मुंबई-पुण्याला बदलून टाकणारी एसटी महामंडळाची 'एशियाड' सेवा कशी जन्माला आली ?
सत्तरीच्या दशकात मुंबई शहराची शिवण उसवायला सुरुवात झाली होती. दिवसेंदिवस लोकसंख्या वाढतच जात होती- इतर राज्यातून येणारे स्थलातरीतांचे लोंढे वाढतच होते. जागांचे भाव वाढत जात होते.यावर पर्याय म्हणून लोकं नवनव्या उपनगरात स्थलांतरीत व्हायला सुरुवात झाली होती.आशिया खंडातील सगळ्यात मोठी झोपडपट्टी धारावी भरभराटीला आली होती. सोबतच एका बाजूला विरार-वसई तर दुसर्या टोकाला कल्याण डोंबिवली या उपनगरांचा विस्तार वाढत होता.नव्या मुंबईच्या रचनेची सुरुवात झाली होती.
त्याचवेळी बर्याचशा मुंबईकरांना स्थलांतरासाठी पुणे हा पर्याय सोयीचा वाटत होता पण दोन वाढणार्या शहरांमध्ये एक मोठा 'डिसकनेक्ट' म्हणजे दुरावा होता प्रवासाचा !दिवसभरात पुण्याला जाणार्या मोजक्याच गाड्या होत्या.डेक्कन एक्सप्रेस आणि डेक्कन क्वीन ! सह्याद्री आणि महालक्ष्मी या कोल्हापूरकडे जाणार्या किंवा दक्षिणेकडे जाणार्या जयंती जनता या सारख्या गाड्या उपलब्ध असल्या तरी सोयीच्या नव्हत्या.
सरकारच्या भूमिका पण विचित्र होत्या.एरवी पुण्यासाठी डेडीकेटेड गाडी सुरु करण्यासाठी अनेक अडचणी सरकार सांगत होते पण घोड्यांच्या शर्यतीसाठी खास गाड्या सुरु करण्याची मानसिकता कायम होती. बर्याचजणांना माहिती नसेल पुण्याला घोड्याच्या रेस खेळायला जाणार्यांसाठी तेव्हा स्पेशल गाड्या होत्या.पुण्याकडे वाढणारा ट्रॅफीक हाताळण्यासाठी आधी एक नवी गाडी आली सिंहगड एक्सप्रेस. ती पण पुरेशी होईना म्हणून दुमजली डब्यांचाही प्रयोग सुरु झाला पण काही कारणामुळे तो प्रयोगही बारगळला.
याच दरम्यान एक सुवर्णसंधी चालून आली.एशीयाई खेळांचे यजमानपद भारताने स्विकारले होते.या खेळात एकूण ४५०० खेळाडूंनी भाग घेतला होता. त्यांच्या वाहतूकीसाठी खास बसेस बनवल्या गेल्या होत्या.एशियाड संपल्यावर हा बसचा ताफा एकट्या दिल्लीसाठी अनावश्यक होता म्हणून या बसेस सगळ्या राज्यांच्या हाती सुपुर्द करण्याचा सरकारनी निर्णय घेतला. महाराष्ट्राच्या वाट्यातही या बस आल्या. पण पुरेसे पैसे नाहीत या कारणास्तव आलेल्या बस परत करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने जवळजवळ घेतला होता.आंध्र प्रदेश सरकारची नजर या बसवर होतीच. जर महाराष्ट्र सरकार नाकारणार असेल तर त्या बस पण आम्हालाच द्या असा पाठपुरावा त्यांनी दिल्ली दरबारात सुरु केला होता.बस परत करण्याचा निर्णय ऐकल्यावर एक सनदी अधिकारी मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेले . येणार्या नविन बसची महाराष्ट्राला कशी आवश्यकता आहे हे त्यांनी समजावून सांगीतले पण चर्चा एकाच मुद्यावर अडकत होती.या खरेदीसाठी पैसे आणावे कसे ? बर्याच चर्चेनंतर या अधिकार्यानी स्पष्ट मत मांडले की पैशाची कमतरता हा मुद्दा नाही आहे.जर आलेल्या बस परत गेल्या तर महाराष्ट्र सरकारवर प्रतिगामीत्वाचा शिक्का कायमचा बसेल.आतापर्यंत जपलेली पुरोगामी राज्य अशी ख्याती पणाला लागेल. पुन्हा एकदा चर्चा नव्याने सुरु झाली. पैशाची जर व्यवस्था जर झाली तर गुंतवणूकीचा परतावा किती वर्षात होईल असा प्रश्न विचारण्यात आला. दूरदृष्टी असलेल्या त्या अधिकार्यांनी सरकारला एक योजना सांगीतली आणि पैशाची परतफेड एका वर्षात होईल खात्री दिली.या योजनेनुसार येणार्या सर्व नविन बसेस फक्त पुणे -मुंबई -पुणे अशा डेडीकेटेड बस म्हणून धावतील असा निर्णय घेण्यात आला.पुणे -मुंबई धावणार्या एशियाड बसच्या जन्माच्या कहाणी आहे ही अशी !!.एका वर्षाच्या आत ही सेवा फायद्यात चालायला लागली आणि एशियाड हा ब्रँड झाला.
