computer

सुरस आणि चमत्कारिक किस्से - भाग २ : नात्यांतल्या नात्यात लग्न केल्याने बुडालेली बलाढ्य साम्राज्ये!

सुरस आणि चमत्कारिक किस्से - भाग १ : नात्यांतल्या नात्यात लग्न केल्याने बुडालेली ५ बलाढ्य साम्राज्ये!

एक गाव असतं. गावात एक जोडपं असतं. दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम असतं. दोघेही लग्न करायचं ठरवतात. समस्या अशी असते की दोघांमध्ये रक्ताचं नातं असतं, त्यामुळे लोकांचा त्यांच्या लग्नाला विरोध असतो. गावात एक दंतकथा प्रसिद्ध असते. रक्ताच्या नात्याने जोडलेल्या मुला-मुलीत लग्न झालं तर त्यांच्या पोटी घोरपड जन्मेल किंवा काहीतरी वाईट घडेल. त्यांच्याच कुटुंबातील एकाने असा प्रयत्न केला होता तेव्हा जन्मेलेलं मुल डुकराचं शेपूट घेऊन जन्मलं होतं.

पण दोघेही आपल्या मतांवर ठाम राहतात. ते गाव सोडतात. त्यांच्यासोबत गावातली काही इतर कुटुंबंही गाव सोडतात. हा नवा कबिला एक नवीन गाव वसवतो. कालांतराने गावाचं रुपांतर शहरात होतं, समृद्धी येते. पण एकाच रक्तात लग्न झाल्याने त्यांच्या भाग्यात जे लिहिलेलं असतं ते टळत नाही. त्यांची मुलं सुदृढ जन्मतात, मात्र त्यांनी वसवलेलं गाव १०० वर्षांच्या आतच वादळाने या पृथ्वीवरून कायमचं नष्ट होतं. दोघांच्या पोटची एकही पिढी अस्तित्वात राहत नाही. ती माणसं आणि ते गाव कधी नव्हतंच अशा प्रकारे लोक त्यांना कायमचं विसरतात.

कोलंबियन लेखक Gabriel García Márquez यांच्या One Hundred Years of Solitude या कादंबरीचं हे कथानक आहे. हे कथानक सुरु होतं एकाच रक्तात जन्मलेल्या जोडप्यापासून आणि त्याचा शेवट भयानक वादळात होतो. या वादळाच्या मुळाशी आहे inbreeding. सुरुवातीला हे कथानक द्यायचं कारण असं की ही केवळ काल्पनिक कथा असली तरी जगात inbreeding मुळे मोठमोठी घराणी उध्वस्त झाल्याची अनेक उदाहरणं आढळतात. या घटनांनी जगाचा इतिहास बदलला आहे. अशा ५ राजकीय व्यक्तींबद्दल आम्ही तुम्हाला मागील भागात माहिती दिली होती. आजचा लेख त्याचा पुढचा भाग असणार आहे.

चला तर सुरु करूया.

६. पोर्तुगालची राणी मारिया (मारिया दि मॅड) (१७३४-१८१६)

पोर्तुगालच्या राणीच्या कुटुंबात नात्यांतल्या नात्यात लग्न करण्याची मोठी परंपरा होती. तिने स्वतः आपल्या मामाशी लग्न केलं होतं. ही राणी आपल्या वेडसर स्वभावासाठी ओळखली जाते. याला inbreeding हे कारण होतं की नाही हे कोणालाच सांगता आलेलं नाही. तिचा स्वभाव कसा होता हे जाणून घेऊ.

मारिया ही किंचाळण्यासाठी प्रसिद्ध होती. ती जनावारांसारखा आवाज काढायची. तिचा रागही प्रचंड होता. तिचं वेडेपण एवढं वाढलं होतं की डॉक्टरला बोलावण्यात आलं. हा डॉक्टरही साधा नव्हता. या डॉक्टरचं नाव होतं डॉक्टर फ्रान्सिस विल्स. त्याने इंग्लंडच्या तृतीय जॉर्ज या वेड्या राजावर उपचार केले होते.

मारियाला त्याने अघोरी उपाय सुचवले. उदाहरणार्थ बर्फाळ पाण्यात अंघोळ करणे, त्वचेवर मुद्दाम पाणी भरलेले फोड तयार करणे, तसंच पोट साफ करणारं औषध पिणे इत्यादी. यातला कोणताही उपाय राणीला बरा करू शकला नाही. तिच्या विकृतींमुळे तिला दरबारात हजर राहता यायचं नाही. तिने आपला एक प्रतिनिधी निवडला होता, पण त्याला काही हा राज्यकारभार जमलाच नाही. अशा या राज्याच्या दुर्बलतेचा फायदा फ्रान्सने उचलला आणि पोर्तुगालवर आक्रमण केलं. राणीला देश सोडून ब्राझीलला पळून जावं लागलं. तिथेच तिचा मृत्यू झाला.

७. तुतनखामेन (इसविसनपूर्व १३४२ ते १३२५)

युरोपियन्सकडून आता आफ्रिकेत जाऊया. तुतनखामेन हा इजिप्तचा सर्वात प्रसिद्ध राजा. नाईल नदीच्या किनाऱ्यावर Valley of the Kings या राजांच्या समाधीस्थळी त्याची कबर आढळून आली होती. त्याच्या ममीचा अभ्यास केला असता असं दिसून आलं की त्याला जन्मतःच शारीरिक व्याधी होत्या. त्याच्या डोक्याची कवटी बेढब होती, पाय अधू होता आणि पाठीला बाक आला होता. या शारीरिक विकृतींचं कारण होतं inbreeding म्हणजे नात्यांतल्या नात्यात झालेली लग्नं.

