computer

जवळपास प्रत्येक व्यवसायात यशस्वी गुंतवणूक करणारा अवलिया व्यावसायिक - सर रिचर्ड ब्रॅन्सन!! पण हा प्रवास तितकाही सोपा नव्हता!!

त्याची शाळेतील प्रगती पाहून त्याच्या मुख्याध्यापकांनी सांगितले की तो एकतर तुरुंगात जाईल किंवा कोट्याधीश होईल. त्याला एडीएचडी (Attention-deficit/hyperactivity disorder) म्हणजे चित्त एकाग्र न करता येणे, अतिक्रियाशीलता आणि आवेगपूर्ण वर्तन अशा समस्या होत्या. त्याच्या नव्या विमान कंपनीच्या एकुलत्या एका विमानाच्या इंजिनात पक्षी घुसले आणि पहिले उड्डाण अयशस्वी झाले. कोकाकोलाचं मार्केट घेण्यासाठी त्याने बनवलेला कोला अगदीच 'पानी कम' निघाला. हाॅट एअर बलूनमधून जगप्रवास त्याच्या जीवावर बेतला. त्याचा ऑनलाईन कार बिझनेस सुरू झाला आणि लगेच बंद पडला. त्याचा डिजिटल प्लॅटफॉर्म 'ॲपल' बरोबर स्पर्धा करू शकला नाही. त्याच्या डोक्यात एका मागोमाग एक अशा भन्नाट कल्पना येत असत, पण त्या साकार व्हायच्या आधीच अयशस्वी होत होत्या.

ही गोष्ट आहे सर रिचर्ड चार्ल्स निकोलस ब्रॅन्सन यांची. त्यांचा जन्म १८ जुलै १९५० रोजी ब्लॅकहीथ, लंडन येथे झाला. त्यांची आई इव्ह ब्रॅन्सन ही माजी बॅले डान्सर व एअर होस्टेस होती आणि त्यांच्या वडिलांचं नांव एडवर्ड जेम्स ब्रॅन्सन बॅरिस्टर होतं. लिंडी ब्रॅन्सन आणि व्हेनेसा ब्रॅन्सन या त्यांच्या दोन लहान बहिणी. रिचर्ड ब्रॅन्सन हा एक ब्रिटिश अब्जाधीश, उद्योजक आणि व्यावसायिक मॅग्नेट आहे. १९७० च्या दशकात त्यांनी व्हर्जिन ग्रुपची स्थापना केली आणि हा ग्रुप आज विविध क्षेत्रातील ४०० हून अधिक कंपन्यांचे नियंत्रण करतो.

ब्रॅन्सनने तरुण वयातच उद्योजक होण्याचं स्वप्न पाहिलं. वयाच्या १६ व्या वर्षी त्यांचा पहिला व्यवसाय होता 'स्टुडंट' नावाचं मासिक. १९७२ मध्ये त्यांनी व्हर्जिन रेकॉर्ड्स नावाच्या रेकॉर्ड स्टोअर्सची एक साखळी उघडली. ही नंतर व्हर्जिन मेगास्टोअर्स म्हणून ओळखली गेली. ब्रॅन्सनचा व्हर्जिन ब्रँड १९८० च्या दशकात वेगाने वाढला, कारण त्यांनीने व्हर्जिन अटलांटिक एअरलाइन सुरू केली आणि व्हर्जिन रेकॉर्ड्स म्युझिक लेबलचा विस्तार केला. १९९७ मध्ये ब्रॅन्सनने ब्रिटिश रेल्वेच्या खाजगीकरणादरम्यान पॅसेंजर रेल्वे फ्रँचायझींसाठी बोली लावण्यासाठी व्हर्जिन रेल ग्रुपची स्थापना केली. २००४ मध्ये त्याने स्पेस टुरिझमसाठी डिझाइन केलेल्या स्पेसशिप-टू सबऑर्बिटल स्पेसप्लेनसाठी प्रसिद्ध असलेली व्हर्जिन गॅलॅक्टिक ही कंपनी स्थापना केली.

