computer

नॉर्वेच्या कंपनीने केरळची मसाला कंपनी २००० कोटीत का खरेदी केली असेल ??

"युरोपीयन देशातले व्यापारी मसाल्याच्या पदार्थांसाठी भारतात आले आणि त्यांनी केरळमध्ये वखारी स्थापन केल्या." हे वाक्य लिहून सहावी किंवा सातवीच्या वर्गात तुम्ही इतिहासाच्या पेपरात दोन गुण नक्की मिळवले असतील. पण सध्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठांधील काही घडामोडी पाहिल्या तर वर लिहिलेले वाक्य पुन्हा एकदा वर्तमानात लिहावे लागेल असे दिसते आहे. आता मसाले म्हटल्यावर तुम्हाला ३०० कोटींची राधिका मसाले कंपनी आठवेलच, पण आज आम्ही जी बातमी तुमच्यासमोर मांडतो आहे ती तब्ब्ल २००० कोटी रुपयांना विकल्या गेलेल्या केरळामधल्या एका मसाला कंपनीची आहे.

केरळमधील इस्टर्न काँडीमेंट्स ही कंपनी नॉर्वेच्या ऑर्क्ला नावाच्या मसाला कंपनीने २००० कोटी रुपये मोजून विकत घेतली आहे. इस्टर्न कॉंडीमेंट्स ही कंपनी केरळच्या मिरान या कुटुंबाच्या मालकीची आहे. या कंपनीचे ७४% मालकी हक्क फिरोझ आणि नवास मिरान या दोन भावांकडे आहे. उरलेले २६% मालकी हक्क मॅककॉर्मीक इनग्रेडीअंट्स या कपनीकडे आहेत.

आता तुमच्या डोक्यात थोडा गोंधळ उडला असण्याची शक्यता आहे. कारण एकाच वेळी अनेक अनोळखी नावं तुमच्यासमोर आली आहेत. तर त्याचं असं आहे की मसाल्याची कंपनी म्हणजे मसालेदार असणारच नाही का? आता आम्ही फक्त या मसाल्यातले वेगवेगळे घटक तुम्हाला उलगडून सांगतो म्हणजे या मसाल्याची खरी लज्जत तुम्हाला कळेल.

सुरुवात करू या या मसाल्यातल्या एक वेगळ्या आणि ओळखीच्या नावापासून! ते नाव आहे MTR! अगदी बरोबर आहे. ही आपल्या बंगलोरची कंपनी. १९२४ साली 'मावळ्ळी टिफीन रुम' या नावाने बंगलोरमध्ये एका रेस्टॉरंटपासून सुरु झालेली ही कंपनी. नंतरच्या काळात कंपनी रेडी फूड पॅकेटच्या माध्यमातून घराघरात पोहचली. २००७ साली या कंपनीच्या मालकांनी आणि त्यांच्या नातेवाईकांनी त्यांचे मालकी हक्क ३६५ कोटी रुपयांना नॉर्वेच्या ऑर्क्ला या कंपनीला विकून टाकले. २०१३ साली कंपनीचे पूर्ण व्यवस्थापन ऑर्क्लाच्या हातात आले. मात्र कंपनीचे नाव तेच म्हणजे एमटीआर फूड्स राहीले. कंपनीचा चेहरा फक्त भारतीय उरला.

आता याच एमटीआर फूड्सचा वापर करून ऑर्क्लाने इस्टर्न काँडीमेंट्सचे मालकी हक्क २००० कोटी रुपये देऊन विकत घेतले. आता राहता राहिला मॅककॉर्मीक इनग्रेडीअंट्स या नावाचा घोळ. तर त्याचं असं आहे की १८८९ साली स्थापन झालेली ही मसाल्याची अमेरिकन कंपनी आहे. ऑर्क्लाच्या आधी त्यांनी या कंपनीत गुंतवणूक केली होती. ऑर्क्लाने टेकओव्हर केल्यानंतर त्यांचे मालकी हक्क पण संपुष्टात आले आहेत.

आता महत्वाचा मुद्दा असा आहे की ग्लोबलायझेशनच्या काळात अशी मोठमोठी डिल्स होतच असतात. तर आपण त्याची का दखल घ्यावी? तर त्याचे उत्तर असे आहे मसाला क्षेत्रात गेल्या काही वर्षात युरोपियन आणि अमेरिकन कंपन्या जास्त रस दाखवत आहेत. त्याच कारण जाता जाता जाणून घेऊया. 

सध्या भारतातून परदेशी कंपन्या मसाले विकत घेतात. पण ही खरेदी 'बल्क' म्हणजे ब्रँडिंग न करता ठोक खरेदी असते. हेच मसाले ब्रँडिंग करून परदेशात गेले की त्यांची किंमत १५ ते २० पटीने वाढते. सोबत युरोपीय देशात भारतीय मसाल्यांचा वापर दिवसेंदिवस वाढत जातो आहे. त्यामुळे हे क्षेत्र गुंतवणूकदारांना आकर्षित करते आहे. काही दिवसांपूर्वीच पुण्याच्या 'परंपरा' या मसाल्यांचा कंपनीला अनेक गुंतवणुकीच्या ऑफर्स आल्या होत्या. त्यापैकी कोणतीही गुंतवणूक अजून पूर्ण झालेली नाही, पण एकूण गोल्ड रश सारखा 'स्पाईस रश' सुरू झाला आहे हे नक्कीच !

सबस्क्राईब करा

* indicates required