अपहरण झालेल्या या विमानात 'हा माणूस' आहे हे अतिरेक्यांना कळले असते तर त्यांनी खंडणीची रक्कम १०० पटींनी वाढवली असती !!
१९९९ सालच्या ३१ डिसेंबरवर दु:खाचं सावट होतं. टीव्हीवर नववर्ष साजरं करण्याच्या त्या काळात लोक बातम्यांकडे लक्ष देऊन बसले होते. फ्लाईट IC 814 ला हायजॅक करून आतंकवाद्यांनी ते विमान कंदाहार येथे नेले आणि सर्व प्रवाशांना ओलीस ठेवले. त्या बदल्यात भारतीय तुरुंगात बंद असलेले काही अतिरेकी आणि २० करोड डॉलर्स रकमेची मागणी केली गेली होती. भारत सरकारला प्रवाशांची सुखरूप सुटका व्हावी म्हणून ही मागणी मान्य करावी लागली होती. हा इतिहास सर्वांनाच माहीत आहे. पण एक गुपित अनेकांना माहीत नाही. त्या ओलीस ठेवलेल्या लोकांमध्ये एक अशी व्यक्ती होती जी कोण आहे हे अतिरेक्यांना समजले असते तर भयंकर मोठा अनर्थ घडला असता! अतिरेक्यांनी केलेली दोनशे मिलियन डॉलर्सची मागणी पूर्ण करणे हा त्या व्यक्तीचा डाव्या हाताचा मळ होता. या एका स्विस नागरिकाच्या सुटकेसाठी भारत सरकार इतकाच प्रयत्न स्विस सरकारसुद्धा करत होते… कोण होती ती व्यक्ती?
ती व्यक्ती म्हणजे, जगातल्या तब्बल १२० देशांच्या चलनी नोटा छापणारा बिझनेस टायकून, गर्भश्रीमंत माणूस, 'डे ला रुई जिओरी' कंपनीचा मालक ‘रॉबर्ट जिओरी!’
रॉबर्ट जिओरी हा आपली मैत्रीण ख्रिस्तीयाना कल्सबेरीसोबत सुट्ट्या घालवण्यासाठी दिल्लीहून काठमांडू येथे निघाला होता. जगातल्या मोजक्या अफाट श्रीमंत आणि सुरक्षित लोकांपैकी एक असणाऱ्या जिओरीने आपली ओळख कुठेही जाहीर केली नाही. अतिरेक्यांना तो कोण आहे हे माहीत असण्याची सुतराम शक्यता नव्हती. जर तो कोण आहे हे समजले असते तर २० करोड डॉलर्सऐवजी २०० करोड डॉलर्सची मागणी अतिरेक्यांनी केली असती आणि स्विस सरकारने ती पुरवली सुद्धा असती!
विमान अपहरण होऊन जेव्हा कंदहारला नेले गेले, तेव्हा ते तिथे सात दिवस अतिरेक्यांच्या ताब्यात होते. त्या काळात या ‘करन्सी किंग’च्या सुटकेसाठी स्वित्झर्लंड सरकारने गुप्तपणे आपले प्रतिनिधी कंदहारला पाठवले होते ही गोष्ट फारच कमी जणांना ठाऊक आहे. सोबतच स्विस सरकारचा भारतावर जबरदस्त दबाव होता. दरम्यान, इतर प्रवाशांसारखाच जिओरीलाही अतिरेक्यांचा भयंकर त्रास सहन करावा लागला. जेवणखाण वेळेवर न मिळणे, प्यायला पाणी न मिळणे, चहा-कॉफीची वानवा, तुंबलेले टॉयलेट्स वगैरे गोष्टीही जोडीला होत्याच. त्यात अतिरेक्यांकडून सतत इस्लामविषयी गोष्टी ऐकाव्या लागायच्या. इस्लाम कसा सर्वश्रेष्ठ धर्म आहे आणि भारतात तुरुंगात बंद असलेल्या १९९९ इस्लामी अतिरेक्यांची सुटका करणे म्हणजे धर्माचे कार्य आहे अशी बतावणी अतिरेकी नेहमी करत असत.
ज्या वेळी सर्व प्रवाशांची सुटका झाली, त्यावेळी सर्वांसोबत जिओरीसुद्धा दिल्लीला आला. त्याला घेण्यासाठी स्वित्झर्लंडवरून खास विमान आले होते. जिओरी या अनुभवविषयी काय म्हणतो ते त्याच्याच शब्दात पाहू…“मला समजलं होतं की या अतिरेकी लोकांना मरणे आणि मारणे याविषयी काहीही भीती नव्हती. कित्येकदा वाटत असे आता आपले मरण निश्चित आहे. मला हजार टक्के खात्री होती की आपला उद्देश साध्य करण्यासाठी ते शेवटपर्यंत लढतील. ते अतिरेकी पूर्णतः प्रशिक्षित होते. जर भारताने अतिरेक्यांना सोडले नसते सर्व प्रवासी नक्कीच मरण पावले असते.”
कल्पना करा, जर जिओरी मरण पावला असता तर आर्थिक जगतात किती उलथापालथ झाली असती! जगातल्या नव्वद टक्के नोटा जो माणूस छापतो त्याचे किती महत्व आहे. शेवटी जिओरी म्हणतो, “मला हिंदू आणि हिंदुईजम कल्पना माहीत नाहीत. पण आपल्या धर्मावर श्रद्धा ठेवून भारतीय प्रवाशांनी ज्या धैर्याने संकटाचा सामना केला त्याला तोड नाही! समजा विमानात सगळे स्विस, इटालियन किंवा फ्रेंच नागरिक असते तर चित्र फार वेगळे असते.”