भारतीय बुद्धीबळातल्या हत्तीचं उंट, हेर, बिदूषक आणि शेवटी जगभर बिशप म्हणून नामकरण कसं झालं याची सुरस कथा!!
उन्हाळ्याच्या सुट्टीत खेळल्या जाणाऱ्या पेटंट बैठ्या खेळांपैकी एक म्हणजे बुद्धिबळ! ६४ घरांच्या ह्या खेळात राजा, हत्ती, घोडा ह्या सगळ्यांची रूपं वेगळी, चाली वेगळ्या! तरीही कोणत्याही नवशिक्या खेळाडूच्या मनात एका मोहऱ्याबद्दल कुतूहल असतंच: तो म्हणजे उंट! त्याचं कारण म्हणजे उंटाच्या डोक्यावर असलेली खाच! ह्या खाचेमागचं कोडं उलगडणारा हा लेख…
हे कोडं सोडवण्यासाठी आपण जरा मागे जाऊया. बुद्धिबळाचा उगम जरी भारतात झाला असला, तरी त्याला आज असलेलं स्वरूप मिळण्यासाठी खूप वर्षं जावी लागली. ह्या खेळाचं मूळ रूप म्हणजे चतुरंग! हा खेळ दोनऐवजी चारजणांमध्ये खेळला जाई. प्रत्येक खेळाडूकडे राजा आणि चार सैन्यदलं असत. आता प्राचीन भारतामध्ये युद्धात नेहमी पायदळ (Infantry), घोडदळ (Cavalry), रथदल (Chariots) आणि गजदल (Elephantry) ही चार सैन्यदलं वापरली जात. त्यामुळे हेच सैन्य पटावरही उभं राहिलं. राजा, प्यादी आणि घोडे ह्यांच्या चाली आजच्या बुद्धिबळाप्रमाणेच होत्या. पण रथ मात्र आजच्या बुद्धिबळातल्या हत्तीप्रमाणे चालत, आणि हत्ती मात्र आजच्या बुद्धिबळातल्या उंटाप्रमाणे!!
सुरुवातीला हे मोहरे अत्यंत कलाकुसरीने कोरून बनवले जात, पण हे काम होतं वेळखाऊ! म्हणून हत्तीच्या मोहऱ्याला अशी खाच दिली जाऊ लागली. ह्या खाचेने झालेले दोन भाग हत्तीच्या सोंडेचे आणि तोंडाचे प्रतीक झाले. काहींच्यामते खाचेने हत्तीचे दोन सुळे दाखवले जात. अशा रीतीने हत्तीच्या मोहऱ्याला अशी खाच दिली जाऊ लागली. आजही बंगाली, कन्नड, मल्याळम ह्या भाषांमध्ये उंटाच्या मोहऱ्याला हत्तीच म्हटलं जातं!!
हळूहळू हा खेळ भारतभर पसरला. हा खेळ इतका लोकप्रिय झाला, की त्याने भारतात आलेल्या अरबी लोकांचंही लक्ष वेधून घेतलं. आता अरबी लोक पडले व्यापारी! त्यामुळे त्यांच्याद्वारे हा खेळ अल्पावधीतच जगभर पोहोचला. आता प्रॉब्लेम असा झाला की आपल्या चतुरंगातला हत्ती विदेशी लोकांना समजेना, कारण युरोपात हत्ती कुठून येणार? म्हणून मग त्यांनी हत्तीच्या मोहऱ्याला आपल्याला हवं तसं नाव देऊन खेळायला सुरुवात केली. मंगोलिया हा वाळवंटातील देश, त्यामुळे मंगोलियन भाषेत हत्तीचा उंट झाला. जर्मन, डच, फिनिश, हिब्रू, लॅटिन भाषांमध्ये त्याचा जासूद किंवा हेर झाला. रोमानिअन, फ्रेंच भाषांमध्ये त्याचा विदूषक (Jester) झाला.
आता काही युरोपीय लोकांनी आपल्या हत्तीच्या डोक्यावरच्या खाचेकडे लक्ष वळवलं. आणि गंमत म्हणजे असा खाच असलेला मोहरा बघून त्यांना आठवण झाली कॅथलिक धर्मगुरूंच्या टोपीची!! म्हणून त्यांनी आपल्या हत्तीचा केला बिशप (कॅथलिक धर्मगुरू)!! हळूहळू हत्ती बाजूला राहिला, आणि बिशप प्रचारात आला आणि जगभरात मान्यता पावला!!
काय मग, कशी वाटली ह्या वक्रगती उंटाची… आय मीन, हत्तीची कथा? कंमेंटबॉक्समध्ये आम्हाला जरूर सांगा बरं का!
लेखकःप्रथमेश बिवलकर