७२ दिवसात पृथ्वी प्रदक्षिणा आणि 'स्टंट जर्नालिझम'ला जन्म देणारी 'नेल्ली ब्लाय' कोण होती ?
२००४ ची जॅकी चेनची सुंदर अॅक्शन कॉमेडी 'अराऊंड दि वर्ल्ड इन 80 डेज' बर्याच जणांनी बघितली असेल. हा सिनेमा ज्यूल्स व्हर्नच्या त्याच नावाच्या लोकप्रिय कादंबरीतील एक काल्पनिक पात्र फिलियस टी.फॉगच्या जीवनावर आधारित आहे. एकोणिसाव्या शतकात आजच्यासारखी जलद गतीची आधुनिक वाहनं उपलब्ध नव्हती. जग आजच्यासारखं जोडलंही गेलं नव्हतं. तेव्हा संपूर्ण जगाला ८० दिवसांत प्रदक्षिणा घालण्याची पैज फिलियस फॉग घेतो आणि त्यात तो यशस्वी होतो की नाही यावर आधारित हा सिनेमा आहे.
राजकपूर हिरो असलेला असाच एक गंमतीदार हिंदी चित्रपट सिनेमा १९६७ साली आला होता. त्याचं नाव होतं "अराऊंड दि वर्ल्ड '. फरक इतकाच होता की ८० डेजच्या ऐवजी 'इन ८ डॉलर्स' असं चॅलेंज त्यात होतं. आपलं सरकार तेव्हा फक्त आठ डॉलरच खरेदी करायची परवानगी द्यायची ही त्यामागची कल्पना होती. पण ते जाऊ द्या
आता हे सगळं काही पुरुष पात्रांवर आधारीत चित्रपट होते. पण वास्तविक जगातही पृथ्वीला ८० दिवसांत काय, तर चक्क ७२ दिवसांत प्रदक्षिणा घालण्याचा पराक्रम एखाद्या पुरुषाने केला नसून नेल्ली ब्लाय नावाच्या एका अमेरिकन तरूण स्त्री पत्रकाराने केला आहे.
२५ जानेवारी १८९० रोजी संपूर्ण जग नेल्ली ब्लाय नावाच्या या तरुण रिपोर्टरची घरी परत येण्याची वाट पाहत होतं. तब्बल ७२ दिवसांपासून ती मालवाहू जहाज, गाड्या, टगबोट, रिक्षांवर आणि घोड्यांवर उड्या मारत पृथ्वीला प्रदक्षिणा घालण्याच्या सफरीवर होती. आतापर्यंत सर्वांत प्रसिद्ध असलेल्या या प्रवासाच्या वृत्तांताचा वाचकवर्ग सतत पाठपुरावा करीत होता. ती कुठपर्यंत पोहचली, ती सुखरूप तर असेल ना वगैरे जाणून घेण्यासाठी वाचक वर्ग उत्सुक होता.
नेल्ली ब्लायने तिच्या त्या ७२ दिवसांचे प्रवास वर्णन "अराऊंड दि वर्ल्ड इन 72 डेज" या नावाच्या पुस्तकात देखील लिहून ठेवलं आहे. तिने केलेला प्रवास म्हणजे ज्यूल्स व्हर्नच्या कांदबरीतील काल्पनिक पात्र फिलियस फॉगची हुबेहुब फोटो कॉपीच आहे! तिचे प्रवास वर्णन म्हणजे एका महत्वाकांक्षी महिलेची अशा काळातील कथा आहे जेव्हा चूल आणि मूल या पलीकडे महिलांचं विश्वच नव्हतं. पण नेल्ली ब्लायने असं काम केलं होतं जे पुढे अमेरिकन महिलांच्या अभिमान आणि सामर्थ्याचे प्रतिक बनलं .
नेल्लीने आपल्या सुप्रसिद्ध सफरीला सुरुवात केली त्याआधीपासूनच तिने जोसेफ पुलित्झरच्या सन्मान मिळवणार्या पत्रकारांपैकी एक म्हणून स्वतःचे नाव मिळवले होते. अमेरिकेच्या वाढत्या गरीब कनिष्ठ वर्गाच्या जीवनाचे आपल्या लेखनातून दस्तऐवजीकरण केले होते. नेल्ली ब्लायचे चरित्रकार ब्रूक क्रोएगर म्हणतात,"स्वतःला नेहमी प्रसिद्धीच्या झोतात ठेवतील अशी असाइनमेंट कशी निवडायची हे तिला माहीती होते.” तिच्या कामाने वाचकांना रोमहर्षक अनुभव दिला आणि न्यूयॉर्कच्या वर्तमानपत्रातील वाचकांमध्ये निर्भयतेसाठी तिला प्रतिष्ठा मिळवून दिली.
