आजवर माणसांच्या संपर्कात न आलेल्या अंदमानच्या 'सेंटिनली' आदिवासी जमाती बद्दल या गोष्टी तुम्हाला माहीत असायलाच हव्या !!

लोक अंदमान निकोबारला फिरयला जातात आणि तिथं त्यांना तिथल्या आदिवासींना भेटायची किंवा पाहायची जाम हौस असते. यात कुतूहल तर असतंच, पण ते लोक कपडे घालत नसल्यानं काही लोकांना आंबटशौक म्हणूनही जायचं असतं. तिथल्या लोकांचे उघडेनागडे-अंग रंगवलेले फोटो तर आणायचे असतातच. अंदमान-निकोबार बेटं भारताच्या केंद्रशासित प्रदेशाचा भाग आहेत. साहजिकच त्यामुळं इथं हस्तक्षेप करण्याची जबाबदारी आपल्या सरकारवर येते. काही अदिवासी जमाती आता माणसाळल्या आहेत आणि बेकयदेशीरपणे पर्यटकांना त्या आदिवासींना भेटू देण्याचा जुगाड पर्यटनव्यवसाय तिथं फळफळलाय. असं असलं तरी अंदमानातल्या काही आदिवासींनी स्वत:ला माणसांचा वाराही लागू देत नाहीत आणि त्यांना संपर्क करायचा प्रयत्न केलात, तर मृत्यू हा ठरलेलाच बरं मंडळी!! कोण आहेत हे एवढे डेंजरस लोक? आणि त्यांनी नेमकं असं काय केलंय ज्यामुळे त्यांना जगातले सर्वात धोकादायक आदिवासी असं म्हटलं जातंय??वाचा तर मग पुढे...

स्रोत

ही आहे भारताच्या अंदमान बेटावरची  सेंटिनली नावाची आदिवासी जमात. या जमातींनी बाहेरील जगाशी संपर्क ठेवलेला नाही आणि जेव्हा बाहेरील कोणी व्यक्ती त्यांच्या संपर्कात येऊ पाहते तेव्हा त्या व्यक्तीला आपला जीव गमवावा लागतो. आज सेंटिनली जमातीबद्दल सांगण्याचं कारण म्हणजे नुकतीच या जमातीने एका अमेरिकेन मिशनऱ्याची हत्या केली आहे. 

कोण आहेत हे सेंटिनली लोक ?

सेंटिनली जमातीबद्दल फारच कमी माहिती उपलब्ध आहे. असं म्हणतात की हे लोक त्या बेटावर गेल्या ५५,००० वर्षांपासून राहात आहेत.  उपलब्ध माहितीनुसार हे लोक मासेमाई व शिकार करून जगतात. ते इतक्या प्राथमिक अवस्थेत राहात आहेत की त्यांना शेती व आगसुद्धा माहित नाहीय. या लोकांशी कोणत्याच प्रकारचा संपर्क स्थापित होऊ न शकल्यानं त्यांच्या भाषेबद्दलही फारसा अभ्यास होऊ शकलेला नाही आणि त्यामुळं त्यांच्यासोबत कसलंच संभाषण होऊ शकलं नाहीय. कसलं विचित्र त्रांगडं आहे ना हे??

स्रोत

त्यांची लोकसंख्या खूपच कमी आहे. २०११ च्या जनगणनेनुसार उत्तर सेंटिनली बेटावर सेंटिनली जमातीचे फक्त १५ लोक राहतात. त्यात १२ पुरुष आहेत तर ३ स्त्रिया आहेत. उपलब्ध माहितीनुसार १८८०ला ब्रिटिश अधिकाऱ्यांनी या सेंटिनलींना संपर्क करायचा प्रयत्न केला होता. त्यांची या कामाची पद्धत मात्र जरा अतरंगी होती. ते आदिवासींच्या काही लोकांना पळवून आणत, त्यांना खूप चांगलं वागवत आणि खूप भेटवस्तूंसह त्यांना परत नेऊन सोडत. हेतू हा की आधुनिक माणूस हे चांगले-मैत्री करण्यासारखे लोक आहेत हे त्या आदिवासींना कळावे. ही पद्धत सेंटिनलींच्या बाबतीत मात्र चालली नाही. तरी ब्रिटिशांनी एक जोडपं आणि दोन मुलं पळवून पोर्ट ब्लेअरला आणले होते. आता आदिवासी म्हणजे आपल्यासारखं लग्न झालेलं जोडपं नसेल, पण आम्हांला काय म्हणायचंय हे तुम्हांला कळालं असेलच. या आदिवासींचा एक प्रॉब्लेम असा असतो की त्यांचा एरिया सोडून दुसरीकडे गेले की तिथली रोगराई त्यांना पटकन बाधू शकते. सहसा इतर भागांत न गेल्यानं तिथल्या रोगांशी प्रतिकार करण्याची त्यांची शक्ती तयार झालेली नसते. या जोडप्याच्या बाबतीत हेच झालं. ते वारले आणि मुलांना गिफ्टस दिल्या, पण त्यांना ब्रिटिशांना नक्की काय म्हणायचंय ते कळलं नाही. थोडक्यात, या लोकांशी संपर्क झालाच नाही. 

