या बाईंमुळे जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावरून परतलं हे आता कोणालाच ठाऊक नसेल !!
रविवार, १४ ऑक्टोबर १९६२. सकाळी जुआनिता मूडी नावाची स्त्री अमेरिकेतील मेरीलँडच्या नॅशनल सिक्युरिटी एजन्सीच्या मुख्यालयातून बाहेर पडली आणि हाय प्रोफाइल स्टाफसाठी राखीव असलेल्या जागेत पार्क केलेल्या आपल्या गाडीकडे गेली. आकाश निरभ्र होतं. क्युबाच्या बेटावरील लष्करी आस्थापनांचे हाय अल्टीट्युड फोटो काढण्यासाठी अमेरिकेचं हवाई दल क्युबावर यू-२ हे गुप्तहेर विमान पाठवत असल्याची माहिती तिला मिळाली होती. तिला खरी काळजी वाटत होती ती पायलटची. कारण गेल्या दोन वर्षांत दोनदा- एकदा सोव्हिएत युनियनवर आणि एकदा चीनवर- यू-२ गुप्तहेर विमान आकाशातच शूट करण्यात आलं होतं. अमेरिका आणि सोव्हिएत युनियन यांच्यातील तणाव दिवसेंदिवस वाढत चालला होता.
तसे अमेरिका आणि रशिया - एकमेकांचे 'खास' पारंपरिक प्रतिस्पर्धी! त्यांच्यातून कधी विस्तव जात नाही. जगावर सत्ता गाजवण्याचा प्रयत्नांत या दोन महासत्ता एकमेकींना कायम शह-प्रतिशह देत आल्या आहेत. अणुयुद्धाच्या उंबरठ्यावर त्यांच्यातला तणाव पराकोटीला पोहोचला होता. अमेरिकन अध्यक्ष, लष्करी अधिकारी आणि गुप्तहेर संस्थांची पक्की खात्री होती की सोव्हिएत सैन्याच्या क्युबामध्ये काहीतरी हालचाली चालू आहेत. पण नक्की काय, हे कोणालाही नीटसं माहीत नव्हतं.
आज ६० वर्षांनंतरसुध्दा, "क्यूबामधील क्षेपणास्त्र संकट" हे अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेचं मोठं अपयश मानलं जातं. अमेरिकेच्या किनाऱ्यापासून केवळ १०० मैलांच्या अंतरावर असलेल्या आण्विक शस्त्रास्त्रांबद्दल अमेरिकेच्या सुरक्षा यंत्रणेला माहिती कशी मिळाली नाही, हे अजूनही एक कोडंच आहे. या अवघड काळात कोड-ब्रेकिंगमध्ये निष्णात असणाऱ्या आणि NSA च्या क्युबा विभागाची प्रमुख असणाऱ्या मूडी या मुख्य स्त्री अधिकाऱ्याबद्दल मात्र आजही फारशी माहिती नाही.
मुळात ही स्त्री रूढ अर्थाने गुप्तहेर नव्हती. तिचा वावर जास्त करून सिग्नल इंटेलिजेंस म्हणजे रेडिओ मेसेजेस व इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन्स यांच्या जगात होता.
तिचं पूर्ण नाव होतं जुआनिता मूडी. (लग्नाआधीची मॉरीस). २९ मे, १९२४ रोजी उत्तर कॅरोलिनामधील एका सामान्य कुटुंबात तिचा जन्म झाला. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तिच्या शिक्षकांनी तिला कॉलेजमध्ये जाण्यासाठी प्रोत्साहन दिलं. जुआनिताने पैसे उधार घेतले आणि कॉलेजमध्ये नाव नोंदवलं, पण त्याचदरम्यान दुसरं महायुद्ध सुरु झालं. कॉलेज कॅम्पसमधली माणसं अचानक कुठे नाहीशी झाली. कॉलेजच्या स्वच्छ, सुंदर परिसरात आपला वेळ घालवणं मूडीला चुकीचं वाटू लागलं — स्वच्छ निळं आकाश, कॅम्पसमध्ये फिरणं, अभ्यास करणं आणि विरंगुळ्याच्या वेळी क्लासेसला जाणं, आपला देश युद्धात सहभागी झालेला असताना तिला निषिद्ध वाटायला लागलं. शार्लट येथील आर्मी रिक्रूटमेंट ऑफिसमध्ये तिने स्वयंसेवक म्हणून काम करायचं ठरवलं, त्यातही ज्यात बुद्धिमत्तेचा कस लागेल अशा कामात उतरायचं तिने ठरवलं. तिथे तिने हेरगिरीच्या कामाचं प्रशिक्षण घेतलं. अमेरिकेच्या व्हर्जिनिया इथे असलेली अर्लिंग्टन हॉल ही बिल्डिंग तिची कर्मभूमी बनली. इथे अमेरिकेच्या सिग्नल्स इंटेलिजन्स सर्व्हिसचं (SIS) मुख्यालय होतं. तिथे तिने क्रिप्टोऍनालिसिसचं प्रशिक्षण घेतलं.
