computer

२० मार्च!! पाण्याच्या ब्रॅंडला हे नाव देण्यामागे कोणत्या ऐतिहासिक घटनेचा संदर्भ आहे?

‘२० मार्च’ ही तारीख एखाद्या उत्पादनाचं नाव होऊ शकते का? ही कल्पना अर्थातच विचित्र वाटते, पण हे खरोखर घडलं आहे. महाराष्ट्रातील एका बाटलीबंद पाण्याच्या ब्रँडला २० मार्च नाव देण्यात आलं आहे. तुम्हाला वाटेल की कंपनीच्या मालकाचा किंवा त्याच्या मुला/मुलीचा वाढदिवस या दिवशी असल्याने त्याने २० मार्च नाव दिलं असावं. खरं तर या नावामागे एक वेगळंच  कारण आहे.

२० मार्च ही तारीख ऐतिहासिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची आहे. याच दिवशी १९२७ साली बाबासाहेब आंबेडकरांनी महाड सत्याग्रह किंवा ज्याला आपण चवदार तळ्याचं आंदोलन म्हणतो त्याची सुरुवात केली होती. हे आंदोलन यशस्वी झाल्याने एका नवीन युगाचीच सुरुवात झाल्याचं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

या महत्त्वाच्या दिवसाचं नाव आपल्या उत्पादनाला देण्याची कल्पना अविचल धीवर यांची होती. आजच्या जल दिवसाच्या निमित्ताने ‘२० मार्च’ पाण्याची ही कथा बोभाटाच्या वाचकांसाठी.

अविचल धीवर यांनी ‘२० मार्च’ची सुरुवात करण्यापूर्वी इतर व्यवसायांमध्ये आपला जम बसवण्याचा प्रयत्न केला होता. जसे की टेलिफोन आणि झेरोक्स बूथ चालवणे, स्टेशनरी विकणे, टीव्ही आणि VCR भाड्याने देणे, इत्यादी. वयाच्या ५० व्या वर्षी त्यांना पाण्याचा ब्रँड सुरु करण्याची कल्पना सुचली. हा ब्रँड म्हणजेच ‘२० मार्च’.

हा नवीन व्यवसाय सुरु करणं सोपं नव्हतं. भांडवल ही मोठी समस्या होती. बँकांकडून लोन मिळवण्यासाठी धीवर यांनी सर्व प्रयत्न करून पाहिले, पण सर्व कागदपत्रे तयार असूनही बँकांनी लोन देण्याची प्रक्रिया अत्यंत खडतर केली. बँक ऑफ महाराष्ट्र, इंडियन बँक, आयडीबीआय आणि पंजाब नॅशनल बँक या बँकांनी कर्ज देण्यास नकार दिला.  काही बँकांनी तर म्हटलं की तुम्ही छोट्या कर्जासाठी अर्ज करा. धीवर यांच्या म्हणण्याप्रमाणे बँकांच्या व्यवहारात हा भेदभाव असतो. बँका दलित व्यावसायिकाला कर्ज देण्यास इच्छुक नसतात. या सगळ्या गोष्टी पाहता बँकांकडून कर्ज मिळवण्याचे सगळे प्रयत्न त्यांनी थांबवले.

अखेर भारत सरकारच्या दलितांसाठी तयार करण्यात आलेल्या IFCI fund ने धीवर यांना मदतीचा हात दिला. IFCI fund च्या वेबसाईटवर अर्ज भरल्यानंतर लवकरच त्यांना कर्ज मिळालं. जिथे बँका 13 ते 14 टक्के व्याजाने कर्ज देतात तिथे IFCI fund ने १० टक्के व्याजावर कर्ज दिलं.

अशाप्रकारे ‘२० मार्च’ची सुरुवात झाली. सुरुवातीला नाशिक, सोलापूर, नागपूर या तीन शहरांपासून सुरुवात करण्यात आली. धीवर यांना ‘२० मार्च’ला राष्ट्रीय पातळीवर न्यायचं आहे.

आजच्या जल दिनानिमित्त ‘२० मार्च’च्या अवघड प्रवासाबद्दल जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे होते. ही गोष्ट आपल्याला नक्कीच विचार करायला भाग पाडेल.

सबस्क्राईब करा

* indicates required