computer

सलाम सिंगने ७००० पानांच्या गुप्त माहितीमध्ये नक्की काय काय चोरलं आणि कुणाला विकलं ?

सलाम सिंग राठोड या निवृत्त नौदल अधिकाऱ्याला कालच विशेष सीबीआय न्यायालयाने ७ वर्षाची शिक्षा ठोठावली. सलाम सिंगने २००६ साली नौदलातून भारताच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्वाची असलेली कागदपत्र चोरली होती. ही केस ‘नेव्हल वॉर रूम लीक’ म्हणून प्रसिद्ध आहे.

मंडळी, सलाम सिंग आपल्याच देशाच्या सुरक्षा व्यवस्थेशी खेळला होता. त्यांने नेव्ही वॉर रूम (नौदल युद्ध कक्ष) आणि ‘एयर डिफेंस क्वॉर्टर’ (हवाई सुरक्षा मुख्यालय) मधून तब्बल ७००० पानांची गोपनीय माहिती (Top Secret ) चोरली होती. ही चोरलेली पाने त्याने पैशांसाठी विकली होती.

पण त्याने ही कागदपत्रं कशी चोरली? मग ती कोणाला विकली? या कागदपत्रांमध्ये कोणती माहिती होती? आणि महत्त्वाचं म्हणजे वॉर रूम म्हणजे काय? चला तर एक-एक प्रश्नांची उत्तरे मिळवूया...

आधी समजून घेऊ वॉर रूम म्हणजे काय ?

वॉर रूम (युद्ध कक्ष) म्हणजे  जिथे युद्धविषयक निर्णय घेतले जातात अशी जागा. देशाची सुरक्षाविषयक पुढील वाटचाल, त्यांचं नियोजन, अत्यावश्यक माहिती जपणे इत्यादी कामं इथं केली जातात. युद्ध कक्ष म्हणजे एक प्रकारे देशाच्या सुरक्षेचा केंद्रक असतो. काहीवेळा तर युद्ध कक्ष कुठे आहे याची माहितीही गोपनीय ठेवली जाते. फक्त महत्वाच्या व्यक्तींनाच तिथे प्रवेश असतो.

हल्ली महत्वाच्या बैठकी घेण्याच्या ठिकाणांना वॉर रूम संबोधण्याची पद्धत सुरु झाली आहे. पण खरंतर वॉर रूम देशातील सैन्यांच्या महत्वाच्या बैठकी घेण्याच्या ठिकाणाला म्हणतात. 

सलाम सिंगने ही माहिती कशी चोरली ?

२००५ साली पेनड्राईव्हमधून एकूण ७००० पानी गोपनीय माहिती लीक झाल्याचं समजलं. ही माहिती बराच काळापासून चोरली जात होती. 

सलाम सिंग हा रंगेहाथ पकडला गेला, तर त्याच्या सोबत जर्नल सिंग कालरा, माजी कमांडर विजेंदर राणा, नौदल कमांडर व्ही. के. झा, कॅप्टन कुमार कश्यप हे ४ जण सामील असल्याचं समजलं. जर्नल सिंग कालराला न्यायालयाने सोडलं आहे आणि बाकीचे तिघे सध्या जामिनावर बाहेर आहेत.

या ७००० पानांमध्ये भारताच्या सुरक्षा व्यवस्थेविषयी पुढील २० वर्षांचे नियोजन होते. ही सर्व माहिती शत्रूच्या हाती लागल्याचा संशय या प्रकरणातून येत होता. 

त्याने ही कागदपत्रं कोणाला विकली ?

सलाम सिंग आणि इतरांनी ही माहिती शस्त्रास्त्र व्यापारी अभिषेक वर्मा, रवी शंकरन आणि कुलभूषण पराशर यांना विकली. शस्त्रास्त्र निर्मितीच्या संदर्भात ही माहिती अत्यंत महत्वाची होती. या माहितीच्या आधारे अभिषेक वर्मा आणि रवी शंकरन यांना शस्त्रास्त्र निर्मितीसाठी मोठा फायदा होणार होता. 

लीक करण्यात आलेल्या कागदपत्रांमध्ये कोणती गोपनीय माहिती होती ?

१. भारतीय गुप्तचर विभागाने दिलेल्या माहितीच्या आधारे आखलेल्या युद्धाच्या डावपेचांची ‘गोपनीय माहिती’.

२. पुढील २० वर्षांच्या नौदलाच्या मोहिमांचा तपशील. या तपशिलात नौदलाचा ताफा व पाणबुड्यांची माहिती.

३. भारताच्या पकोरा क्षेपणास्त्र प्रकल्पाची एकूण कार्यप्रणाली. 

४. भारतातील हवाई सुरक्षा नेटवर्क मधील “असुरक्षित क्षेत्रांची माहिती ज्या आधारे शत्रूला भारताची कमजोरी लक्षात येऊ शकते.

स्रोत

५. पाकिस्तानशी संबंधित महत्वाची कागदपत्रं. या कागदपत्रांमध्ये भारताची पाकिस्तानशी होणारी बातचीत व नौदलाच्या विवादित क्षेत्रातील हालचालींची माहिती होती. 

६. गुजरातच्या कच्छमध्ये पाकिस्तानच्या घुसखोरीला उत्तर देण्यासाठी ठरलेल्या भूदल, वायुदल आणि नौदलाच्या एकत्रित कारवाईचा तपशील. 

७. महत्वाच्या असलेल्या ‘कलवरी’ या  ‘स्कॉर्पीन क्लास’ पाणबुडीच्या निर्मितीची माहिती. फ्रेंच ‘स्कॉर्पीन क्लास’ प्रकारातील ही पाणबुडी नौदलासाठी अत्यंत महत्वाची होती. 

मंडळी, एकूण सलाम सिंगने भारताच्या सुरक्षेला मोठं भगदाड पाडलं होतं. १९२३ च्या गोपनीयता कायद्याच्या आधारे सलाम सिंग दोषी ठरला आहे.

 

 

आणखी वाचा :

जाणून घ्या भारतीय सेनेच्या तिन्ही दलांचे सॅल्युट एकमेकांपेक्षा वेगळे का असतात?

भारतीय सैन्यामध्ये महिला अधिकार्‍यांना कशाप्रकारे संबोधित केलं जातं? जाणून घ्या...

सबस्क्राईब करा

* indicates required