लवकरच ती एन्क्रिप्टेड असलेलं नाझी सैनिकांदरम्यानचं कम्युनिकेशन उकलण्यासाठी सायफर्सचा वापर करणाऱ्या एका गटाचा भाग झाली. दिवसभर काम संपल्यावर ती आणि तिचे सहकारी रात्री उशिरापर्यंत थांबत आणि न सुटलेल्या 'वन टाइम पॅड' नावाच्या कोडवर बेकायदेशीरपणे काम करत. वन टाईम पॅड हे असं कोड होतं, जे एका विशिष्ट 'की' च्या मदतीनेच क्रॅक करता येत असे आणि ही 'की' तो मेसेज ज्याला पाठवला त्याला आधीच कळवली जात असे. या काळात या टीमने मान मोडून काम केलं. त्याचदरम्यानच्या काळात कोड क्रॅकिंगची मूडीवर खोलवर छाप पडली. त्या काळात, कोणत्याही यंत्राशिवाय चालणारं कोड ब्रेकिंगचं काम नक्कीच सहजसाध्य नव्हतं. अखेरीस, तिने आणि भाषातज्ज्ञ आणि गणितज्ञ असलेल्या तिच्या एका सहकाऱ्याने वन टाइम पॅड समस्येसाठी मशीन तयार करण्यासाठी एजन्सीच्या अभियंत्यांचं मन वळवलं. यामुळे टोकियोतील जर्मन राजदूताकडून बर्लिनला पाठवलेले गुप्त संदेश अमेरिकेला डिकोड करता येऊ लागले.
जपानच्या शरणागतीनंतर मूडीने युद्ध पूर्ण झाल्यावर कॉलेजमध्ये परतण्याचा आपला बेत असल्याचं SIS मधील आपल्या वरिष्ठांना सांगितलं. मात्र त्यांनी तिला त्यापासून परावृत्त केलं. मूडी SIS बरोबर राहिली, आता तिची पूर्व युरोपातील सिग्नल्स कलेक्शनवर लक्ष केंद्रित करण्यासाठी क्रिप्टोऍनालिस्ट म्हणून नेमणूक झाली. १९४७ साली तिला युगोस्लाव्हिया विभागाच्या प्रमुखपदी बढती देण्यात आली. पाच वर्षांनंतर, २४ ऑक्टोबर १९५२ रोजी राष्ट्राध्यक्ष हॅरी ट्रुमन यांनी एका गुप्त करारावर स्वाक्षरी केली आणि नॅशनल सिक्युरिटी एजन्सीचा (NSA) जन्म झाला.
१९५० च्या दशकात मूडीने NSA मध्ये अनेक प्रकारच्या जबाबदाऱ्या पेलल्या — युरोपीय उपग्रह प्रमुख, रशियन मॅन्युअल सिस्टिम्सची प्रमुख, रशियन आणि पूर्व युरोपीय उच्च दर्जाच्या मॅन्युअल सिस्टिम्सची प्रमुख. तांत्रिक अकार्यक्षमता हा तिच्यासाठी चिंतेचा विषय होता. संगणकीय तंत्रज्ञान झपाट्याने पुढे सरकत असताना तिला हस्तलिखित डिक्रिप्शन्स, मेमो आणि टॉप सिक्रेट कम्युनिकेशन्सचा वापर कालबाह्य वाटत होता. मोठ्या प्रमाणात असलेल्या डेटा प्रोसेस करण्यासाठी आणि निर्णय घेणाऱ्यांना तो लवकरात लवकर उपलब्ध करून देण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात तिचा हातखंडा होता. एवढंच नाही तर तिने एजन्सीला टेलिटाईप, फ्लेक्सोरायटर, सुरुवातीच्या काळातले आयबीएम संगणक, आणि सोलिस नावाचा सर्च डेटाबेस अशी नवीन टूल्स वापरण्यासाठी तयार केलं. तिच्या प्रयत्नांमुळे अनेक प्रकारचे टूल्स आणि डेटाबेस तयार झाले आणि वापरात आले.
