परमवीरचक्र, अशोकचक्र, महावीरचक्र, कीर्तीचक्र, शौर्यचक्र कुणी डिझाईन केली आहेत माहित आहे का?
या सर्व प्रश्नांचं उत्तर एकच आहे असं म्हटलं तर तुम्हांला पटेल? पण खरंच, या सर्व पदकांचं संकल्पनाचित्र एकाच व्यक्तीनं बनवलं आहे बरं.. एव्ह य्वोन मॅदे दे मॅरॉस (Eve Yvonne Maday de Maros) हे नांव कधी ऐकलंय? बरं, सावित्रीबाई खानोलकर हे नांव तरी ऐकलंय? नसेलच. कोण आहेत या दोन बायका आणि आपल्या भारतीय मिलिटरीमधल्या शौर्य पदकांचा आणि यांचा काय संबंध??
तर, या दोन वेगवेगळ्या बायका नाहीत बरं.. स्वित्झर्लंडमध्ये जन्मलेल्या एव्ह य्वोन मॅदे दे मॅरॉसनं मराठी माणूस विक्रम रामजी खानोलकरांशी लग्न केलं आणि त्या सौ. सावित्रीबाई खानोलकर झाल्या. २० जुलै १९१३मध्ये जन्मलेल्या इव्हला १९२९मध्ये म्हणजेच भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी विक्रम खानोलकर भेटले. अवघ्या १६ वर्षांची इव्ह खानोलकरांच्या प्रेमात पडली. त्यांचे बाबा मुलीला इतक्या दूरदेशात पाठवायला तयार नव्हते, पण इव्हला मात्र आपल्या प्रेमावर चांगलाच विश्वास होता. शेवटी १९३२मध्ये इव्ह लखनौला आल्या आणि त्यांचं लग्न झालं.
( मेजर जनरल विक्रम खानोलकर आणि सावित्रीबाई खानोलकर- स्रोत )
इव्ह भारतात आल्यावर मराठी, संस्कृत आणि हिंदी या तीनही भाषा अस्खलित बोलायला शिकल्या. इतकंच नाही, तर त्या भारतीय संगीत, नृत्य आणि चित्रे काढायलाही शिकल्या. त्या इथल्या मातीशी इतक्या समरस झाल्या की त्यांचा जन्म चुकून युरोपात झाला असं त्या म्हणत असत. हिंदू पुराणकथा, शिल्पकला, प्राचीन भारताचा इतिहास आणि इथल्या आख्यायिकांचा त्यांचा गाढा अभ्यास होता.
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मेजर जनरल हिरा लाल अटल यांच्यावर भारतीय लष्कराच्या नव्या पदव्यांची नामकरणे आणि त्यांची पदके डिझाइन करणे ही महत्त्वाची कामगिरी सोपवण्यात आली होती. त्यांना सावित्रीबाई खानोलकरांच्या हिंदू पुराणे, वेद आणि संस्कृतीच्या ज्ञानाबद्दल खात्री होती. त्या या पदकांमध्ये भारतीय संस्कृतीचे गुणविशेष नक्की आणतील ही अटलजींना खात्री होती.
लष्करात सर्वात मोठं समजलं जाणारं परमवीर चक्र हे पदक कांस्य धातूत बनवलेलं आहे. त्याच्या मध्यभागी उठावदार वर्तुळावर भारताची राजमुद्रा आहे, तर चारही बाजूंना चार तलवारी आहेत. या तलवारी शिवरायांच्या भवानी तलवारीचं प्रतिनिधित्व करतात असं म्हटलं जातं. तर काही ठिकाणी हे इंद्राचं दुहेरी वज्र आहे असंही मानलं जातं. या पदकाला ३२मिलीमीटरची जांभळी रिबन लावलेली असते.
योगायोगानं पहिलं परमवीर चक्र सावित्रीबाई खानोलकरांचे जावई मेजर सोमनाथ शर्मा यांना देण्यात आलं होतं. परमवीर चक्र हे भारत रत्न या सर्वोच्च भारतीय पुरस्काराच्या खालोखाल मानलं जातं. परमवीर चक्रानंतर हा मान अशोक चक्राकडे जातो. लष्करातल्या शौर्याबद्दल दिलं जाणारं हे पदक बरेचदा मरणोत्तर दिलं गेलं आहे आणि आजवर केवळ तीन लोकांना ते जिवंत असतानाच देण्यात आलं आहे.
अशोकचक्र, महावीरचक्र, परमवीरचक्र, कीर्तीचक्र, शौर्यचक्र, वीरचक्र यांचं संकल्पनाचित्र बनवणाऱ्या सावित्रीबाई खरोखरी महान विदुषी होत्या.
आज २० जुलै, सावित्रीबाई खानोलकरांच्या जन्मदिनानिमित्त त्यांना बोभाटाची आदरांजली.