स्वयंपाकात केस पडू नये इतकंच काही शेफच्या टोपीमागचं एकमेव कारण नाही!! वाचा मग काय कहाणी आहे!!
तुम्ही जगभरातील कुठल्याही शेफचा फोटो पाहिलात तर त्यांच्या अंगावर ऍप्रन आणि डोक्यावर विशिष्ट प्रकारची लांब टोपी ही दिसतेच. ऍप्रनचा उपयोग समजू शकतो. काही सांडले तर डाग नको, तसेच कपडे कुठल्या कारणाने खराब व्हायला नको म्हणून ऍप्रन वापरतात. पण शेफच्या खास टोपीची गोष्ट काय आहे आज त्याच्याबाद्लच जाणून घेऊयात.
१८००च्या दशकाच्या सुरुवातीस फ्रान्समध्ये शेफची टोपी घालण्याची परंपरा सुरु झाली. शेफ मेरी-अँटोइन कॅरेम यांनी ठरवले की शेफचाही एक गणवेश असावा. त्यांना पांढरा रंग आवडायचा म्हणून त्यांनी पांढरा रंग निवडला. तसेच पांढरा रंग स्वच्छतेचे प्रतीक आहे. त्यांनी सर्व शेफला वेगवेगळ्या उंचीची टोपी घालण्यास सांगितले. असे म्हणतात, ज्याचा अनुभव जास्त त्याची टोपी जास्त उंच. जशी टोपी उंच असते तशाच त्यावर प्लीट्स म्हणजेच चुण्याही असतात. या प्लीट्सलाही महत्व आहे. शेफ जितका अनुभवी तितक्याच त्याच्या टोपीवर जास्त प्लीट्स असतात. असे म्हणतात त्या काळी शेफच्या टोपीवर १०० प्लीट्स असत, कारण त्यांना अंड्याच्या १०० पाककृती येत होत्या.
शेफच्या टोपीची आणखी एक रंजक कथा आहे अर्थात याचा इतिहासाच्या कोणत्याही पानावर उल्लेख नाही. असे म्हणतात राजा हेन्री (आठवा) याने त्याच्या सूपमध्ये केस सापडला म्हणून त्याच्या शेफचा शिरच्छेद केला होता. तेव्हापासून शेफने डोक्यावर टोपी घालायला सुरुवात केली. त्यामुळे जेवणात केस गळत नाहीत आणि स्वयंपाकघरात स्वच्छता राहते.
कशी वाटली शेफच्या टोपीची कथा ? जरूर कमेंट करून सांगा.
शीतल दरंदळे