computer

कुतुबमिनारावरून उडी मारून जीव देणाऱ्या राणीची कथा : कपूरथळ्याचा कामदेव - भाग २

कपूरथळ्याचा कामदेव या लेखात आपण अनिता डेलगॅडोची कथा वाचली असेल. आज आपण त्याच जगतसिंग महाराजांच्या दुसऱ्या युरोपियन राणीची गोष्ट वाचणार आहोत. ही राणी अनिता डेलगॅडो हुशार आणि व्यवहार चतुर नव्हती. या दुसऱ्या युरोपियन राणीचं नाव होतं युजीन ग्रासुपोवा. एका झेक उमरावाच्या आणि एका नटीच्या, नीना ग्रासुपोवाच्या संबंधातून जन्माला आलेली अनौरस संतती म्हणजे युजीन ग्रासुपोवा.

युजीन आणि महाराज जगतजितसिंग या दोघांची गाठ एका नाट्यगृहात झाली. युजीनची आई आणि आजी दोघीही व्यावसायिक रंगमंचावरच्या कलाकार होत्या. एकदा तारुण्य ओसरलं की पाठीराखे नाहीसे होतात, उत्पन्न संपतं याची जाणीव त्यांना होती. त्यामुळे महाराजा जगतजीत सिंग यांनी जेव्हा युजीनला मागणी घातली तेव्हा महाराजांना प्रोत्साहन देऊन, युजीनचे मन वळवण्यात या दोघींचा हातभार होता. महाराज जगतजीतसिंग म्हणजे मदनाचा पुतळा नव्हता. पण त्यांच्या रुपात आपला तारणहार आला अहे याची खात्री आई आणि आजीला होती म्हणून फार वेळ न दवडता युजीनला महाराजांसोबत लग्नाला त्यांनी भरीस घातलं. पण प्रत्यक्ष विवाह होण्यासाठी मध्ये पाच वर्षं जावी लागली.

युजीनने होकार दिल्यावर महाराज तिला घेउन कपूरथळ्यात पोहचले. युजीनच्या आई आणि आजीला त्यांनी युजीननच्या दासी म्हणून सोबत आणलं. कपूरथळ्यात युजीनसाठी एक महाल बनवण्यात आला. एखाद्या राणीला शोभेल असे कपडालत्ते, दागदागिने, महाल हे सर्व ऐश्वर्य युजीनला मिळाले. यात चार-पाच वर्षं गेल्यावर युजीन आणि जगतजीतसिंग शीख धर्माच्या रीतीरिवाजप्रमाणे विवाहबध्द झाले आणि युजीनला नवीन नाव मिळाले- राणी तारा!!

युजीन दिसायला सुंदर होती.  पण तिच्या अनौरस असण्याचे कारण जगजाहीर असल्याने ती एकलकोंडी झाली होती. महाराजांच्या परिवारात तिला मान मिळेल हे शक्यच नव्हते आणि ब्रिटिशांनी तिची 'मॅडम' या पलीकडे दखल घेतली नाही. 'एक ठेवलेली बाई' असाच तिचा उल्लेख सर्वत्र होत होता.

महाराज मात्र या नव्या पत्नीवर बेहद्द खूष होते. त्यांनी युजीनला राणी तारादेवी म्हटले जावे अशी सूचना दिली. त्यानंतर महाराणी हा किताब पण तिला दिला. खाजगीत युजीन महाराणी तारादेवी झाली खरी, पण सरकार दरबारात 'हर हायनेस' हा किताब न देण्यात परिवार आणि ब्रिटिश सरकार यशस्वी झाले.

याच दरम्यान महाराजांच्या मुलाने म्हणजे राजपुत्र परमजितसिंगाने स्टेला स्मज या एका युरोपियन बाईशी लग्न केले. त्याने तिला कपूरथळ्यात एका आलिशान घरात - स्टेला कॉटेजमध्ये - आणून ठेवले. स्टेला स्मज अत्यंत धूर्त आणि स्वार्थी होती.  राजपुत्र तिच्या पुरेपूर कह्यात होता याचा तिने पुरेपूर फायदा घेतला. प्रत्येक वेळी युरोपच्या दौऱ्यावर जाताना ती राजघराण्याच्या खजिन्यावर डल्ला मारायची. हा खजिना स्वीस बँकेत जमा व्हायचा. परमजीतसींगचा पहिला विवाह हिमाचलमधल्या जब्बाल संस्थानातल्या राजकन्येसोबत झाला होता. तिला तीन मुलीच झाल्या. गादीला वारस हवा म्हणून जगतजीतसिंग महाराजांनी परमजीतसिंगचे दुसरे लग्न कांग्रा घराणातल्या राजकन्येशी ठरवले. हे लग्न पार पडले, पण राजपुत्राने या नव्या पत्नीसोबत शय्यासोबत करण्यास नकार दिला आणि तो स्टेला कॉटेज मध्येच राहायला लागला.

