computer

धीरेन बारोट नावाचा माणूस अल-कायदाचा अतिरेकी असू शकतो का ? हो, दुर्दैवाने हे खरे आहे !!

अबू हमझा, अयमान-अल-जवाहिरी, मोहमद अत्ता अशा अल कायदाच्या अनेक अतिरेक्यांची नावं तुम्ही वाचली असतीलच.  पण 'धीरेन बारोट' हे अल कायदाच्या सदस्याचे नाव असू शकेल यावर तुमचा विश्वास बसणार नाही. पण हे सत्य आहे. नाव-आडनावाने हिंदू असलेला धीरेन बारोट अल कायदाच्या बुकात बिलाल, अबू मुसा अल हिंदी, इसा अल ब्रिटानी या नावाने प्रसिध्द आहे. आजच्या तारखेस ब्रिटनमधल्या तुरुंगात चाळीस वर्षांची जन्मठेप भोगत असलेल्या धीरेन बारोट उर्फ  इसा अल ब्रिटानीची सत्यकथा आज आपण वाचणार आहोत. 

धीरेन बारोटचा जन्म बडोद्याला झाला. त्याचे आई वडील दोघेही हिंदू होते. तो एक वर्षाचा असताना त्यांचे कुटुंब इंग्लंडला स्थलांतरित झाले. वयाच्या विसाव्या वर्षी धीरेन बारोट घराबाहेर पडला आणि धर्म बदलून मुस्लिम झाला. त्याने धर्म का बदलला याचे कारण आजतगायत कोणालाही, म्हणजे त्याच्या आई-वडिलांना पण माहिती नाही. धर्म बदलणे हा काही गुन्हा नाही. पण तो अल कायदाचा सदस्य का झाला आणि अतिरेकी का झाला हे गूढच आहे, ज्याची उकल अजूनही झालेली नाही.

एअर माल्टामधला क्लार्क, धर्मांतर, भारतीय सैनिकांना कसे मारावे ते ९/११ चा कुप्रसिद्ध हल्ला..

धीरेन बारोट सुरुवातीला एअर माल्टा नावाच्या एका विमान कंपनीत टिकेटिंग क्लार्क म्हणून नोकरी करत होता. धर्म बदलल्यावर १९९५ साली तो पाकिस्तानला जाऊन पोहचला आणि 'इसा अल हिंदी' या टोपण नावाने काश्मिरी आतंकवाद्यांच्या बाजूने भारतीय लष्कराशी लढा देत होता. याच दरम्यान धीरेनने 'इसा अल हिंदी' या टोपण नावाने "मदिनाचे काश्मिरी सैनीक" (The Army of Madinah in Kashmir)  या नावाचे एक पुस्तक लिहिले. या पुस्तकात भारतीय सैनिकांना कसे मारावे याचे धडे दिले होते. हळूहळू सर्व मुस्लिम मूलतत्त्ववादी अतिरेकी संघटनांमध्ये त्याच्या नावाची चर्चा व्हायला सुरुवात झाली. १९९९ नंतर कधीतरी तो अल कायदाच्या खलीद शेख मोहम्मदच्या संपर्कात आला. खलीद शेख मोहम्मदने त्याला अल कायदाच्या मोठ्या नेत्यांकडे नेऊन पोहचवले. यापैकी रिदवान बीन इस्सामोद्दीन उर्फ हंबाली या अतिरेक्याच्या संपर्कात आल्यावर धीरेन बारोट खर्‍या अर्थाने आंतरराष्ट्रीय अतिरेकी झाला.

अफगाणिस्तान, मलेशिया, इजिप्त अशा बर्‍याच अल कायदा छावण्यांमध्ये त्याचे प्रशिक्षण झाले. यानंतर त्याचा विशेष संबंध कालखंड सर्वसाधारणपणे १९९९ ते २००१ पर्यंतचा असावा. असेही म्हटले जाते की २००१ साली अमेरिकेवर झालेल्या हल्ल्याचा कट ज्या हॉटेलमध्ये शिजला, तिथे धीरेन बारोट उपस्थित होता.  ओसामा बिन लादेनच्या अंगरक्षकाशी त्याचे फार सख्य होते, त्यामुळे धीरेन त्या हॉटेलमध्ये असणं सहज शक्य आहे. २००१ च्या हल्ल्यानंतर अल कायदाचे सर्व कार्यकर्ते भूमिगत झाले. त्यानंतर धीरेन बारोटने स्वतःच इंग्लंडमध्ये राहूनच कारवाया करण्याचे ठरवले. 