शास्त्रज्ञांच्या मते प्राचीन इजिप्शियन संस्कृतीत बहिण भावांमध्ये लग्न करण्याची प्रथा होती. याखेरीज चुलतभावंडांमध्ये आणि पुतणी/भाचीशी देखील लग्नं व्हायची. इजिप्शियन देवतांच्या कथेतही बहिण भावाच्या लग्नाशी जोडलेली एक कथा सांगितली जाते. असं म्हणतात की या कथेच्या आधारावरच खऱ्या आयुष्यातही अशी लग्नं व्हायची. या प्रकारामुळे पुढच्या पिढीचं नुकसान मात्र झालं. तुतनखामेन अवघे १० वर्षे राज्य करू शकला आणि वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी तो मरण पावला.

 

फोटो स्टोरी : इजिप्शियन राजाच्या थडग्यावरच्या ३०००वर्षं जुन्या दोरखंडामागे आहे एवढा मोठा इतिहास!!

८. बव्हेरियाचा (द्वितीय) लुडविग (१८४५ ते १८८६)

मागच्या भागात आम्ही ज्या हॅब्सबर्ग्स घराण्याचा उल्लेख केला होता, त्याच घराण्याच्या एका शाखेत बव्हेरियाचा राजा (द्वितीय) लुडविग जन्मला. कुटुंबाला आपापसांतल्या लग्नांचा मोठा वारसा लाभला होता. लुडविगनेही हा वारसा पुढे चालवला. तो जन्मतःच मानसिक आजार घेऊन जन्माला आला होता. तो जन्मभर आपल्या स्वप्नांच्या आणि विलक्षण कल्पनांचा जगातून कधीच बाहेर पडू शकला नाही. वास्तवाशी त्याचा संबंधच आला नाही किंवा असं म्हणूया की त्याने स्वतः येऊ दिला नाही. तो आपल्याच जगात राहायचा. तो मोठमोठे महाल बांधण्यासाठी प्रसिद्ध होता.

राजाची ही गत, तर प्रजा प्रचंड हलाखीच्या परिस्थितीतून जात होती. परिणामी (द्वितीय)लुडविगला पदच्युत करण्यात आलं. दुसऱ्याच दिवशी त्याचा मृतदेह एका तलावानजीक आढळून आला.

९. नीरो (इसविसन ३७ ते ६८)

"जेव्हा रोम जळत होतं तेव्हा नीरो फीड्ल वाजवत होता” या प्रसिद्ध वाक्यातला नीरो हा व्यक्ती कोणी साधा नव्हता, तो रोमन सम्राट होता. इतिहासात तो या वाक्याखेरीज त्याच्या वेडेपणासाठीही प्रसिद्ध आहे. त्याच्या वेडेपणाविषयी अनेक कथा सांगितल्या जातात.

रोम जळण्यासंबंधातलं वाक्य हे इतिहासातल्या एका खऱ्या घटनेवर आधारित आहे. नीरोच्या कारकिर्दीत रोमला अचानक आग लागली होती. हे इथे सांगण्याचं कारण असं की नीरोच्या वेडेपणाचा दाखला म्हणून ही घटना सांगितली जाते. असं म्हणतात की ही आग नीरोनेच लावली होती आणि आग भडकली तेव्हा तो महालात उभा राहून फीड्ल वाजवत होता.

नीरोचा वेडसरपणा आणि प्रशासनातील ढ कारभार यामुळे जनता भडकली. त्याचे स्वतःचे अंगरक्षकही त्याच्या विरोधात फिरले. त्याला सर्वांसमक्ष जीव जाईपर्यंत मारण्याची शिक्षा सुनावण्यात आली. मात्र शिक्षा अंमलात आणली जाण्यापूर्वीच त्याने स्वतःचा जीव घेतला होता.

१०. ऑस्ट्रियाची राणी एलिझाबेथ (१८३७ ते १८९८)

ऑस्ट्रियाची राणी एलिझाबेथ ही तिच्या सौंदर्यासाठी प्रसिद्ध होती. तिने फ्रांझ जोसेफशी लग्न केलं होतं. दोघेही रक्ताच्या नात्यातले होते. तिचाही संबंध हॅब्सबर्ग्स कुटुंबाशी होता. एलिझाबेथच्या सौंदर्याशिवाय तिच्या विक्षिप्त स्वभावामुळेही ती ओळखली जाते. ती लाजाळू होती आणि आयुष्यभर तिला डिप्रेशन होतं.

तिला ॲनोरेक्सीया नावाचा आजार असल्याचंही म्हटलं जातं. या आजारात माणसाला आपलं वजन वाढेल याची घोर चिंता लागून राहते. असं म्हणतात की एलिझाबेथने आयुष्यभर मोठ्या मुष्किलीने जेवणाला हात लावला. ती अत्यंत कमी खायची आणि अनेक तास व्यायाम करायची.

एलिझाबेथच्या पोटी जन्मलेला मुलगाही वंशपरंपरेने मिळालेला मानसिक रोग घेऊनच जन्मला. त्याने आत्महत्या केली. एलिझाबेथ या धक्क्यातून कधीही वर येऊ शकली नाही. तिने राज्यकारभारातून लक्ष काढून घेतलं आणि प्रवासाला निघाली. इटलीत असताना तिच्यावर हल्ला झाला आणि त्यातच तिला मृत्यूने गाठलं.

तर वाचकहो, कहानी और भी बाकी है. मात्र, आजचा या मालिकेतला हा दुसरा भाग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा!!

सबस्क्राईब करा

* indicates required