इंटरनेटच्या जमान्यात न्यूयॉर्कमधल्या अतिश्रीमंतांना लुबाडणाऱ्या १९ वर्षांच्या ॲनाची खरी गोष्ट तर जाणून घ्या!!
'दुनिया झुकती हैं, झुकानेवाला चाहिये', ही हिंदी म्हण तुम्ही अनेकदा ऐकली, वाचली असेल. एकाच वेळी शेकडो हजारो लोकांना चुना लावून पोबारा करणाऱ्या अतिहुशार, अतिचाणाक्ष लोकांच्या कथा वाचल्यावर ही म्हण किती सार्थ आहे, यावर विश्वास बसतो. विश्वास ठेवा, जगाच्या कुठल्याही कोपऱ्यातील लोक याला अपवाद नाहीत.
ही घटना काही खूप जुनी नाही. अगदी अलिकडच्या, इंटरनेट फोफावलेल्या काळातली ही घटना. हे घडले २०१३ ते २०१७ या काळात, शहर होतं न्यूयॉर्क! न्यूयॉर्कच्या मॅनहटन भागातले उच्चभ्रू लोकही अशाच एका ठग महिलेकडून फसवले गेले. लोकांच्या विश्वासाचा, त्यांच्या स्वप्नांचा आणि त्यांच्या अवाजवी स्वप्नांचा, अपेक्षांचा गैरफायदा घेऊन आपली झोळी भरणाऱ्या ॲना सोरोकिन नावाच्या अवघ्या १९ वर्षांच्या मुलीने लोकांना २,७५,०००डॉलर्सचा चुना लावला. साधेभोळे गरीब लोक एकवेळ अशा एखाद्या जाळ्यात अडकून फासले तर ठीक आहे. पण स्वतःला उच्चशिक्षित, सुसंस्कृत आणि समाजाचे उध्वर्यू समजणारे लोकही अशाप्रकारच्या दिखाव्याला फसतात म्हणजे काय? आश्चर्यच ना?
ॲनाच्या या कारानाम्यावर बेतलेली एक वेबसिरीज नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाली आहे. साधीसरळ असल्याचा आव आणणाऱ्या या ॲनाने न्यूयॉर्कच्या बड्याबड्या लोकांना आपल्या जाळ्यात किती अलगद फसवलं हे पाहून आपल्यालाही धक्का बसेल.
ॲना जन्माने रशियन होती. पण शालेय शिक्षणासाठी ती जर्मनीला गेली. तिचे वडील एक ट्रक ड्रायव्हर होते. शिक्षण पूर्ण झाल्यावर तिने कशीबशी पॅरिसच्या पर्पल मॅगेझीनमध्ये शिकाऊ उमेदवार म्हणून एन्ट्री केली. परंतु ऑफिसमधील सहकाऱ्यांशी तिचे अजिबात जमत नसल्याने पर्पल मॅगेझीनने तिला पॅरिसहून न्यूयॉर्कला पाठवले.
न्यूयॉर्कमध्ये आल्यानंतर ॲनाने सर्वात आधी आपल्या नावात बदल केला. ॲना सोरोनीनचा तिने ॲना डेल्व्हे असा आपल्या नावात बदल करून घेतला. यामागे तिचा खरोखरच काही हेतू होता की लोकांना लुबाडूनच तिला मोठं व्हायचं होतं हे नक्की सांगता येत नाही. कारण ज्यावेळी तिला फसवणूकीच्या आरोपाखाली अटक झाली तेव्हा तिचं म्हणणं होतं की हे सगळं तिनं तिचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी केलं. फक्त पैसा कमावणे हा तिचा उद्देश कधीच नव्हता. आता खरं खोटं काय हे नेमकं तीच जाणो.
