computer

गुजरातमधल्या लोथलच्या ५००० वर्षं जुन्या गोदीचा इतिहास देतोय सिंधू संस्कृतीची नवीन माहिती!!

आज आम्ही तुम्हाला जगातल्या सर्वात जुन्या गोदींपैकी एका गोदीची गोष्ट सांगणार आहोत. यासाठी आपल्याला फार लांब जाण्याची गरज नाही. ही गोदी भारतातच अगदी महाराष्ट्राच्या शेजारच्या राज्यात, म्हणजे गुजरातमध्ये होती. त्या ठिकाणाचं नाव आहे ‘लोथल’.

भारताच्या फाळणीनंतर सिंधू संस्कृतीची साक्ष देणारी हडप्पा आणि मोहेंजोदाडो सारखी बरीचशी ठिकाणं पाकिस्तानच्या हद्दीत केली. फाळणीच्या ३ वर्षांनी १९५० साली भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने उत्खननाची मोहीम हाती घेतली. या मोहिमेंतर्गत लागलेला सर्वात मोठा शोध म्हणजे लोथलची गोदी. सिंधू संस्कृतीशी निगडीत असलेलं हे भारतातलं सर्वात महत्त्वाचं स्थळ आहे. लोथलच्या शोधामुळे हे सिद्ध झालं की हडप्पा आणि मोहेंजोदाडो येथील संस्कृती केवळ सिंधू खोऱ्यापुरती मर्यादित नव्हती.

लोथलच्या गोदीबद्दल जाणून घेण्यापुर्वो गोदी म्हणजे काय ते समजून घेऊ.

जहाजातून येणारा माल उतरवणे-चढवणे, वाहतूकीचं नियंत्रण करणे यासाठी जो पाण्याचा पट्टा वापरला जातो त्याला गोदी म्हणतात. गोदी ही नदी/समुद्रकिनाऱ्यापासून लांब असू शकते किंवा जवळही. किनाऱ्यापासून लांब असलेली गोदी किनाऱ्याला जलमार्गाने जोडलेली असते. जहाज बांधणीच्या कारखान्यालाही गोदी म्हटलं जातं. अचूक नाव द्यायचं झालं तर त्याला सुकी गोदी किंवा इंग्रजीत ड्राय डॉक म्हणतात.

लोथल येथील गोदी!

लोथल येथील गोदी अहमदाबादपासून दक्षिणेला ८५ किलोमीटरवर, तर खांबातच्या अखातापासून ३५ किलोमीटर अंतरावर आहे. गोदीचा आकार २०० मीटर लांब, तर ३५ मीटर रुंद आहे. १९५० साली उत्खननात शोध लागल्यानंतर सुरुवातीच्या अभ्यासातून असा निष्कर्ष काढण्यात आला की, ज्याला आपण गोदी समजतोय ती गोदी नसून सिंचन प्रकल्प होता. याला कारणंही तशीच होती. लोथलची गोदी केवळ सात हेक्टर एवढ्या कमी जागेत बांधलेली आहे आणि तिची रचना देखील एखाद्या कुंडासारखी वाटते. पुढे उत्खननात पुरातत्व विभागाच्या हाती जहाजाचं नांगर, शंख, जीप्सियमचे स्फटिक, मीठ, सागरी जीवाश्माचे अवशेष लागल्यानंतर हे सिद्ध झालं की, या जागी गोदी होती.

लोथलच्या नावात एक योगायोग लपलाय. लोथल हा गुजराती शब्द आहे आणि त्याचा अर्थ होतो ‘मृतकांचा ढिगारा’ (Mound of Dead). लोथलपासून ६७० किलोमीटर लांब असलेल्या मोहेंजोदाडोच्या नावाचा अर्थही सिंधी भाषेत ‘मृतकांचा ढिगारा’ असाच होतो. १९५४ साली लोथलचा शोध लागला. १३ फेब्रुवारी १९५५ ते १९ मे १९६० सालापर्यंत उत्खनन करण्यात आलं. एस. आर. राव हे या उत्खननाचे मुख्य होते. तो काळ भारतीय पुरातत्वशास्त्रासाठी शोधाचा काळ होता. लोथल पाठोपाठ राखीगढी, ढोलाविरा, कालीबंगन या ठिकाणी सिंधू संस्कृतीची साक्ष देणारी संपूर्ण शहरंच हाती लागली. राखीगढी येथील शोधामुळे सिंधू संस्कृतीबद्दलच्या धारणाच बदलण्याची शक्यता आहे. त्याबद्दल नंतर कधी तरी आपण बोलूच.

