या शात्रज्ञाला इलाजासाठी चक्क त्याचं नोबेल पारितोषिक विकावं लागलं !!
मेडल किंवा पुरस्कार विकण्याची वेळ आल्याची अनेक उदाहरणं देता येतील. पण कधी एका नोबेल पुरस्कार विजेत्या शास्त्रज्ञावर चक्क नोबेल पुरस्कार विकण्याची वेळ आली आहे असं ऐकलंय का ? अशी दोन प्रसिद्ध उदाहरणं देता येतील. एक आहे जेम्स वॉट्सन यांचं आणि दुसरं उदाहरण आहे लिऑन लेंडरमन यांचं.
दोघांपैकी आज आपण बोलणार आहोत अमेरिकेच्या लिऑन लेंडरमन यांचा बद्दल. काल वयाच्या ९६ व्या वर्षी त्यांचा मृत्यू झाला. लिऑन लेंडरमन यांना त्यांच्या ‘गॉड पार्टिकल्स’ (अणुपेक्षाही सूक्ष्म कण) च्या शोधाबद्दल १९८८ सालचा भौतिकशास्त्राचा नोबेल पुरस्कार देण्यात आला होता. यासोबत त्यांना इतर अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलं.
पुढे त्यांनी नोबेल पुरस्काराच्या रकमेतून सुट्ट्या घालवण्यासाठी एक खास घर बांधलं. २०११ साली ते कायमस्वरूपी त्या घरात राहायला गेले. त्यानंतर त्यांच्या आयुष्याला उतरती कळा लागली असं म्हणण्यास हरकत नाही. कारण त्यांना स्मृतिभ्रंशाचा (डिमेंशिया) त्रास सुरु झाला.
२०१५ साली स्मृतिभ्रंशाच्या त्रासावर इलाज घेण्यासाठी पैसे कमी पडत असल्याने त्यांनी शेवटचा पर्याय म्हणून नोबेल पुरस्काराला लिलावात ठेवलं. याबद्दल त्यांच्या पत्नीला मोठा धक्का बसला. पण पैश्यांची गरजही होती. लिलावातून इलाजासाठी पुरतील इतके ७,६५,००० डॉलर्स जमा होऊन त्यांची तात्पुरती व्यवस्था झाली.
९६ वर्षांच्या वयात लिऑन यांना मृत्यू आला तो त्यांच्या डिमेंशिया रोगामुळेच. नोबेल पुरस्कार विकल्यानंतर अवघ्या ३ वर्षांनी.
त्यांनी विज्ञानाला शोधून दिलेल्या गॉड पार्टिकल्ससाठी त्यांचं इतिहासातील महत्व अनन्यसाधारण आहे. आज गॉड पार्टिकल्सवर मोठ्या प्रमाणात संशोधन होत आहे. त्यांचा जन्मदाता आज काळाच्या पडद्याआड गेला आहे.