९/११ नंतर काय घडले?

२००१ नंतर अमेरिकेच्या दबावामुळे पाकिस्तानमध्ये अल कायदाच्या सदस्यांची धरपकड सुरु झाली. खलीद शेख मोहम्मद आणि त्याचा पुतण्या मुसाद अरुची हे दोघेही अमेरिकेच्या ताब्यात देण्यात आले. त्यांच्या चौकशीत पहिल्यांदा धीरेन बारोट उर्फ इसा अल ब्रिटानी हे नाव ब्रिटिश सरकारच्या अँटी टेररिस्ट स्क्वाडला कळले. २००१ च्या हल्ल्यात धीरेन बारोट सहभागी नव्हता. पण अमेरिकेत ९/११ चा हल्ला होण्याआधीच धीरेन बारोटने त्याचा गृहपाठ सुरू केला होता. सिटी बँक, आयएमएफ बिल्डिंग या सारख्या अनेक ठिकाणांचा रिकॅानिसिन्‍स म्हणजे रेकी करून त्याने वेगवेगळ्या फाईल्स तयार ठेवल्या होत्या. ९/११ नंतर अमेरिकेत सुरक्षा व्यवस्था अधिकच कडक झाल्या. मग त्याने अमेरिकेत काही करण्यापेक्षा ब्रिटनमध्येच आपला कार्यक्रम पार पाडण्याचे नक्की केले.

देशाच्या बाहेरून घातपाताचे सामान आणण्यापेक्षा बाजारात सहज मिळणाऱ्या वस्तूंचा वापर आणि स्थानिक समविचारी लोकांचे पाठबळ वापरून कारवाया कशा पार पाडायच्या यावर त्याने अनेक पानांचे एक बाड म्हणजे अनेक डॉक्युमेंट्सचा संग्रह बनवून त्याचा कार्यकर्त्यांमध्ये प्रचार केला. ९/११ च्या  हल्ल्यानंतर अमेरिकेने पाकिस्तानवर अतिरेकी गटांवर कारवाई करण्याचा दबाव आणला. या कारवाईत जे छापे घातले गेले, त्यात हे डॉक्युमेन्ट उघडकीस आले. यामध्ये धीरेन बारोटाचा उल्लेख 'इसा अल ब्रिटानी' असा होता.

या सर्व काळात त्याला नोकरी नव्हती, जाहीर करावे असे उत्पन्न नव्हते.  तर मग त्याच्याकडे पैसे आले कुठून? त्याचे राहणीमान महागडे होते, अनेक बँकामध्ये खाती होती. क्रेडिट कार्डाचे पैसे वेळोवेळी भरले जात होते. अर्थातच धीरेनला त्याच्या अल कायदा प्रायोजकांकडूनच पैशाचा पुरवठा होत असावा. 

'गॅस लिमो प्रोजेक्ट'

(धीरेन बारोटचं स्केच)

सामान वाहून नेणार्‍या गाड्यांतून किंवा लिमोझीनसारख्या मोठ्या गाड्या वापरून अनेक गॅस सिलिंडरचा स्फोट घडवून आणण्यची धीरेन बारोटची एक आयडिया होती.  त्याच्या या 'अर्बन प्रोजेक्ट'ची माहिती जेव्हा पोलीसांना कळली तेव्हा त्याला ताबडतोब अटक करण्याखेरीज पोलीसांसमोर दुसरा काहीच इलाज नव्हता. पण हे सोपे नव्हते.  कारण ब्रिटिश गुप्तहेर खाते आपल्या मागावर आहे याची बारोटला २००४ पासून कल्पना होती. पण तो वेळोवेळी नाहीसा होत राहिला. पाठलागावर असणार्‍या हेरांना चकमा देण्यात त्याचा हातखंडा होता. तो एका रात्रीपेक्षा जास्त कुठेच रहायचा नाही. फारसा मोबाईल वापरायचा नाही. वारंवार गाड्या बदलत रहायचा, ट्रॅफिकमध्ये गोलगोल फिरत अचानक नाहीसा व्हायचा. ज्याला counter surveillance techniques म्हणतात, अशा सर्व युक्त्या त्याला अवगत होत्या. 