अभ्यासकांच्या मते लोथलचा इतिहास ५००० वर्षे मागे जातो. इसवी सनपूर्व २२०० सालाच्या जवळपास लोथल येथे शहर उभारणी सुरु झाली. लोथलची गोदी शहराला साबरमती नदीशी जोडणारी होती. साबरमती नदीतूनच हडप्पा आणि सौराष्ट्र द्वीपकल्पांत व्यापार चालायचा. या व्यापारी मार्गात लोथल हे महत्त्वाचं ठिकाण होतं. असं म्हणतात की लोथल हे सिंधू संस्कृतीतील एकमेव बंदाराचं शहर होतं.

लोथलच्या गोदीचं काम कसं चालायचं ?

अभ्यासकांच्या मते ही गोदी अगदी योग्य ठिकाणी उभारण्यात आली होती. त्याचं एक मुख्य कारण म्हणजे जवळच खांबातचं आखात होतं. खांबातच्या आखातात येणाऱ्या भरतीच्या उंच लाटांमुळे जहाजे आखाताला मिळणाऱ्या नदीत सहज प्रवेश करू शकत आणि वाहतूक सुरळीतपणे होई. वरच्या नकाशामध्ये पाणी येण्याजाण्याचीची खास व्यवस्था दिसून येते. आहोटीच्यावेळी पाण्याची पातळी पुरेशी राहावी म्हणून लाकडी दरवाजे लावण्यात आले होते. या लाकडी दरवाजातून एका प्रमाणात पाणी सोडलं जायचं. गोदीची मुख्य जागा म्हणजे कोठार हे पुरापासून वाचवण्यासाठी उंच जागी बांधलेलं होतं. मालाची ने आण करण्यासाठी थेट कोठाराशी जोडलेली उतरंड बांधण्यात आली होती.

नदी आणि नदीच्या पुराचा विचार करूनच लोथलची उभारणी केली गेली होती आणि अनेक वर्ष या शहराची भरभराट होत राहिली, पण शेवटी पुरातच या शहराचा अंत झाला. आता लोथलची नगररचना जाणून घेऊया.

हडप्पा आणि मोहंजोदाडो येथे आढळणारी कमालीची शिस्तबद्ध नगररचना लोथल येथेही पाहायला मिळते. लोथलची निर्मिती करताना अर्थातच नदीच्या पाण्याची पातळी आणि पूर डोळ्यासमोर ठेवून योजना आखल्याचं आढळतं. लोथलची विभागणी मुख्यत्वे दोन स्थरात होती. वरच्या भागाची रचना गढीसारखी होती. तिथे शहरातले उच्चभ्रू राहायचे. खालच्या स्थरात इतरांची वस्ती होती.

शहर बांधणीसाठी ३ ते ६ फूट उंच भाग तयार करण्यात आले होते. प्रत्येक भागात २० ते ३० घरे होती. शहराची बांधणी चतुर्भुज आकाराची होती. चारही दिशांना जोडण्यासाठी अरुंद रस्त्याचं जाळं शहरभर पसरलेलं होतं. रस्त्यांना चुन्याचा गिलावा केलेला असायचा. आंघोळीसाठी खास व्यवस्था होती. आजच्या आधुनिक शहरांनाही लाजवेल अशी गटारांची बांधणी करण्यात आली होती. पुरापासून संरक्षणासाठी घरांची निर्मितीही अत्यंत काळजीपूर्वक केलेली होती. घराच्या भिंती जाड होत्या. त्यांची लांबी १२ ते २१ मीटर होती.

मृतांची विल्हेवाट लावण्याची पद्धती.

मृतांची विल्हेवाट लावण्यासाठी एकच एक पद्धत अस्तित्वात नव्हती. मृतांना दफन करणे, अग्नी देणे आणि अग्नी दिल्यानंतर त्यांची राख मडक्यात ठेवून त्याचं दफन करणे अशा पद्धती वापरल्या जात. लोथल येथे आढळलेली एक वेगळी गोष्ट म्हणजे लोथल येथे दोन व्यक्तींना एकत्र दफन केलं जात असे. अशी एकत्र दफन करण्याची पद्धत हरियाणाच्या राखीगढी येथेही आढळून आली आहे.

असं म्हणतात की हडप्पा आणि मोहेंजोदाडो काळाच्या ओघात नष्ट झाल्यानंतरही लोथलची गोदी आणि शहर अस्तित्वात होतं, पण शेवटी निसर्गापुढे त्यांचा निभाव लागला नाही. सततचे वादळ आणि पुरामुळे लोकांनी या शहराला सोडून इतरत्र वस्ती करणं पसंत केलं. परिणामी लोथल नष्ट झालं आणि काळाच्या ओघात जमिनीखाली गाडलं गेलं.

तर हा होता लोथलचा इतिहास. लेख आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका. तुमच्याकडे जर या संदर्भात नवीन माहिती असेल तर तुम्ही नक्की शेअर करा.

सबस्क्राईब करा

* indicates required