असंही म्हटलं जातं की की सेंटिनली जमातीतल्या एकाही व्यक्तीला कॅमेऱ्यात कैद करता आलेलं नाही. पण या जमातीची काही दुर्मिळ छायाचित्रे उपलब्ध आहेत. आता हा फोटो पाहा बरं...

स्रोत

हा फोटो भारतीय कोस्ट गार्ड हेलीकॉप्टरच्या वैमानिकाने घेतला आहे. हा वैमानिक सेंटिनली भागातून घिरट्या घालत असताना त्याच्यावर या जमातीतल्या एकाने हल्ला केला होता. त्याच्या हातातील धनुष्यबाण पाहा, हेच त्यांचं मोठं शस्त्र आहे.  

भारत सरकारनंही यांना संपर्क करण्याचे बरेच प्रयत्न केले. काही एनजीओ,मानववंशशास्त्रज्ञ यांच्या मदतीने त्या लोकांच्या भूभागापर्यंत जाणं, त्यांना खाणं आणि भेटी देऊन आपली मैत्रीची भावना व्यक्त करणं हे प्रकार भारत सरकार १९६७पासून करत होतं. यात कधी कधी बीबीसीचे लोकही सामील होते. त्यांना नेहमीप्रमाणे या लोकांचा अभ्यास करुन एक डॉक्युमेंटरी बनवायची होती. पण या सेंटिनलींनी काही दाद दिली लाही. एकतर ते त्यांच्या बेटाच्या जवळ कुणाला येऊ देत नाहीत. येऊ दिलं तर लगेच तीरकमठ्यांनी बाणांचा वर्षाव करतात. कधीकधी तर आधी जवळ येऊ दिलं आणि नंतर लपवून ठेवलेले तीरकमठे काढून बाण मारले असेही प्रकार त्यांनी केले. शेवटी १९९१ मध्ये भारताने या सेंटिनलींसमोर हात टेकले आणि त्यांच्या संपर्काचे सर्व प्रयत्न थांबवलेत. हो, २००४च्या त्सुनामीनंतर त्या लोकांचं काय झालं हे पाहायला आपली हेलिकॉप्टर्स गेली होती. त्यांच्यासाठी खाण्याची पाकिटं आणि इतर वस्तूही टाकल्या गेल्या होत्या. पण या लोकांनी त्या हेलिकॉप्टर्सवरतीही बाण मारले हो.. तेव्हापासून सेंटिनली बेटावर जाणं, त्यांच्याशी संपर्काचा कोणताही प्रयत्न करणं हे निषिद्ध ठरवण्यात आलं आहे. अधूनमधून सरकारतर्फे एक पथक पाठवण्यात येतं. या पथकाद्वारे जमातीत सगळं आलबेल आहे की नाही हे तपासलं जातं.

या व्हिडिओमध्ये तिथं येणाऱ्या लोकांवर हल्ला करणारे सेंटिनली लोक दिसताहेत पाहा. काटक, उंच, उन्हाने रापलेले दिसताहेत. त्यांच्या बाणाने या व्हिडिओतल्या होडीतला एक माणूस जखमी झाला होता. या बाणाची लांबी २.५ मीटर होती. या जखमेचा व्रण चांगलाच खोल होता. 

अंदमान बेटांवर सेंटिनली व्यतिरिक्त ’ग्रेट अंदमानी’, ‘ओंगे’, ‘जारवा’ अशा इतर आदिवासींच्या जमाती विखुरलेल्या आहेत. या जमातींशी बाहेरील जगाने संपर्क केला आहे. जगात सगळीकडे केला तसा ख्रिश्चन मिशनरींनी या बेटावरही धर्मप्रसार केलाय. यातल्या काही जमाती आज ख्रिश्चन आदिवासी जमाती म्हणून ओळखल्या जातात. सेंटिनली लोकांमध्येही ख्रिश्चन धर्माचा प्रसार व्हावा म्हणून चाऊ नावाचा मिशनरी या बेटावर जवळजवळ ५ वेळा गेला होता. सुखरूप परतल्यामुळे त्याने पुन्हा एकदा प्रयत्न केला,  पण दुर्दैवाने यावेळी त्याला जीव गमवावा लागलाय.  मंडळी, सेंटिनली जमातीने माणसांना मारण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वी त्यांनी २ मच्छिमारांना मारलं होतं. हे मच्छिमार चुकून या बेटावर उतरले होते.

स्रोत

थोडक्यात, तिथं फक्त त्यांचं राज्य आहे आणि त्यांना दुसऱ्या कुणाशीही संपर्क ठेवायचा नाहीय. बाहेरील जगाशी जोडलेलं नसूनही हे आदिवासी आज सुखाने नांदत आहेत. मग बाहेरील जगाने त्यांच्याशी संपर्क ठेवण्याचा हट्ट का करावा? तुम्हाला काय वाटतं? आम्हाला जरूर कळवा !

सबस्क्राईब करा

* indicates required