(राजपुत्र परमजितसिंग)

जगतसिंगाच्या दृष्टीने गादीला वारस नाही हा  फारच मोठा पेचप्रसंग होता. जर मुलाला मुलगा झाला नाही, तर ब्रिटिश गादी खालसा करतील ही सगळ्यात मोठी आपत्ती त्यांना डोळ्यासमोर दिसत होती. जगतजितसिंग स्टेला स्मजला ओळखून होते. त्यांनी स्टेलाला १० लाख रुपयांची लाच देऊ केली. इतकी मोठी रक्कम समोर आल्यावर स्टेलाने रोज राजपुत्राशी रोज नवं भांडण उकरून काढायला सुरुवात केली आणि अशाच एका संध्याकाळी भांडण झाल्यावर राजपुत्र जनानखान्यात मुक्कामाला गेला. ज्या 'रानटी अडाणी' राणीला त्याने नाकारले होते तिच्याच सोबत शय्यासोबत करता झाला. यथावकाश पुत्रजन्म झाला आणि जगतजीतसिंगची समस्या संपली.

(स्टेला स्मज)

हा नातवाचा जन्म १० लाखात पडल्याने जगतजीतसिंग अचानक सावध झाला. युरोपियन बायकांच्या संधीसाधू स्वभावाचा त्यांना अंदाज आला आणि सोबत चिंताही वाटायला लागली. युजीनच्या सोबत असलेल्या आई  आणि आजी भविष्यात आपल्याला डोकेदुखी ठरतील हे त्यांच्या लक्षात आले.

त्यानंरतच्या उन्हाळ्यात महाराज जगतजीतसिंग मसूरीला 'शॅट्यू द कपूरथला' मध्ये कुटुंबकबिला घेऊन गेले. युजीनच्या आजीचा तिथे अचानक मृत्यू झाला. युजीनला आजीचा मृत्यू विषप्रयोगाने झाला असा संशय होता. थोड्याच दिवसात तिची आई पण अचानक मरण पावली. आता मात्र युजीनची खात्री पटली की हे विषप्रयोग महाराजा जगतजीतसिंगांच्या आज्ञेवरूनच झाले असावेत. दिवाण जरामणीने हा केवळ संशय आहे असे म्हणून युजीननची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. पण आता युजीन पूर्ण हताश निराश झाली होती. आई आणि आजी यांच्यानंतर काही दिवसातच आपला पण नंबर लागणार याची तिला खात्री वाटायला लागली. हळूहळू महाराजांसोबत तिचे खटके उडायला सुरुवात झाली. दोघांचे संबंध दुरावत गेले. महाराजांना अर्थतच काहीच फरक पडत नव्हता. कारण तोपर्यंत त्यांना एक नवीन पाखरू मिळाले होते. युजीनने आता गाशा गुंडाळून युरोपला जाण्याची तयारी सुरु केली. पण ब्रिटीशांनी तिला पासपोर्ट देण्याचे नाकारले

अशा एकाकी अवस्थेत युजीनची दोस्ती महाराजांच्या पलटणीतल्या मेजर वाय.बी. सिंग नावाच्या एका अधिकार्‍यासोबत झाली. युजीनला या दोस्तीमध्ये फारसा काही रस नव्हता.  पण संस्थानाच्या बाहेर फिरायला एक साथीदार तिला मिळाला. याच सिंगसोबत ती कपूरथळ्याच्या बाहेर पडली आणि दिल्लीतल्या एका हॉटेलमध्ये तिने मुक्काम ठोकला. याच मुक्कामात असताना एका सकाळी ती एकटीच टॅक्सी घेऊन कुतुबमिनारवर गेली आणि कुतुबमिनारच्या पाचव्या मजल्यावरून  उडी मारून तिने जीव दिला. प्रागमधून राणी व्हायला आलेल्या युजीनचा असा अंत झाला.

 

इतिहासात या राणीचा फोटो उपलब्ध नाही, फक्त युजीनच्या मृत्यूनंतर महाराज एका रात्रीत म्हातारे झाले इतकाच उल्लेख  आहे.

 

आणखी वाचा :

कपूरथळ्याचा कामदेव : महाराजा जगतजीतसिंग...वाचा त्यांच्या अय्याशीच्या कथा !!

 

 

सबस्क्राईब करा

* indicates required