न्यूयॉर्कमध्ये आल्यानंतर ॲनाला अचानकच आर्ट गॅलरी उभारण्याची कल्पना सुचली. ॲनाची ही कल्पना न्यूयॉर्कमधल्या अतिश्रीमंत लोकांना आकर्षित करणारी. आपली ही कल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी ॲनाकडे पुरेसं भांडवल नव्हतं. हे भांडवल उभारण्यासाठी तिला एक भन्नाट कल्पना सुचली. तिने लोकांना सांगितलं की ती जर्मनीतील एका धनाढ्य माणसाची एकुलती एक मुलगी असून तिच्या नावावर स्विस बँकेत भरपूर मोठी रक्कम पडून आहे. हा पैसा तिला वापरात आणायचा असल्याच्या बाता ती नेहमी मारायची. पण प्रत्यक्षात तिला काही ते शक्य झालं नाही. कारण असा कुठलाच पैसा तिच्या नावे बँकेत पडून नव्हता.
आपण श्रीमंत आहोत हे लोकांना पटावे म्हणून ॲना लोकांना भरपूर मोठ्या रकमेची टीप देत असे. मोठमोठ्या हॉटेलात जाणं, मोठमोठ्या लोकांशी मिटिंग अरेंज करणं, सतत उच्चभ्रू वर्तुळात वावरणं त्यामुळे कुणालाच ॲना जे काही सांगते त्याबद्दल कुणालाही कसलाही संशय आला नाही. जाईल तिथे छोट्या-छोट्या गोष्टींसाठी लोकांना टीप दिल्याने लोकांना खरच वाटलं की ॲना गर्भश्रीमंत कुटुंबातील असावी. उबरच्या ड्रायव्हरला देखील ती १००डॉलर्सची टीप देत असे. इतकंच काय, पण तिच्या सोबत जाणाऱ्या व्यक्तीचा खर्चही ती स्वतःच करत असे. अगदी छोट्या छोट्या गोष्टींसाठीही इतरांची बिलं तीच पे करायची. पण, एवढा पैसा ती आणायची तरी कुठून?
खरी गोम इथेच आहे, तिच्याकडे पैसे नसतानाही तिने आपल्याकडे भरपूर पैसे असल्याचा बनाव केला. जिथे तिथे उधार-उसनवार करून डोक्यावर कर्जाचा डोंगर उभा केला आणि प्रत्यक्षात जेव्हा तिची ही उधारी वसूल करण्याची वेळ आली तेव्हा सगळ्यांनाच मोठा धक्का बसला. यात मॅनहटन शहरातील बड्या उद्योगपतींपासून मोठमोठ्या हॉटेल्सचाही समावेश होता.
चीनचा प्रसिद्ध संग्राहक मिचेल शुफू हॉंगने एकदा ॲनाला त्याच्यासोबत एका कार्यक्रमात येण्याचे आमंत्रण दिले. त्याच्या विनंती वरुन ॲना त्या कार्यक्रमाला हजर राहिली. पण तिचा राहण्या-खाण्याचा सगळा खर्च मिचेललाच उचलावा लागला. मिचेलला हे ॲनाचं हे वागणं खूपच विचित्र वाटलं. इतकी श्रीमंत व्यक्ती स्वतःचा खर्च इतरांवर ढकलून अशी बिनधास्त कशी राहू शकते. अर्थात ॲनाने नंतर त्याने केलेला खर्च परत केला, तरीही मिचेलच्या मनातून ही सल काही केल्या गेली नाही.
हळूहळू सगळ्यांनाच थोड्याफार फरकाने असाच अनुभव येऊ लागला. आधी आपल्यावर पैसे उधळणारी ॲना खरी की आता आपल्याला खर्चात पाडणारी ॲना खरी? लोकं संभ्रमात पडू लागले.