१७ एप्रिल, १९६१ रोजी क्यूबाच्या बंडखोरांनी फिडल कॅस्ट्रोची राजवट उधळण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. या हल्ल्याला सीआयएचा पाठींबा असल्यामुळे, त्याविरोधात कॅस्ट्रोने तत्परतेने सोव्हिएत युनियनची मदत घेतली आणि "क्यूबामधील क्षेपणास्त्र संकट" सुरू झालं. इथेच मूडी आणि सहकाऱ्यांचं काम सुरू झालं. त्यांना आढळून आलं, की क्यूबाची प्राथमिक अवस्थेत असलेली संदेशयंत्रणा अचानक सुधारून अधिक सुरक्षित झाली आहे. त्यांना सापडलेल्या काही संदेशांमधून असे लक्षात आले की, सोव्हिएत पैसा, कर्मचारी आणि तंत्रज्ञान यांचा क्युबामध्ये वावर वाढला आहे. या सगळ्याचा शोध घेण्यासाठी, हेर विमानातून काढण्यात आलेल्या तब्बल ९२८ छायाचित्रांचं विश्लेषण केल्यानंतर समोर आलेली माहिती झोप उडवणारी होती! क्युबामध्ये SS-4 ही मध्यम-श्रेणीची आणि १२००-२४०० मैल रेंज असलेली बॅलिस्टिक क्षेपणास्त्रं सज्ज ठेवण्यात आली होती.
हा भयंकर धोका लक्षात आल्यावर, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष केनेडी यांनी क्युबाच्या सागरी विलगीकरणाचा आदेश दिला, जेणेकरून या बेटावर शस्त्रं घेऊन येणारी सगळी वाहतूक रोखता येईल. शिवाय सोव्हिएत युनियनने जर या निर्णयाला विरोध केला तर युद्ध अटळ आहे हेही जाहीर केलं.
सोव्हिएत जहाजं या आदेशाला कसा प्रतिसाद देतात याची सर्वांना चिंता होती. त्यासाठी मूडी आणि तिचे सहकारी, सोव्हिएत जहाजं आणि अण्वस्त्रधारी पाणबुडीवर लक्ष ठेवून होते. २४ ऑक्टोबर रोजी त्यांची खात्री झाली की क्युबाच्या दिशेने जाणाऱ्या किमान एका सोव्हिएत जहाजाने थांबून दिशा बदलली आहे. अखेर, २८ ऑक्टोबर रोजी सकाळी, अमेरिकेने तुर्की आणि इटलीमधील अण्वस्त्र केंद्रं बंद करण्यास मान्यता दिल्यानंतर, सोव्हिएतने क्युबामधील क्षेपणास्त्र ठेवलेली ठिकाणं बंद करण्यास सहमती दर्शविली.
या सर्व प्रकरणात एका वैमानिकाच्या मृत्यूचा मूडीला खूप त्रास झाला. त्यामुळे शत्रूच्या प्रदेशाची टेहळणी करताना, वैमानिकांना धोक्याची सूचना मिळेल अशी प्रणाली विकसित करण्यासाठी तिने पाठपुरावा केला.
१९७५ मध्ये मात्र मूडीच्या देदीप्यमान कारकीर्दीला गालबोट लागलं. वॉटरगेट प्रकरणाच्या तपासणीत असे आढळले की NSA ने काही अमेरिकन नागरिकांच्या संभाषणांवर गुप्त देखरेख केली आहे. यामध्ये मूडीचीदेखील चौकशी झाली. NSAच्या ताब्यात असलेली, अमेरिकन नागरिकांशी संबंधित सर्व माहिती आपल्याकडे सुपूर्द करावी अशी मागणी चौकशी समितीने मूडीकडे केली. या माहितीतील बराचसा भाग अनावश्यक आहे आणि त्याचा चौकशी समितीला विशेष उपयोग नाही असे समजवण्याचा तिने आटोकाट प्रयत्न केला, पण व्यर्थ. मग तिने या माहितीची एक ट्रकभर कागदपत्रं चौकशी समितीच्या कार्यालयात पाठवली, तेव्हा ते जरा नरमले. मूडीने नंतर एका मुलाखतीत स्पष्ट केलं की, NSA ने अमेरिकन नागरिकांना नाही, तर फक्त परदेशी संभाषणांना लक्ष्य केलेलं होतं.
२०१५ मध्ये मूडीचं वयाच्या ९० व्या वर्षी निधन झालं. तिच्या भूतकाळाबद्दल विचारले असता, ती नेहमी संदिग्ध उत्तरे देई. एका सुहृदाच्या आठवणीनुसार ती एकदा म्हणाली होती, "उत्तर कॅरोलिनामधील एक गावंढळ मुलगी असूनही, मी आयुष्यात अतिशय रोमांचक गोष्टी केल्या आहेत." बस एवढंच. बाकी काहीही असलं, तरी अमेरिकेच्या सिक्युरिटी सर्व्हिसेसमध्ये तिने दिलेलं योगदान कुणीही नाकारू शकत नाही.
लेखिका: स्मिता जोगळेकर