एशियाडनी नक्की काय केले हा प्रश्न जर कोणी विचारला तर त्याचे एकच उत्तर आहे ते म्हणजे एशियाडने पुण्यामुंबईतला दुरावा नाहीसा केला आणि आधुनिक पुण्याची मुहूर्तमेढ रोवली.एक भाषीय पुण्याला बहुभाषीय -बहुप्रांतीक हा नवा चेहेरा एशियाडमुळे मिळाला. थोड्याच दिवसात पुण्याचीमेगा सिटीच्या दिशेने वाटचाल सुरु झाली.
एशियाड सुरु झाली म्हणजेच एक नविन सोय अस्तित्वात आली पण रस्ते तर जुनेच होते.नव्या मुंबईचा खाडी पूल सुरु झाल्यावर या टप्प्याला नविन वळण मिळाले.अंतर सरले पण सोयी सुविधा जुन्याच राहील्या.एसटी स्टँडला उतरल्यावर मुतारी कुठे हा प्रश्न विचारण्याची आवश्यकता नव्हती.स्टँडच्या गेटपर्यंत येणारा दुर्गंध आपोआप मार्गदर्शन करत होता.
त्यानंतर आला मोठा बदल म्हणजे मुंबई पुणे अतिजलद महामार्गाचा. पुणे तीन साडेतीन तासाच्या अंतरावर आले. पुण्याचा संपूर्ण नकाशा बदलला.औंध -पाषाण -हिंजवडी या शहरापासून दूर असलेल्या वस्त्यांचे रुपांतर नविन पुण्यात झाले .आता पुण्याचे दोन चेहेरे झाले.एक जुन्या मुंबई महामार्गाला जवळ असणारे पुणे आणि चांदणी चौकाच्या पलीकडेचे नविन पुणे !
एशियाडच्या रुपाने महाराष्ट्र राज्य परिवहन महा मंडळाला एक क्रांतीकारी ब्रँड मिळाला होता.टु बाय टु सिटची महामंडळाची ही पहिलीच बस .(त्यापूर्वी फक्त महाबळेश्वरला जाणारी बस टु बाय टु सिटची होती.) पण या ब्रँड इक्वीटीचा हवा तसा फायदा महामंडळाला करून घेता आला नाही. एशियाडला मिळणारे यश बघून महामंडळाने तशाच दिसणार्या अनेक बस बांधल्या पण फक्त रंग बदलून आणि मऊ सिटा टाकून सगळ्याच बस एशियाड होतात याच समजात महामंडळ राहीले.
पुण्यामुंबईच्या विकासाला जोड देणारी सेवा म्हणजे एशियाड ! महामंडळाने अनेक एशियाड बस सुरु केल्या पण पुण्यासारखा क्रांतीकारी बदल इतर शहरात घडून आला नाही.
एशियाड सामाजीक स्थित्यंतराची एक पायरी होती.मुंबईच्या गर्दीतून बाहेर पडून नव्या शहरात आयुष्याची नवी किंवा अधिक व्यापक सुरुवात करू इच्छिणार्यांना हातात आलेले एक संधी होती. ही संधी एक बसमुळे मिळाली म्हणून एशियाड हा ब्रँड झाला. हा ब्रँड मध्यभागी ठेवून एक नवी उंची गाठण्याची संधी महामंडळाकडे होती. पण असे झाले नाही. महामंडाळाच्या इतर सेवा -त्यांच्या बस स्थानकासकट आहे तशाच राहील्या. एशियाडच्या निमीत्ताने संपूर्ण बदल करण्याची संधी महामंडळाने घालवली.
ज्या महामंडळाची सुरुवात केवळ तीस गाड्यांनी झाली त्या महामंडळाकडे आज सोळा हजाराहून अधिक गाड्या आहेत.संख्यात्मक बळ महामंडळाकडे आहे परंतू सोळा हजारापैकी चौदा हजार गाड्या अजूनही लालडबा या कॅटेगरीतच आहेत.त्या लालडब्यालाच लालपरी असं म्हणत त्याचं सवंगीकरण आणि सोपीकरण करण्यात आलं बदल झाले पण ते सर्वांगिण बदल झाले नाहीत.त्यामुळे आताच्या घडीला खाजगीकरण केले तर ते कोणाच्या फायद्यासाठी हा प्रश्न उभा राहणारच आहे.