बाजारात आली आहे चक्क शेणाची राखी.....बहिणींनो विकत घेणार का ?
रक्षाबंधन जवळ येत आहे. यंदा पाऊस पण दणकेबाज झाला आहे. म्हणून बाजारही रक्षाबंधनासाठी सजला आहे. भाऊ-बहिणीच्या या पवित्र सणासाठी मार्केटमध्ये दरवर्षीप्रमाणे या वर्षीही एकाहून एक सुंदर आणि डिझायनर राख्या आल्या आहेत.
दरवर्षी काही हटके डिझाईनच्या राख्या बाजारात येतात आणि त्या सर्वांचे लक्ष वेधून घेत असतात. यावर्षी पण एक राखी असेच सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. पण यंदाची ही राखी एकदम स्पेशल आहे राव!! कारण ती इकोफ्रेंडली आहे, एवढेच नाही मंडळी तर ही राखी चक्क शेणापासून बनवली गेली आहे.
उत्तर प्रदेशातल्या बीजनौर इथं श्रीकृष्ण गोशाळेत या राख्या तयार होत आहेत. मंडळी, श्रीकृष्ण गौशाळेत देशी लाल सिंधी गायी आहेत. या गोशाळेत या गायींच्या शेणाला राखीचा आकार देऊन त्यांना सुकविण्यात येते. त्यानंतर त्या राखीला सजवण्यासाठी त्यात सुताचे धागे गुंफण्यात येतात.
या प्रकल्पाचा मुख्य उद्देश पर्यावरण हानी कमी करणे हा असल्याचे या राखीच्या निर्मात्यांकडून सांगण्यात येत आहे. डिझायनर राख्यांमुळे पर्यावरणास हानी पोचते, पण या राख्यांपासून तसा कुठलाही धोका नाही. उलट शेणापासून बनविलेल्या या राख्या काही दिवसांनी शेतात फेकल्या तर त्याचा पिकांना फायदाच होईल असेसुद्धा या राख्यांचे निर्माते सांगतात.
मंडळी, या गोशाळेत ११७ गायी आहेत. त्यांच्या शेणापासून नेहमीच अशा समाजोपयोगी वस्तू बनविण्यात येतात. त्यात फ्लॉवरपॉटपासून फिनेलपर्यंत अनेक गोष्टींचा समावेश आहे.
मुळात ही आयडीया इंडोनेशियातली चांगली नोकरी सोडून भारतात परत आलेल्या ५२ वर्षांच्या एनआरआय अलका लाहोटी यांची आहे. ही गोशाळा त्यांच्या वडिलांची होती. त्यांनी ही गोशाळा बघितल्यावर तिथल्या शेणाचा चांगल्या प्रकारे उपयोग करता येऊ शकतो ही आयडीया त्यांना आली आणि त्यांनी या इको फ्रेंडली राखीवर काम सुरू केले. त्यातूनच या राखीची निर्मिती झाली आहे राव!!
अलका लाहोटी सांगतात की त्यांनी या राख्या सुरुवातीला कुंभमेळ्यातील साधूंना दाखवल्या. या राख्या लोकांपर्यंत जायला हव्या अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केल्यावर त्यांनी तज्ञांशी संपर्क करून या राख्या आणखी चांगल्या रुपात सजवल्या. त्यानंतर या राख्यांना देशभरातून मागणी व्हायला लागली. येणाऱ्या रक्षाबंधनसाठी मोठ्या प्रमाणावर या ईको फ्रेंडली राख्या त्यांनी तयार केल्याचे सुद्धा सांगितले आहे.