'बचना है तो ए मेरे दोस्त, आओ खेले मेंढीकोट' - या शिक्रेट मेसेजचा अर्थ काय हाय ??
माणसांच्या नजरेत येईल आणि त्यांना दिसेल अश्या जागी जाहिरात लावण्यात येते. शहरातल्या भिंती यासाठी अगदी उत्तम पर्याय असतात. जाहिरात नसली तरी हल्ली बऱ्याच भिंतींवर चित्र रंगवलेली तुम्ही पहिली असतील. भिंतींवर आपली कला सदर करणे ही काही नवीन गोष्ट राहिलेली नाही. मुंबईच्या भिंती अशा कलाकारीने भरलेल्या असताना एका गूढ वाक्याने मुंबईकरांच लक्ष वेधलं आहे.
काय आहे हे वाक्य ?
'बचना है तो ए मेरे दोस्त, आओ खेले मेंढीकोट' हे वाक्य सध्या मुंबईत अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे. या वाक्याबरोबरच काही ठिकाणी एक विशिष्ट चिन्ह रंगवलेलं दिसत आहे. मधोमध एक त्रिकोण, त्रिकोणाच्या वर ज्वाळा आणि तळाला लाटांप्रमाणे असलेल्या नागमोडी रेषा. मंडळी हे वाक्य आणि या चिन्हाचा अर्थ काय होते हे गूढ आहे.
माहिमच्या व्हिक्टोरिया चर्चवर, दादरमधल्या कोहीनूर स्क्वेअरच्या भिंतीवर तसेच शिवाजी पार्क परिसरात या प्रकारच्या ग्राफिटी दिसून येत आहेत. ही जाहिरात आहे की एखादा गुप्त संदेश ? याबद्दल माहिती मिळालेली नाही. हे कोणाचं काम आहे हेही समजलेलं नाही. एका प्रत्यक्षदर्शीने सांगितल्या प्रमाणे ज्याने हे चिन्ह काढलं त्याला तो काय करतोय याबद्दल विचारलं असता त्याने उत्तर न देता तिथून काढता पाय घेतला. आश्चर्य म्हणजे या प्रकारच्या ग्राफिटीला दोन किंवा तीन मिनिटात उरकता येतं त्यामुळे हा प्रकार कोणी केलाय याचा पत्ता लागत नाही. अश्या प्रकरच्या ग्राफिटीला बँक्सी ग्राफिटी म्हणतात.
काय आहे बँक्सी ग्राफिटी ?
मुंबईतलं हे चित्र आणि वाक्य ‘बँक्सी ग्राफिटी’ या प्रकारात मोडतं. बँक्सी हा इंग्लंडचा कलाकार असून तो भिंतींवर आणि पुलांवर राजकीय आणि सामाजिक परिस्थितीवर भाष्य करणारी चित्र काढण्यासाठी ओळखला जातो. त्याच्या या पद्धतीला जगभरात प्रसिद्धी मिळाली आहे. त्याच्या कामाची नक्कल अनेक ठिकाणी पाहायला मिळते. याच पद्धतीतलं हे चित्र असल्याचं म्हटलं जातंय.
वाक्यामध्ये असलेला मेंढीकोट शब्द आणि त्याबद्दल चाललेले तर्कवितर्क
मेंढीकोट हा एक पत्त्यांचा खेळ आहे. त्या खेळाचा उल्लेख या वाक्यात असण्याचा अर्थ काय असेल याबद्दल तर्क लावले जात आहेत. काहींच्या मते मेंढीकोट म्हणजे एमडी या अंमलीपदार्थाला उद्देशून लिहिलं गेलं आहे. कदाचित हा ड्रग्स पोहोचवण्यासाठीची सांकेतिक भाषा असू शकते. राव खरं तर ही ‘जर तर’ ची भाषा आहे. खरं कारण कुणास ठाऊक !!
तुम्हाला आठवत असेल ९० च्या दशकात मुंबईत ‘एस एम ताठे’ या नावाने देखील असाच धुमाकूळ घातला होता. ताठे किंवा एस एम ताठे नाव लिहिलेलं मुंबईभर दिसत होतं. आश्चर्य म्हणजे हे शब्द हातांनी लिहिलेले होती आणि प्रत्येक ठिकाणी हुबेहूब दिसत. हे कोणाचं काय होतं याचाही आजपर्यंत पत्ता लागेलेला नाही.
आणखी वाचा :
अंमली पदार्थाविरूध्द अभियान : भाग १
अंमली पदार्थविरोधी अभियान : भाग ३ - अंमली पदार्थांचा प्रवास
अंमली पदार्थाविरूध्द अभियान:भाग २ - म्याँव म्याँवचे दुष्परिणाम