'ॲना डेल्व्हे' फौंडेशन उभारण्यासाठी तिने बँकांकडे मोठ्या रकमेच्या कर्जाची मागणी केली होती. तिच्या योजना काही लहानसहान नव्हत्या. या फौंडेशनच्या बिल्डींगपासून ते तिथे दिल्या जाणाऱ्या सगळ्या सुखसोयीपर्यंत तिचं सगळं नियोजन एकमद भन्नाट आणि भारदस्त होतं
या काळात ती व्हॅनिटी फेअरची संपादिका रेचेल विल्यम्सच्या संपर्कात आली. मोठमोठ्या लोकांशी ओळखी करणं, त्या वाढवणं आणि अगदी मैत्रीयुक्त संबंध प्रस्थापित करणं ॲनाला सहज शक्य होतं. ॲना रेचेलसोबत एकदा मोरोक्कोच्या ट्रीपवर गेली असताना रेचेलला देखील अगदी मिचेलसारखाच अनुभव आला. हॉटेलचे बिल पे करताना ॲनाच्या कार्डवरून बिल पे होत नव्हते. आता रेचेलची मोठीच गोची झाली. शेवटी तिथून बाहेर पाडण्यासाठी म्हणून रेचेलने स्वतःचे कार्ड्स दिले. या कार्डावरून तिचे ६२,००० डॉलर्स कट झाले.
एवढी मोठी रक्कम पाहून रचेलला धक्काच बसला. ॲनाचा हा खरा चेहरा लोकांसमोर आणण्यासाठी रचेलने एक डाव रचला. आतापर्यंत ॲनाच्या अशा वागण्यामुळे ती पोलिसांच्या रडारवर आलीच होती. त्यात रेचेलनेही तिच्यावर खटला दाखल केला. त्यामुळे ॲना पुरती फसली.
ॲना अनेक ठिकाणी चेक्स द्यायची आणि बहुंताश वेळा हे चेक बाउन्स होत. यामुळं ॲनाचं पितळ उघड पडलं आणि तिला तुरुंगात जावं लागलं. न्यायालयाने तिला १२ वर्षांची शिक्षा ठोठावली. पण ती २०२१मध्ये परोलवर तुरुंगातून बाहेर आली आहे.
अशा या महाठग बाईची कहाणी दाखवण्यासाठी नेटफ्लिक्सनं तिला ३,२०,००० डॉलर्स इतकी रक्कम देऊ केली. या रकमेतून ॲनाने डोक्यावरील कर्जाचं थोडंफार ओझं कमी केलं असलं तरी अजूनही बरीच रक्कम शिल्लक आहे.
तिच्या या कारनाम्यांनी तिला बरीच कुप्रसिद्धी मिळवून दिली आहे.
अजून तिने बर्कशायरच्या मिटिंगला हजर राहण्यासाठी हे खाजगी जेट भाड्यानं घेतलं होतं. त्याचं ३५,००० डॉलर्स भाडं देणं आहे. आता आपल्या डोक्यावरील हे कर्ज आपण काही केल्या फेडू शकत नाही असं तिनं जाहीर केलं आहे.
नेटफ्लिक्समुळे मिळालेल्या प्रसिद्धीचाच काही तरी वापर करून आता ती पुन्हा एकदा सगळ्यांना चुना लावण्यास सज्ज झाली आहे की काय असं वाटतं. ती नेटफ्लिक्सकडून मिळणाऱ्या रकमेतून कर्ज फेडू शकते असा तिच्या वकिलांचा दावा आहे, तर दुसरीकडे आपण न्यायालयाचा दंड आणि वकिलाची फी भरू शकत नसल्याने न्यायालयाने आपल्याला सूट द्यावी असं ॲनाचं म्हणणं आहे.
तिची आर्ट गॅलरीची कल्पना प्रत्यक्षात उतरली आणि नेटफ्लिक्ससारख्या मिडिया पार्टनरसोबत तिचा जो करार झालेला आहे त्यातून ती आरामात अमेरिकेत राहू शकते, असा तिच्या वकिलांचा दावा असून, ज्या लोकांना आपण पुरते संपलो असं वाटतं अशा लोकांसाठी ॲना सोरोकिन एक जिवंत प्रेरणा असल्याचं ते म्हणतात.
आता अशा महाठग लोकांकडून सामान्य जनतेनं काय प्रेरणा घ्यावी? तुम्हीच सांगा.
मेघश्री श्रेष्ठी