपत्रे अनेक दशकांपासून तो चाळत आलाय. युरिकने या केसला ४७ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने कॉन्फरन्स आयोजित केली होती. त्यात त्याने असा दावा केला की डीबी कूपरचे खरे नाव शेरीडन पीटरसन आहे. 

युरिकच्या मते पीटरसन कधीकाळी सैन्यात असल्याने त्याला विमान हायजॅकिंग तसेच स्काय डायव्हिंगची चांगली माहिती होती. त्याने पुढे सांगितले, की तो १९७१ साली नेपाळमध्ये राहत होता. नंतर त्याने रशिया, जपान, हॉंगकॉंग, चीन यासारख्या देशांचा देखील फेरफटका मारला, तर १९९९ साली तो अमेरिकेत परतला होता. पण हा पीटरसन देखील तोच आहे का याबद्दल एफबीआय साशंक होती. कारण स्वतः पीटरसन आज नव्वदीत असून कॅलिफोर्नियात राहत आहे.

युरिकने नुकतेच डीबी कूपर द डेफिनेटीव इन्वेस्टीगेशन ऑफ शेरीडन पीटरसन या नावाने शोधनिबंध प्रसिद्ध केला आहे. यावरून एक गोष्ट समजते ती म्हणजे या युरिकराला या घटनेची चांगलीच पाळेमुळे माहीत आहेत.

एफबीआय आजवर पीटरसनला दोषी ठरवू शकली नाही आणि त्यांचा संशयही कमी झाला नाही. या दरम्यान कित्येक लोकांवर नाव साधर्म्यामुळे किंवा इतर गोष्टींमुळे शंका घेण्यात आली, पण कधीही एका निष्कर्षापर्यंत त्यांना पोहोचता आले नाही. शेवटी २०१६ साली एफबीआयने आपण या केसचा तपास सोडून दिला आहे असे घोषित केले. एक व्यक्ती ५० वर्षे जगातल्या एका मोठ्या तपाससंस्थेला सापडत नाही ही गोष्ट मोठी आश्चर्याची आहे. त्यामुळे एफबीआय सारख्या नामांकित संस्थेलाही कोणीतरी सव्वाशेर सापडू शकतो हे कळून येते.

 

आणखी वाचा:

अपहरण झालेल्या या विमानात 'हा माणूस' आहे हे अतिरेक्यांना कळले असते तर त्यांनी खंडणीची रक्कम १०० पटींनी वाढवली असती !!

सबस्क्राईब करा

* indicates required