मार्च २००० मध्ये ब्रॅन्सन यांना बकिंगहॅम पॅलेस येथे "उद्योजकतेची सेवा" यासाठी 'नाइटहुड' सन्मान देण्यात आला. हा सन्मान ब्रिटनमध्ये खास समजला जातो. रिटेल, संगीत आणि वाहतूक, अर्थात जमीन, हवाई, समुद्र आणि अंतराळ प्रवासामुळे, तसेच आणि मानवतावादी कार्यासाठी ब्रॅन्सन एक प्रमुख जागतिक व्यक्ती बनले आहेत. २००७ मध्ये त्यांना "टाइम" मासिकाने जगातील १०० सर्वात प्रभावशाली लोकांच्या यादीत स्थान दिले.

ख्रिसमसची झाडं वाढवण्याचा आणि विकण्याचा अयशस्वी प्रयत्न केल्यानंतर, ब्रॅन्सनने १९६६ मध्ये 'स्टुडंट' नावाचे मासिक सुरू केले. पहिला अंक जानेवारी १९६८ मध्ये प्रकाशित झाला. सुरुवातीला त्याच्या अपेक्षेइतके यश मिळाले नसले तरी ब्रॅन्सनने स्टुडंट मासिकाचा उपयोग लोकप्रिय अल्बमची जाहिरात करण्यासाठी केला, ज्यामुळे त्याची विक्रमी विक्री झाली. नंतर त्याने लंडनमधील ऑक्सफर्ड स्ट्रीटवर रेकॉर्डचे दुकान सुरू केले.

१९७२ मध्ये त्याच्या रेकॉर्ड स्टोअरमधून कमावलेल्या पैशाने ब्रॅन्सनने स्वतःचे रेकॉर्ड लेबल 'व्हर्जिन रेकॉर्डस' लॉन्च केले. "व्हर्जिन" हे नांव त्याच्या एका कर्मचार्‍याने सुचवले होते. ब्रॅन्सनने ऑक्सफर्डच्या उत्तरेला एक कंट्री इस्टेट विकत घेतली. या जागेत त्यांनी 'द मॅनर' हा रेकॉर्डिंग स्टुडिओ सुरू केला. नवीन कलाकारांना स्टुडिओ भाड्याने दिला जात असे. मल्टी-इंस्ट्रुमेंटलिस्ट माइक ओल्डफिल्डचा पहिला अल्बम 'ट्युब्युलर बेल्स' व्हर्जिन रेकॉर्डचा पहिला रिलीज होता आणि तो बेस्ट-सेलर बनला. व्हर्जिन रेकॉर्ड्सने 'सेक्स पिस्तूल' सारख्या वादग्रस्त बँडला स्पाॅन्सर केले, ज्याला इतर कंपन्या स्पाॅन्सर करण्यास नाखूष होत्या. रोलिंग स्टोन्स, पीटर गॅब्रिएल, एक्सटसी जपान, यूबीफाॅर्टी, स्टीव्ह विनवूड आणि पॉला अब्दुल यांच्यासारख्या इतर कलाकारांना प्रोत्साहन दिले आणि जगातील सर्वात मोठे स्वतंत्र रेकॉर्ड लेबल बनले. फॉस्ट आणि कॅन सारख्या कमी माहित असलेल्या संगीताला लोकांसमोर आणल्याबद्दलही व्हर्जिन रेकॉर्ड्सने प्रशंसा मिळवली. व्हर्जिन रेकॉर्ड्सने कल्चर क्लबचीही संगीत जगताशी ओळख करून दिली.