अँटी-टेररिस्ट स्क्वाडच्या अधिकार्‍यांसमोर एक प्रश्न कायम उभा असतो, तो म्हणजे संशयित आतंकवाद्याला नक्की कधी अटक करायची? 

(ब्रिटनची CTSFO पोलीस, म्हणजे Counter Terrorist Specialist Firearms Officer)

थोडा आणखी वेळ देऊन पुरावा जमा होईपर्यंत थांबायचे, की तो त्याच्या योजनेप्रमाणे घातपात करायला निघालेला असताना अडकवायचे, की ज्या ठिकाणी घातपात करायचा आहे तिथे अटक करायची?  कारण अडचण अशी असते की एकदा अटक केल्यावर हातात असलेला पुरावा कोर्टात उभा राहिला नाही तर केले सर्व श्रम वाया तर जातातच,  पण इतर सहभागी अतिरेकी सावध होऊन त्यांचे मार्ग बदलतात आणि पुन्हा नवी सुरुवात करावी लागते. धीरेन बारोटच्या बाबतीत हाच प्रश्न गुप्तहेरांना छळत होता.

'गॅस लिमो  प्रोजेक्ट' ची माहिती मिळाल्यावर ब्रिटिश पोलीसांकडे धीरेन बारोटला अटक करण्याखेरीज दुसरा काहीच उपाय शिल्लक नव्हता. त्याला अटक केली त्यावेळी ब्रिटिश पोलीसांच्या हातात त्याच्याविरुध्द गुन्हा दाखल करता येईल असा काडीइतका पुरावा नव्हता. अटक केल्यावर पोलीसांच्या हातात फक्त १४ दिवसांच्या रिमांडची मुदत होती. पण दिवसरात्र मेहनत करून ब्रिटिश पोलीसांनी पुरावा जमा केला. हा पुरावा उभा करण्यासाठी स्कॉटलंड यार्डने ३०० काँप्युटर्स,  १८०० सीडी-हार्डड्राइव्ह, हजारो झीप फाइल तपासल्या. बारोट 'एन्क्रीप्शन' टेकनीक फार कुशलतेने वापरायचा. त्यामुळे त्याच्या फाइल्स डिक्रिप्ट करण्यात बराच वेळ गेला. या फाईल्स डिक्रिप्ट केल्यानंतर पोलीसांना असा काही पुरावा मिळाला की त्यानंतर गुन्हा कबूल करण्याखेरीज दुसर काहीच उपाय बारोटसमोर नव्हता. 

सध्या काय परिस्थिती आहे?

(प्रातिनिधिक फोटो)

धीरेन बारोट आता तुरुंगात आहे. पण स्कॉटलंड यार्ड समोर एक मोठी डोकेदुखी अशी आहे की जेव्हा त्याला अटक करून त्याचे सामान जप्त करण्यात आले तेव्हा तिथे चाव्यांचे ६००  जुडगे मिळाले. पोलिसांची दोन वर्षे या चाव्या नक्की कोणत्या जागांच्या आहेत हे शोधण्यात गेली. आजतगायत फक्त ७७ चाव्यांची घरं शोधण्यात यश आलेले आहे. राहिलेल्या जागांमध्ये कुठे काय लपवले असेल याची चिंता अजूनही शिल्लक आहे.

या प्रकरणातील काही वाद अपवादांची पण चर्चा करू या!

काही तज्ञांच्या मते धीरेन बारोट खर्‍या अर्थाने 'जिहादी' अतिरेकी नव्हता. त्याच्यात जिहादी आत्महत्या करण्याचे मनोबळ नव्हते. त्याच्या प्रत्येक प्रोजेक्टमध्ये घातपात केल्यानंतर बाहेर कसे पडायचे याचे रस्ते पण नोंदवून ठेवले होते. प्रत्येक प्रोजेक्टला लागणार्‍या पैशाचा हिशोब त्याने पै न पै लिहून काढलेला होता. तो केवळ 'प्लॉटर',  म्हणजे घातपाताची आखणी करणारा पडद्यामागचा सूत्रधार होता. तो एक ट्रेनर होता. 'ऑन फिल्ड  अ‍ॅक्टीव्हीस्ट' म्हणता येईल असा तो अतिरेकी नव्हता. अतिरेकी कारवायांची आखणी करून, त्यातून एका बाजूने पैसे जमा करून, पाठीराखे गोळा करून, अल -कायदाचा संघटनात्मक नेता होण्याचे त्याचे मनसुबे होते. ब्रिटिश पोलीसांनी त्याला वेळीच जेरबंद केले हे या अर्थाने अत्यंत योग्यच होते. 

