या भावंडांना मरणोत्तर शौर्य पुरस्कार मिळाला आणि त्यांच्या नावे दरवर्षी २५ मुलांनाही तो दिला जातो. या मुलांनी असं नक्की काय केलं होतं?
देशात एखादे हत्याकांड घडले की सगळा देश हादरतो. गुन्हा करणारे किती निर्दयी, माणसांच्या अवतारात सैतान अशी भावना प्रत्येकाच्या मनात येते. सगळ्या संरक्षण यंत्रणेवर प्रश्न उठवले जातात. मूकमोर्चे, सोशल मीडियावर राग व्यक्त करत भरभरून लिहिले जाते. पोलिसांनी आरोपी लवकरात लवकर पकडावे अशी इच्छा व्यक्त करून नंतर सगळेजण विसरून जातात. दिल्लीत निर्भया घटनेनंतर असेच घडले. पण निर्भया हे महिलांवर अत्याचार करणारी पहिलेच नृशंस हत्याकांड नाही. १९७८ साली सुद्धा अशी घटना घडली होती ज्यामुळे संपूर्ण देश हादरला होता. काय घडले होते त्या साली? आज आपण त्या दुर्दैवी घटनेची माहिती करून घेऊयात.
दिल्लीच्या ढोलकुआँमध्ये राहणारे नौदल अधिकारी मदन मोहन चोप्रा यांची मुलगी गीता आणि मुलगा संजय चोप्रा २६ ऑगस्ट १९७८ रोजी पार्लमेंट स्ट्रीटसाठी घरातून निघाले. गीताचे वय १६ आणि संजयचे वय १४ च्या जवळपास होते. दोघेही आकाशवाणीसाठी घरातून बाहेर पडले होते. पण८ वाजता गीताच्या ऐवजी दुसऱ्याच मुलीला आकाशवाणीवर बोलताना ऐकल्यावर मदन चोप्रा आकाशवाणीवर मुलांना शोधायला गेले. तिथे त्यांना कळले की त्यांची मुले आकाशवाणीवर पोहोचलीच नाहीत. मुले वाटेतच कुठेतरी बेपत्ता झाली होती. कुटुंबीयांनी नेहमीच्या जागी शोध घेतला. पण मुलांचा पत्ता लागला नाही. पोलिसांना कळवण्यात आले आणि नंतर त्यांचे अपहरण झाल्याचे कळले. एका फियाट कारमध्ये दोन मुलांना बळजबरीने पळवून नेल्याचा गुन्हा पोलिसांत दाखल झाला होता. त्या वाहनाचा क्रमांक HRK ८९३० होता, पण तो चुकून आधी तो MRK ८९३० असा नोंदवला गेला.या दोन मुलांसाठी रात्रभर शोधमोहीम सुरू होती. पण यश मिळाले नाही. पोलिस कसून शोध घेत होते. यूपी, हरियाणा आणि पंजाबपर्यंत पोलिस पथकांनी शोध सुरू केला होता. २६ ऑगस्ट ते २९ ऑगस्टपर्यंत काहीही सुगावा लागत नव्हता. पोलिस दलही चक्रावून गेले होते.
दरम्यान मुलांनी अपहरण झाल्यानंतर बराच प्रतिकार केला होता. त्यांचे केस ओढले, हाताने मारले, आरडाओरडा करत प्रसंगावधान राखून कित्येकांचे लक्ष वेधून घेतले. या रस्त्यावरच्या लोकांनी गाडीचा पाठलाग केला, एकाने आपली दुचाकी सोडून देऊन अपहरणकर्त्यांच्या गाडीचा दरवाजा उघडायचा असफल का होईना, पण प्रयत्न केला. यांनीच पोलिस कंट्रोल रुमला गाडीच्या क्रमांकासह माहिती कळवली. पण तिथेही तो नंबर चुकीचा ऐकला गेल्याने दिशाभूल झाली. पण तोवर दुसऱ्या एकाला संजयने जखमी खांदा दाखवत मदतीची याचना केली होती. या माणसानेही कारचा पाठलाग केला. पण सिग्नल लागला आणि ती कार नाहीशी झाली. मात्र यांनीही फोन केल्यामुळे कंट्रोल रुमला नोंदवलेल्या गाडी क्रमांकाची गफलत लक्षात आली आणि नेमका क्रमांक मिळाला.
तेवढ्यात २९ ऑगस्ट रोजी एका मेंढपाळाला एका मुलीचा मृतदेह सापडल्याची माहिती मिळाली. पोलिस पूर्ण तयारीने लगेच त्या ठिकाणी धावले. मुख्य रस्त्यापासून ५ मीटर अंतरावर मुलीचा मृतदेह होता. दुर्दैवाने तो मृतदेह गीताचा होता. पोलिसांनी घटनास्थळी सगळीकडे शोध घेतला आणि त्यांना संजयचा मृतदेहही ५० मीटर अंतरावर आढळून आला. कुटुंबीयांना बोलावून ते दोघेही नौदल अधिकारी मदन मोहन चोप्रा यांची मुले असल्याची ओळख पटली. आश्चर्याची बाब म्हणजे संजयच्या खिशात ठेवलेले पैसे आणि गीताच्या बोटातील सोन्याची अंगठी तशीच होती. त्यावरून दरोड्याच्या उद्देशाने त्याचे अपहरण झाले नसल्याचा अर्थ काढण्यात आला.
पोस्टमार्टम रिपोर्टनुसार २६ ऑगस्ट रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास दोघांची हत्या करण्यात आल्याचे उघड झाले आहे. शवविच्छेदन अहवालात गीतावर बलात्कार झाला झाल्याचे निष्पन्न झाले. गीतावर बलात्कार झाला की नाही हे शोधणे अवघड गेले, कारण तिचा मृतदेह कुजला होता. या घटनेचे देशभर पडसाद उमटले.
