computer

आर. के. लक्ष्मण यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने त्यांच्या चाहत्याचा दुर्मिळ किस्सा खास बोभाटाच्या वाचकांसाठी !

एक काळ असा होता की टाईम्स ऑफ इंडिया वा महाराष्ट्र टाईम्स पेपर आला की बातम्यांच्याहि आधी त्यातील आर. के. लक्ष्मण यांच्या व्यंगचित्रांकडे लक्ष जायचं आणि चेहऱ्यावर स्मित फुलायचं. हे ‘यू सेड इट’ हे पॉकेट कार्टून म्हणजे आर. के. लक्ष्मणची सामाजिक परिस्थितीवर खिल्ली असायची ! आणि हे सर्व म्हणजे बोचकारे वा ओरबाडणे नसायचं तर त्यातून  सामाजिक आणि राजकीय कमतरतेवर  गुळगुळीत दाढी केल्यासारखं पातं फिरायचं. म्हणजे एकप्रकारे खरी हजामतच पण रक्तबंबाळ न करणारी !

स्रोत

आज टाईम्स ऑफ इंडिया वा मटा येतो त्यात व्यंगचित्र प्रकार अभावानेच दिसतो.पण हजारो वाचकांना मात्र आज 'लक्ष्मण' असता तर त्याने कशी धमाल उडवली असती अशीच  हटकून आठवण येते!

हे आज पुन्हा सांगायचे कारण २४ ऑक्टोबर २०२१ ला त्यांची जन्मशताब्दी आहे.

टाईम्स ऑफ इंडिया आणि आर. के. लक्ष्मण हे एकेकाळी अविभाज्य समीकरण होतं. ह्याला थेट दाद दिली आहे ती भारत सरकारने. टाईम्स ऑफ इंडियाला दीडशे वर्ष झाल्याच्या निमित्ताने भारतीय टपाल खात्याने जे विशेष तिकीट काढले आहे त्यावर टाईम्स ऑफ इंडिया हा पेपर आहे आणि लक्ष्मणचा कॉमनमॅन नेहमीच्या आश्चर्यच्या भावात आहे.

त्याच्याही पुढची गोष्ट म्हणजे पेपरची हेडलाईन आहे ‘टाईम्स टर्न १५० ! गोल्डन स्टँप रिलीज्ड’! जगाच्या इतिहासात एखाद्या व्यंगचित्रकाराचा असा सन्मान क्वचितच झाला असेल. आर. के. लक्ष्मण एक व्यंगचित्रकार म्हणून त्याचं अलौकित्व कुणालाही नाकारण्याच्या पलीकडे आहे.

आर.के. लक्ष्मण यांची  व्यंगचित्राची पुस्तकं त्याची साक्ष आहेत. त्या संबंधात लक्ष्मणयांनी आपल्या आत्मकथनात ‘टनल ऑफ टाईम’मध्ये दिलखुलासपणे वर्णन केलं आहे. विशेष म्हणजे ह्याचा अशोक जैनकृत अनुवाद ‘लक्ष्मण रेषा - राजहंस प्रकाशन’ लोकप्रिय आहे. 

प्रत्यक्ष भेट

माझी आणि आर. के लक्ष्मण यांची  दहा पाच वेळा तरी प्रत्यक्ष भेट झाली आहे. ती पण एक चित्रकथाच आहे. ‘लक्ष्मणरेषा’च्या प्रकाशनाला मी नाशिकला गेलो होतो. 
पण प्रत्यक्ष प्रथम भेट व्हायला कारणीभूत झाली त्याची पत्नी कमला लक्ष्मण.

फिल्म फेअरच्या सुरुवातीच्या काळात दर अंकात लक्ष्मण लोकप्रिय कलावंताचं अर्कचित्र ते देखील रंगीत देत असे. त्या सदराचं शीर्षक होतं ‘स्टार्स आय नेव्हर मेट’. त्या सदरात दिलीपकुमार पासून सर्वच अभिनेते अभिनेत्री होत्या. लता मंगेशकर यांचं पण अर्कचित्र त्यात होतं.

फक्त एकच अर्कचित्र होतं त्याचं शीर्षक होतं ‘स्टार आय ओनली मेट’. ते अर्कचित्र होतं कमला लक्ष्मण यांचं!

कमला लक्ष्मण यांचे चोरी चोरी, यहुदी, नाचघर, नया संसार ह्या सारख्या चित्रपटात नाच पाहिले होते. कठपुतली मध्ये तर गाणं आणि नृत्य होतं. त्यापैकी 'हाये तुही मोहे भूल गया है' हे गाणं आज युट्युबवर उपलब्ध आहे.

हे पाहून माझ्या मनात प्रश्न आला होता. पुढे एका स्नेह्याच्या मदतीने मी आर. के. लक्ष्मण यांच्यापर्यंत पोचलो.

“हा प्रश्न पडलेला कोण आहे हे मला पाहू दे तरी...’ असं म्हणत  ते भेटीला तयार झाले. माझा प्रश्न होता की न भेटता काढलेल्या चित्रात आणि एकमेव भेटलेल्याचं काढलेल्या चित्रात फरक काय आहे?’

आर. के लक्ष्मणानं फारसं समाधानकारक उत्तर दिलं नाही. किंबहुना काहीतरी वेगळं बोलून तो विषय टाळला असं मला वाटून गेलं.

तर ही अशी कमला लक्ष्मण ‘आर के लक्ष्मण’ची प्रथम पत्नी होती.  नंतर त्यांचा  घटस्फोट झाला आणि आपल्या मावस बहिणीशी त्यांनी दुसरा विवाह केला. योगायोगाने तिचं नाव पण कमलाच होतं! पण ह्या पहिल्या विवाहाचा उल्लेखही आर. के. लक्ष्मणच्या ‘लक्ष्मणरेषा’ मध्ये नाही!. 

मात्र ह्या पहिल्या कमाला लक्ष्मणमुळे आर के लक्ष्मणशी ओळख झाली. पुढे बंगलोरात सुप्रसिद्ध लेखक आर के नारायण यांची भेट होऊ शकली.पुढे कमला लक्ष्मण यांचाही स्नेह  मला लाभला. नंतरच्या काळात आर. के. लक्ष्मण मुंबई सोडून गेले तेव्हा त्यांची भेट दुरापास्तच झाली. पण एके दिवशी त्यांचा अफाट चाहता केशव भिंगारेमुळे एके दिवशी अवचितपणे गाठ पडली तेव्हा दोघा पती पत्नींनी मला ओळखले. आर के लक्ष्मण यांच्यासोबत काढलेला फोटो  हीच फोटोमय आठवण आता माझ्याकडे  कायम आहे!

लेखक : रविप्रकाश कुलकर्णी

सबस्क्राईब करा

* indicates required