ब्रॅन्सनचा एअरलाईन उद्योगातील प्रवेशाचा पहिला यशस्वी प्रयोग प्युअर्टो रिकोच्या प्रवासादरम्यान झाला. त्यांचे उड्डाण रद्द झाल्यामुळे त्यांनी उर्वरित प्रवास स्वतःच्या चार्टर विमानाने करण्याचा निर्णय घेतला आणि बाकीच्या अडकलेल्या प्रवाशांना किरकोळ शुल्क भरून प्रवासाची ऑफर दिली.
१९९४ मध्ये ब्रॅन्सनने व्हर्जिन अटलांटिक आणि व्हर्जिन कार्गोची आणि १९९६ मध्ये व्हर्जिन हॉलिडेजची स्थापना केली. १९९७ मध्ये व्हर्जिन रेल ग्रुपने इंटरसिटी क्रॉसकंट्री आणि इंटरसिटी वेस्ट कोस्ट फ्रँचायझी जिंकल्या. काही काळानंतर व्हर्जिन अटलांटिक आणि ब्रिटिश एअरवेज यांच्यात तणाव निर्माण झाला. त्यानंतर व्हर्जिनने ब्रिटिश एअरवेजवर प्रवासी त्यांच्याकडे वळवल्याचा, संगणक हॅक केल्याचा आणि व्हर्जिनचे नकारात्मक चित्रण करणाऱ्या बातम्या प्रेसमध्ये दिल्याचा आरोप केला. शेवटी ब्रिटिश एअरवेजने ब्रॅन्सनना ५००,००० पौंड देऊन प्रकरण निकाली काढले, शिवाय ३ दशलक्ष पौंड कायदेशीर शुल्क भरले. ब्रॅन्सनने ती रक्कम त्याच्या कर्मचाऱ्यांमध्ये वितरित केली.

ब्रॅन्सनचा पुढील उपक्रम होता व्हर्जिन फ्यूएल्स. ग्लोबल वॉर्मिंगला प्रतिसाद देण्यासाठी आणि ऑटोमोबाईल्ससाठी आणि नजीकच्या भविष्यात विमानांसाठी क्रांतिकारी, स्वस्त इंधनाचा पुरवठा करण्याच्या हेतूने व्हर्जिन फ्यूएल्सची स्थापना करण्यात आली होती. काही काळानंतर ब्रॅन्सनने त्याची व्हर्जिन मोबाइल कंपनी यूके केबल टीव्ही, ब्रॉडबँड टेलिफोन कंपनीला ९०० मिलियन पौंडांमध्ये विकली. ८ फेब्रुवारी २००७ रोजी व्हर्जिन मीडिया नावाने एक नवीन कंपनी मोठ्या धूमधडाक्यात आणि मोठ्या प्रसिद्धीसह सुरू करण्यात आली. ब्रॅन्सनकडे व्हर्जिन मोबाइलची तीन चतुर्थांश भागिदारी होती; आता त्याना व्हर्जिन ब्रँड नेम वापरण्याची परवानगी देण्यासाठी दरवर्षी ८.५ दशलक्ष पौंड पगार मिळतो.

२००६ मध्ये ब्रॅन्सनने व्हर्जिन कॉमिक्स आणि व्हर्जिन ॲनिमेशनची स्थापना केली. ही एक मनोरंजन कंपनी आहे. ती जागतिक प्रेक्षकांसाठी नवीन कथा आणि पात्रे असलेले ॲनिमेशन चित्रपट बनवते. कंपनीची स्थापना लेखक दीपक चोप्रा, चित्रपट निर्माता शेखर कपूर, उद्योजक शरद देवराजन आणि गोथम चोप्रा यांच्यासोबत झाली होती. ब्रॅन्सनने १ फेब्रुवारी २००७ रोजी व्हर्जिन हेल्थ बँक सुरू केली, ज्यामुळे पालकांना त्यांच्या बाळाच्या नाभीसंबधीच्या रक्तातील स्टेम पेशी खाजगी आणि सार्वजनिक स्टेम-सेल बँकांमध्ये संग्रहित करण्याची संधी मिळाली.

असं जवळपास एकही क्षेत्र नाही ज्यात रिचर्ड ब्रॅन्सन या हरहुन्नरी व्यावसायिकाने गुंतवणूक केली नाही, आणि त्याचा प्रवास असाच सुरू राहणार आहे.

सबस्क्राईब करा

* indicates required