जगातील सर्वात जुनी रेल्वे अजूनही चालू आहे? किती जुनी आहे आणि कुठून कुठेपर्यंत जाते?
रेल्वेचा प्रवास हा अनेकांच्या जिव्हाळ्याचा विषय असतो. रेल्वे इंजिनाचा शोध लागल्यानंतर केवळ दोन शहरांमधील अंतर कमी ,झाले नाही तर लोकांना रेल्वे प्रवासाच्या आठवणींचा एक खजिनाच उपलब्ध करून देण्यात आला! रेल्वेचा शोध लागल्यानंतर आजतागायत तिच्यात अनेक बदल झाले आणि करोडो लोकांनी तिच्यासोबत प्रवास केला!
परंतु जगातील पहिलीवहिली रेल्वे कुठे आहे माहिती आहे का? तर ती आहे इंग्लंडमधल्या लीड्स या शहरात,चक्क चालू स्थितीत! तब्बल २६० वर्षांपासून ती अविरतपणे आपली सेवा बजावत आहे आणि अजूनही सुस्थितीत आहे! १७५८ मध्ये संसदीय कायद्यानुसार तिची निर्मिती करण्यात आली. मिडल्टनच्या खाणीतील कोळसा लीड्सच्या कारखान्यांमध्ये वाहून नेण्यासाठी तिचा वापर होत असे. त्याकाळी सर्व रेल्वे ह्या लाकडापासून बनविल्या जात असत. तसेच वाफेच्या इंजिनाचा उपयोग ब्लास्ट फर्नेस आणि पाणी उपसण्यासाठी केला जात असे. परंतु रेल्वेसाठी इंजिन म्हणून कोणी अजून त्याचा वापर केला नव्हता!
त्या मिडल्टनच्या खाणीत एक ब्रँडलिंग नावाचा एक खाणचालक होता. खाणीतल्या कोळशाची नदीमध्ये वाहतूक करता येत नसल्यामुळे त्याला बरेचदा नुकसान सोसावे लागत असे. रिचर्ड हंबल नावाच्या त्याच्या एका एजंटने यावर एक उपाय सुचवला. त्याने घोड्यांद्वारे गाड्या ओढल्या जातील अशा एका गाडीमार्गाची कल्पना सुचवली! १७५५ मध्ये असा पहिला गाडीमार्ग ब्रँडलिंगच्या मालकीची जमीन ते नदीकाठच्या एका धक्क्यादरम्यान तयार करण्यात आला. पुढे १७५७ मध्ये हाच मार्ग लीड्सपर्यंत वाढविण्यात आला. हा मार्ग कायम राहावा म्हणून ब्रँडलिंगने या मार्गाला संसदीय कायद्याद्वारे कायमची अनुमती मिळवून दिली आणि अशा प्रकारे संसदीय कायद्याची अनुमती मिळवणारी ती जगातील पहिली रेल्वे ठरली!
या रेल्वेने वाहतूक केलेला कोळसा अतिशय स्वस्त दरात मिळत असे. त्यामुळे या स्वस्त कोळशाच्या जोरावर लीड्समध्ये अनेक उद्योगधंदे उभे राहिले. कुंभारकाम, काचसामान बनवणे, मातीच्या विटा बनवणे, बिअर निर्मिती असे अनेक उद्योग त्याकाळी लीड्स मध्ये उभे राहिले. एकोणिसाव्या शतकात वाफेच्या तंत्रज्ञानात बरीच सुधारणा झाली. याच दरम्यान रिचर्ड ट्रेविथिकने कोलब्रूकडेलमधल्या खाण कामगारांसाठी वाफेवर चालणारं पाहिलं रेल्वे इंजिन तयार केलं. त्यानंतर दोन वर्षांनी पेन - वाय - दरेन खाणीतल्या खाण कामगारांसाठी रिचर्डने इंजिन तयार केलं.
१८१२मध्ये मॅथ्यू मरेने रिचर्डकडून इंजिनचं डिझाईन घेतलं आणि त्यात सुधारणा करून मिडल्टनमधल्या खाण कामगारांसाठी एक नवीन अद्ययावत रेल्वे इंजिन तयार केलं. वाहतूक सुरळीत आणि जलद होण्यासाठी या इंजिनाला दोन सिलिंडर जोडले होते.
(द सलामन्सा)
("द कोलीयर" - जॉर्ज वॉकर ने १८१४मध्ये बनवलेलं पेंटिंग. या सलामन्सा दिसत आहे.)
सलामन्सा हे रॅक आणि पिनीयनचा वापर करून बनवलेलं पाहिलं इंजिन होतं. या इंजिनचं चाक रुळांवर धावत असे आणि ते डाव्या बाजूला कॉग व्हीलचा वापर करून इंजिनसोबत जोडलेलं होत. या इंजिनमध्ये एक बॉयलर होता आणि त्याच्यावर दोन सिलिंडर होते. या सिलिंडरचा वापर कॉग व्हील चालवण्यासाठी होत असे. सलामन्सा रेल्वे इंजिनचं हे डिझाईन एवढं यशस्वी झालं की खाणीने अशाच डिझाईनची अजून तीन इंजिन मागवली. ही सगळी इंजिन्स जवळपास वीस वर्षे त्या खाणीत कार्यरत होती. पाहिलं इंजिन सहा वर्षानंतर नष्ट करण्यात आलं कारण त्याच्या बॉयलरचा स्फोट होऊन चालक मृत्युमुखी पडला होता. दुसऱ्या इंजिनच्या बॉयलरचादेखील स्फोट झाल्यानंतर मात्र मिडल्टन खाणीने मात्र रेल्वे इंजिनचा वापर बंद केला आणि पुन्हा घोड्यांवरून कोळसा वाहतुकीस सुरुवात केली.
त्यानंतर मात्र रेल्वेमध्ये बऱ्याच सुधारणा झाल्या. 1866 आणि 1881 मध्ये अद्ययावत आणि नवीन तंत्रज्ञानाने युक्त अशा इंजिन्सची निर्मिती करण्यात आली. रुल्वे रुळ १४३५ मिमीचा म्हणजेच स्टॅंर्डडाईज(मानकीकरण केलेला) बनविण्यात आला. त्याचबरोबर मिडल्टन रेल्वेरूळ मुख्य रेल्वे रुळाशी जोडण्यात आला. १९६०पर्यंत म्हणजेच मिडल्टन खाण बंद होईपर्यंत मिडल्टन रेल्वेचा वापर चालू होता.
आज मिडल्टन रेल्वेकडे एक ऐतिहासिक वारसा म्हणून पाहिलं जातं. आजही ही रेल्वे आपल्या काही जुन्या वाफेच्या इंजिनसोबत तसेच काही नवीन डिझेल इंजिनसोबत अविरतपणे चालू आहे.
लेखक : सौरभ पारगुंडे