आणीबाणीनंतरचा तो काळ होता. केंद्रात मोठ्या आंदोलनानंतर नवे सरकार आले. मोरारजी देसाई पंतप्रधान असताना संसदेत ‘शेम-शेम’च्या घोषणा दिल्या जात होत्या. राज्यसभेतही पंतप्रधानांच्या राजीनाम्याची मागणी होत होती. मारेकऱ्यांना लवकरात लवकर पकडले जावे याची मागणी होऊ लागली. हत्येविरोधात लोक रस्त्यावरही उतरले होते. पोलिसांना गुन्हेगार शोधणे हे एक मोठे आव्हान होते.
३१ ऑगस्ट रोजी पोलिसांना ज्यामध्ये मुलांना पकडुन नेले होते ती फियाट कारही सापडली. तिचे मालक अशोक शर्मा यांची चौकशी झाली. त्यांनी सांगितले दिल्लीतील अशोक हॉटेलसमोरून त्यांची कार चोरीला गेली होती. कारमधून फिंगरप्रिंट्स घेण्यात आले. फॉरेन्सिक अहवालानुसार हे ठसे रंगा-बिल्लाचे असावेत असा अंदाज करण्यात आला.
रंगा-बिल्ला:
रंगा म्हणजे कुलजीत सिंग. बिल्ला म्हणजे जसबीर सिंग. हे दोघे मित्र होते. रंगा जॉली स्वभावाचा होता. तो ५ फूट १० इंच उंच होता. बिल्ला टॅक्सी चालवायचा. तो जवळपास साडेपाच फूट उंच होता. तो कायम गंभीर असायचा. रंगाला कोणीतरी सांगितले होते की बिल्लाने अनेकांना मारले आहे. येथूनच दोघेही गुन्हेगारीच्या दुनियेत आले.
बोटांचे ठसे आणि फॉरेन्सिक अहवालाच्या आधारे पोलिसांनी अनेक ठिकाणी रंगा-बिल्लाची छायाचित्रे लावली. वर्तमानपत्रातही त्यांची छायाचित्रे छापून आली. रस्त्यापासून रेल्वे स्थानकापर्यंत पोलीस त्याचा साध्या वर्दीमध्ये शोध घेत होते. रंगा-बिल्लाच्या हे लक्षात आले होते.
घटनेनंतर रंगा आणि बिल्ला दिल्लीतून आधी मुंबईला पळाले आणि मग तिथून आग्र्याला गेले. आग्र्याहून दिल्लीला येताना ते कालका मेलमधल्या जवानांच्या डब्यात चढले. पण त्यांनी एक चूक केली. ती ट्रेनची बोगी लष्कराच्या जवानांसाठी होती. तिथे या दोघांचं भांडण झालं आणि जवानांनी त्यांना आयकार्ड मागितलं. तेव्हा जवानांना संशय आला की काहीतरी काळंबेरं आहे. जवानांनी दोघांनाही बांधलं आणि दिल्ली स्टेशन आल्यावर पोलिसांच्या हवाली केलं.
पोलिसांच्या चौकशीत त्याने हळूहळू सर्व माहिती दिली. त्यांनीच अपहरण, बलात्कार केल्याचे कबूल केले. त्या मुलांनी विरोध केला म्हणून त्यांना मारून टाकले असेही सांगितले. त्यांचे डीएनए गोळा करण्यात आले आणि ते गीता आणि संजय अहवालासोबत जुळले. सत्र न्यायालयाने रंगा आणि बिल्लाला फाशीची शिक्षा सुनावली. यानंतर उच्च न्यायालयानेही सत्र न्यायालयाच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले, पण तेथूनही त्यांना दिलासा मिळाला नाही. त्यांची फाशीची शिक्षा कायम ठेवण्यात आली.
३१ जानेवारी १९८२ च्या सकाळी रंगा आणि बिल्ला यांचे चेहरे काळं कापड टाकून झाकण्यात आले. त्यांच्या गळ्यात फाशीचा दोर अडकण्यात आला आणि त्यांना फाशी देण्यात आली. असं म्हणतात फाशी दिल्यावर दोन तासांनंतर सुद्धा रंगाची नाडी सुरू होती. पण बिल्लाचा लगेच मृत्यू झाला होता. रंगा आणि बिल्ला दोघांपैकी एकाचेही कुटुंबीय त्यांचे मृतदेह घेण्यासाठी पुढे आले नाही. अखेर जेलमध्येच दोघांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले.
गीता आणि संजय चोप्रा या दोघांनी न घाबरता या गुंडांचा प्रतिकार केला त्या प्रीत्यर्थ त्यांना ५ एप्रिल, १९८१ ला कीर्ती चक्र पुरस्कार घोषित झाला. तसेच गीता आणि संजय चोप्रा त्या दोन्ही शूर मुलांच्या नावाने शौर्य पुरस्कार घोषित झाला, जो आजही दिला जातो. हा शौर्य पुरस्कार भारतातील १६ वर्षाखालील २५ शूर मुलांना दरवर्षी प्रजासत्ताकदिनाच्या आदल्या दिवशी म्हणजेच २५ जानेवारीला दिला जातो. कठीण प्रसंगात आपले अतुलनीय शौर्य दाखवणाऱ्या बालकांची निवड या पुरस्कारासाठी केली जाते. पदक, प्रमाण पत्र आणि रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरस्कारप्राप्त मुले प्रजासत्ताक दिनानिमित्त नवी दिल्ली येथे होणाऱ्या संचलनातही सजवलेल्या हत्तीवरून सहभागी होतात.
शीतल दरंदळे