तर काही तज्ञांच्या मते तो अल-कायदाचा केवळ 'सतरंजी कार्यकर्ता' होता. प्रचारक होता. अटक झाल्यावर अल-कायदा आपल्याला संपवणार याची त्याला खात्री होती. तुरुंगात आपण सुरक्षित राहू याची त्याला कल्पना होती. हे मत काही अर्थाने योगय असावे.  कारण तुरुंगात असताना पण त्याच्यावर एकदा गरम तेल ओतून तर एकदा गरम पाणी ओतून त्याच्या हत्येचा प्रयत्न करण्यात आला होता. 

हे सगळे खरे असले तरी त्याने आखलेल्या क्लुप्त्यांचाच उपयोग २७ जुलै २००७ साली अतिरेक्यांनी लंडनमधल्या साखळी बाँबस्फोटात केला गेला होता. या घातपाती कारवाईला 'फर्टिलायझर प्लॉटर' असेही म्हटले जाते. शेतीसाठी वापरण्यात येणार्‍या अमोनियम नायट्रेट या रासायनिक खताचा वापर करून एकाच दिवशी लंडनमध्ये चार बाँब स्फोट करण्यात आले होते.  ११ जुलै २००६ साली मुंबईच्या लोकलगाड्यामध्ये ७ बाँबस्फोट करण्यात आले होते,  त्यात पण प्रेशर कुकरमध्ये ठेवलेल्या अमोनियम नायट्रेटचाच वापर करण्यात आला होता. 

धीरेन बारोटचा सगळ्यात धोकादायक प्लॅन

(प्रातिनिधिक फोटो)

धीरेन बारोटचा सगळ्यात धोकादायक प्लॅन होता 'डर्टी बाँब' बनवण्याचा! 'डर्टी बाँब' म्हणजे  किरणोत्सर्गी रसायनाचे मिश्रण करून बनवलेले बाँब! अशा बाँबस्फोटात तात्काळ मनुष्य हत्या तर होतेच, पण किरणोत्सर्गी रसायनामुळे अनेकांना संसर्ग होऊन अनेक लोक हळूहळू मरण पावतात. ही प्रेरणा बारोटला फ्रान्समधल्या एका अपघातातून मिळाली. फ्रान्समध्ये एका वाहन अपघातात ९०० स्मोक डिटेक्टरचा चुराडा झाला तेव्हा किरणोत्सर्गाची भीती पसरली होती. या कल्पनेचा वापर करून १०००० स्मोक डिटेक्टर वापरून विध्वंस करता येईल असाही उल्लेख त्यात होता. किरणोत्सर्गपेक्षा घबराट जास्त होऊन त्याचा परिणाम मोठा असेल यावर त्याचा जास्त भर होता.

(प्रातिनिधिक फोटो)

किरणोत्सर्गी मूलद्रव्ये सहजासहजी मिळतच नाहीत. मिळाली तरी ती एका देशातून दुसर्‍या देशात पाठवताना ताबडतोब त्याचा सुगावा लागतो. यासाठी धीरेन बारोटने जुन्या स्मोक डिटेक्टरचा वापर करण्याचे ठरवले होते. स्मोक डिटेक्टरमध्ये 'अमेरीसियम'  नावाच्या किरणोत्सर्गी धातूचा अत्यल्प प्रमाणात वापर केलेला असतो. यासाठी त्याने जुने स्मोक डिटेक्टर तोडून त्यातील 'अमेरीसियम' एकत्र करून वापरण्याचे ठरवले होते. जर हा प्लॅन पार पडला असता तर .................???

धीरेनच्या बाबतीत अनेक प्रश्न अजूनही अनुत्तरीत आहेत. धीरेन बारोट वयाच्या विसाव्या वर्षी मुस्लीम का झाला? माल्टा एअरलाइन्सच्या काउंटरवर तिकीट आणि रिझर्वेशन बघणारा एक मामुली कारकून 'एन्क्रीप्शन' सारखे गुंतागुंतीचे टेक्निक कुठे शिकला? हे असेच काही भारतात घडू शकते का? आजमितीस ही भिती आपल्या सगळ्यांच्या समोर आहेच..

सबस्क्राईब करा

* indicates required