पुलित्झरच्या "न्यूयॉर्क वर्ल्ड" च्या संपादकाच्या सांगण्यावरून ब्लाय एका वेड्या महिलेचं सोंग घेऊन न्यूयॉर्क शहरातील महिलांसाठी असलेल्या सर्वात कुख्यात वेड्यांच्या इस्पितळात दहा भयानक दिवस व्यतीत करण्यासाठी गेली होती. तिथे मनोरुग्णांच्या वाट्याला येणारे क्रौर्य भोगले आणि जीवघेण्या उपचारांची माहिती तिने बाहेर काढली. न्यूयॉर्क शहराचा या इस्पितळाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला. त्यापूर्वी कधीही एखाद्या पत्रकाराने एखाद्या घटनेची माहिती घेण्यासाठी स्वतःहून इतक्या वाईट परिस्थितीचा सामना केला नव्हता.
या घटनेमुळे वेड्यांच्या इस्पितळांची परिस्थिती सुधारण्यासाठी मोठा निधी येऊ लागला. साहजिकच नेल्ली ब्लायला झटपट नाव लौकिक मिळाला. तिच्या वृत्तपत्रातील सहकार्यांचाही आदर तिने मिळवला. पुढची दहा वर्षे अशाप्रकारे ती शोध पत्रकारिता करत राहिली. या प्रकारच्या प्त्रकारीतेतून 'स्टंट जर्नालिझम' हा नवा प्रकार जन्माला आला.
"न्यूयॉर्क वर्ल्ड" ने तातडीने "स्टंट" पत्रकारितेचे महत्व ओळखले आणि पुढच्या दोन वर्षांत ब्लायला गुप्तपणे वेगवेगळी असंख्य सोंगं घेत बातम्या मिळविण्यासाठी पाठवले. ती कधी एक मोलकरीण, कधी सांगितिकेत गाणी म्हणणारी नृत्य करणारी मुलगी म्हणून, तर कधी एक अविवाहित आई म्हणून सोंग घेत राहिली. तिने गुप्त माहिती मिळविण्यास सुरूवात केली १८८६-८७ मध्ये. तिने कित्येक महिने मेक्सिकोमधून प्रवास करून तिथला अधिकृत भ्रष्टाचार व गरिबांच्या स्थितीबद्दल आपल्या मायदेशी अहवाल पाठविला. तिच्या कठोर टीकांमुळे मेक्सिकन अधिकार्यांना राग आला आणि तिला देशातून हद्दपारही केले.
लवकरच सर्व वर्तमानपत्रांनी देखील त्यांच्या स्वत:च्या “स्टंट पत्रकार मुली" तयार केल्या. पण कोणत्याही मुलीला ब्लायच्या शैलीत धाडसी काम करता आलं नाही. वयाच्या 23 व्या वर्षीच नेल्ली ब्लायने प्रचंड प्रसिद्धी मिळवली होती. वाचक तिच्यावर खूप प्रेम करत होते आणि तिच्या साहसी पत्रकारितेमुळे वृत्तपत्रांचा खप देखील वाढला होता. पण नेल्ली ब्लायच्या इतर कोणत्याही कारनाम्यापेक्षा जगाचा प्रवास ७२ दिवसांत पूर्ण करण्याचा कारनामा हा खूप महान आहे.
इतिहासकार मिच स्टीफन अमेरिकन सांगतात, "जेव्हा नेल्ली ब्लायने खरोखरच जगभर फिरायचं ठरवलं तेव्हा तो निर्णय म्हणजे स्पेस शटलमध्ये जाण्यासारखेच होते!" तिचा ट्रेडमार्क बनलेला तो चौकडीचा कोट परिधान करून आणि एक बॅग हातात घेऊन नोव्हेंबर १८८९ मध्ये ब्लाय बाहेर पडली. असंख्य संकटांना न जुमानता ती पुढे पुढे निघाली आणि म्हणाली "विजयी न होता न्यूयॉर्कमध्ये परत येण्याऐवजी मी मरणं पसंत करेन."
कुणालाही वाटलं नव्हतं नेल्ली ब्लाय ही शर्यत जिंकेल. पण तब्बल ७२ दिवस, ६ तास, ११ मिनीटे, ४ सेकंदांच्या प्रवासाने ती परतली, विजयी होऊनच एखाद्या सेलिब्रिटीसारखी. बँडबाजा व फटाक्यांचा आतषबाजीने तिचं स्वागत करण्यात आलं. अमेरिकेत एक हॉटेल, एक ट्रेन आणि एका शर्यतीतील घोड्याचंही नाव तिच्या नावावर ठेवण्यात आलं होतं. फक्त पंचवीस वर्षांची असतानाच नेल्ली ब्लाय ही पृथ्वीवरील सर्वात प्रसिद्ध स्त्री ठरली होती.
आज जागतिक स्तरावर महिलांचा सहभाग वाढला असेल तर त्याचे श्रेय नेल्ली ब्लाय आणि तिच्यासारख्या अनेक स्त्रियांकडे जातं!
लेखक: सागर वाघमारे