computer

सेलमधून शॉपिंग करताना या ४ गोष्टींची खबरदारी घ्यायला विसरू नका भौ !!

ऑनलाइनपासून तर शॉपिंग मॉलपर्यंत सेल दिसला रे दिसला, की अनेकांना स्वतःला आवरणे कठीण होऊन जाते. मग सेल आहे आणि स्वस्तात खरेदी होईल या नादात खिसा केव्हा खाली होतो ते कळत पण नाही. ऑनलाइन ई-कॉमर्स कंपन्या आल्यापासून तर सेलमध्ये खरेदी करण्याचे प्रमाण खूपच वाढले आहे राव!!

भारतात मोठया सणांना भरपूर खरेदी ठरलेलीच असते. या भारतीय मानसिकतेचा फायदा घेऊन भरपूर डिस्काउंट देऊन खरेदी वाढवण्याचा फ़ंडा ऑनलाइन कंपन्यांनी सुरू केला आहे. अमेझॉनचा महाबचत सेल किंवा फ्लिपकार्टचा ऑनलाइन सेल कुणीच त्याला अपवाद नाही राव...पण मंडळी दरवेळी सेलमधील खरेदी फायद्याची ठरेल असे नाही. वेळीच डोकं वापरलं नाही तर हा तोट्याचा सौदा ठरू शकतो...

तर, सेलमधून खरेदी करत असताना कुठल्या गोष्टींची खबरदारी घ्यायला हवी बघूया...

१. ऑफर व्यवस्थित समजून घ्या...

मंडळी, उन्हाळा असो की हिवाळा, कुठे ना कुठे सेल सुरूच असतो. कधी कधी यातून फायदा होतो तर बऱ्याचवेळा यातून नुकसानही होते. तर मंडळी, सुरुवातीला ऑफर समजून घ्या. प्रत्येक कंपनीच्या वेगवेगळ्या टर्म आणि कंडिशन असतात. 

- किती रुपयांची शॉपिंग केल्यावर किती रुपयांचा कॅशबॅक मिळतो?
- कॅशबॅकसाठी परत शॉपिंग करावी लागेल की नाही?
-त्या पैशांचा वापर कसा आणि कुठे करता येईल.
- कुठल्या कुठल्या वस्तूवर ऑफर आहे.
- buy one get one free मध्ये काय काय मिळू शकते?

यासारख्या गोष्टी माहीत करून घेतल्यानंतरच सेलमध्ये शॉपिंग करावी राव!! कधीकधी मॉलमध्ये शॉपिंग करताना त्यांचे सेल्समन नुसत्या ऑफर्स सांगतात पण काही माहिती दडवून ठेवतात आणि पेमेंट काउंटरवर आपल्याला आणखी पैसे द्यावे लागतील हे कळते.

२. कपड्यांची योग्य निवड!

मंडळी बऱ्याचदा सेलमध्ये आऊट ऑफ ट्रेंड, खराब क्वालिटीचे कपडे, जुने सामान, कधीकधी फाटलेले किंवा विरलेले कपडे, एक्सपायर झालेल्या वस्तू विकल्या जातात. त्यामुळे कपडे खरेदी करताना फॅशनचा विचार नक्की करा. मंडळी, ऑनलाइन शॉपिंगचा एक प्रॉब्लम असा असतो कि इथे तुम्ही वस्तू हात लावून बघू शकत नाही. त्यामुळे आलेले कपडे, टॅग्ज नीट तपासून पाहा. कपडे ऑर्डर करताना साईज गाईडनुसारच ऑर्डर करा.

३. लुटीपासून स्वतःला वाचवणे

मंडळी, सेलच्या दरम्यान लोक अक्षरशः तुटून पडताना दिसतात. अशावेळी लुटले जाण्याचा सर्वात जास्त धोका असतो. खरेदी करताना सेल कुठे लागला आहे ते चेक करून घ्या. आजकाल सध्या बऱ्याच फ्रॉड वेबसाईटस निघाल्या आहेत, ते नक्की विश्वासार्ह आहेत का हे पाहून घ्या.  एखादी गोष्ट सेलमध्ये खरेदी करण्याआधी जी गोष्ट खरेदी करायची आहे तिची त्यांच्या वेबसाईटवर जाऊन त्याची खरी किंमत बघून घ्यावी म्हणजे सेलमध्ये तुम्हाला कितीचा फायदा होत आहे ते कळून चुकेल. मॉल किंवा वेबसाईटची रिटर्न पॉलिसी आधी वाचली तर चांगले असते. काही वस्तूंना रिटर्न पॉलिसी नसते, तर काही वेबसाईट रिटर्न तर जाऊदेच, एक्स्चेंज पण करून देत नाहीत. 

फेसबुक मार्केटप्लेस आणि फ्रॉड

फेसबुक मार्केटप्लेस आल्यापासून तर लोक काहींच्या काही चेकाळलेत. जरा तिकडे नजर टाका, सगळ्या गोष्टी १ रुपयांच्याच असतात. एका वस्तूचा एकच फोटो दहा लोकांनी टाकलेला असतो आणि त्याची त्यांनी सांगितलेली किंमतही अविश्वसनीय असते. सर्च रिझल्टमध्ये येण्यासाठी या वस्तूंच्या किंमती इतक्या कमी लावलेल्या असतात, प्रत्यक्षात कोणतीच गोष्ट एका रुपयात येत नाही. इथे खराब क्वालिटीचा माल गळ्यात मारणे, एक वस्तू दाखवून दुसरीच देणे असले प्रकार सर्रास घडतात. तेव्हा विकणाऱ्याचे रेटिंग पाहा, प्रोफाइलवर जाऊन त्याला किंवा तिला आलेल्या कमेंट्स पाहा.

किमान एखाद्या फसवल्या गेलेल्या व्यक्तीने तिथे काहीतरी कमेंट केली असण्याची शक्यता असते. कॅश ऑन डिलीव्हरीमध्ये तुमचे पैसे वाया न जाता वस्तू मिळते, पण ती वस्तू खरोखरी त्या लायकीची आहे की नाही ते तपासा आणि मगच पैसे द्या. नाहीतर सरळ डिलीव्हरी नाकारा.

मग, कशा वाटल्या या टिप्स? तुम्ही सेलमध्ये खरेदी करण्यापूर्वी कुठली काळजी घेता हे आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये कळवा...

सबस्क्राईब करा

* indicates required