computer

चंद्रावर गेलेलं पहिलं घड्याळ ते जेम्स बॉंडने मिरवलेलं घड्याळ...ओमेगामध्ये इतर घड्याळांपेक्षा वेगळं काय आहे?

असे म्हणतात मुलींना प्रेमात पाडायला चंद्र आणण्याच्या गोष्टी केल्या जातात, पण हेच जर मुलांना प्रेमात पाडायला काय द्यायला हवं?? मुलांना किंवा पुरुषांना अशी कोणती गोष्ट एवढी अमूल्य आहे जिचे मूल्य चंद्राएवढे आहे. मुलांना मोठमोठ्या ब्रँडची घड्याळे खूप आवडतात. आणि त्यातही ओमेगाचे घड्याळ असेल तर! एकदा बोलून बघा मुलींनो. ओमेगा हे घड्याळाचे सर्वात मोठे आणि महागडे ब्रँड. ते घड्याळ लाखोंच्या किमतीपासून सुरू होते आणि जगभरातल्या मोठमोठ्या मंडळींच्या मनगटात मिरवले जाते. पण हा ब्रँड इतका मोठा कसा झाला, याची वैशिष्ट्य काय आहेत. ओमेगा घड्याळाचा रंजक इतिहास कधी वाचलात का? आज जाणून घेऊया ओमेगाचा इतिहास.

१८४८ मध्ये 'लुई ब्रँट' याने स्वित्झर्लंडमध्ये ओमेगा कंपनी स्थापन केली. १८७७ मध्ये त्याचे मुलगे लुई-पॉल आणि सीझर त्याच्यात सामील झाले आणि कंपनीचे नाव बदलून लुई ब्रँड आणि फिल असे करण्यात आले. सन १८९४ मध्ये कंपनीने नवीन 'ओमेगा कॅलिबर' नावाची योजना आणली.  याची जाहिरात करताना कंपनीचे घड्याळ अचूक वेळ सांगतेच तसेच दुरुस्त करणेही सोपे असते असा दावा करण्यात आला. ती योजना खूप यशस्वी  झाली. जगभर ओमेगा घड्याळाचे नाव पोहोचले. १९०३ मध्ये या कंपनीचे नाव बदलून Louis Brandt & Frére – Omega Watch Co. असे करण्यात आले. असा ओमेगा ब्रँड चा जन्म झाला.

(लुई ब्रँट)

ओमेगा घड्याळाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे याचे प्रिसिजन टायमिंग म्हणजे अचूक वेळ. हे पहिले मनगटी घड्याळ होते ज्याने १९५०मध्ये जिनिव्हा वेधशाळेत अचूकतेचा विक्रम मोडला. तसे पाहिल्यास १९व्या आणि २०व्या शतकाच्या सुरूवातीस क्वार्ट्ज आणि GPS अचूकतेसाठी मेकॅनिकल म्हणजे यांत्रिक टाइमपीसेसवर अवलंबून होते. ओमेगाबरोबर अनेक घड्याळ्याच्या कंपन्या स्पर्धेत होत्या. मोठमोठ्या घड्याळ कंपन्यांनी या स्पर्धेत एकमेकांना मात देण्यासाठी प्रयत्न केले. पण ओमेगा सगळ्यात अव्वल ठरली. जिनिव्हा वेधशाळेतील चाचण्यांमध्ये ओमेगाने सर्व सहा प्रकारात प्रथम पुरस्कार जिंकला. १९३१ मध्ये मिळालेल्या या मोठ्या यशामुळे ओमगाने जाहिरातीचे स्लोगन बदलून Omega – Exact time for life म्हणजे 'ओमेगा - आयुष्याचा अचूक वेळ' हे ठेवले.

ओमेगा हे अचुकतेत इतका मोठा ब्रँड बनले की जगातल्या अनेक महत्वाच्या मोहिमेत वापरले गेले. उदाहरणार्थ, चंद्रावर घातले गेलेले हे पहिले घड्याळ आहे. २१ जुलै १९६९ मध्ये नील आर्मस्ट्राँगने चंद्राच्या पृष्ठभागावर पहिले पाऊल टाकले तेव्हा त्याने आपल्या मनगटात घातलेले ओमेगा घड्याळ काढून ठेवले होते, कारण तेव्हा ऑन-बोर्ड घड्याळ खराब झाले होते. त्यामुळे फोटोत निलने घडयाळ घातलेले दिसले नाही. नंतर काही मिनिटांतच बझ अल्ड्रिनने चंद्राच्या पृष्ठभागावर पाऊल ठेवले तेव्हा 'ओमेगा स्पीडमास्टर प्रोफेशनल' चंद्रावर परिधान केलेले पहिले घड्याळ बनले. बझ अल्ड्रिनने निवृत्त झाल्यावर ते घड्याळ अमेरिकेच्या स्मिथसोनिअन या संग्रहालयाला भेट म्हणून देण्याचे ठरवले, पण ते घड्याळ त्या संग्रहालयापर्यंत कधी पोहोचलेच नाही. अल्ड्रिनच्या घरापासून ते संग्रहालयाच्या दरम्यानच ते कुठे गहाळ झाले हे आजपर्यंत न उलगडलेले कोडेच आहे.

ऑलिम्पिकमध्ये प्रत्येक मिलीसेकंदाचेही महत्त्व असते. खेळाडू जी कामगिरी करतात त्यात काही सेकंदाच्या अंतराचा फरक असतो. म्हणून या महत्वाच्या स्पर्धेत ओमेगा घड्याळ वापरले जाते. जेम्स बॉण्डचे अनेक चित्रपट तुम्ही पाहिले असतील. त्यातला हिरो बदलत गेला पण त्याच्या मनगटात असलेले घडयाळ कायम ओमेगाचेच होते. जेव्हा जेम्स बॉण्डच्या वस्तूंचा लिलाव करण्यात आला तेव्हा सर्वात जास्त किंमतीत विकलेली वस्तू हे त्याचे ओमेगाचे घड्याळ होते. समुद्राच्या आत होणाऱ्या अनेक मोहिमांमध्येही ओमेगा वापरण्यात आले. नासाने अंतराळात वेगवेगळ्या मोहिमांसाठी वापरण्यासाठी योग्य घड्याळ निवडण्यासाठी ओमेगा, रोलेक्स आणि लाँगिनेस-विट्टनौअर यांची खूप कडक चाचणी केली. घड्याळांच्या तपासणीसाठी त्यांनी इंजिनियर्सची टीम नेमली होती. या कठोर चाचणीतही तेव्हा ओमेगाच्या स्पीडमास्टरने बाजी मारली आणि सर्व अवकाश मोहिमेसाठी ओमेगा घड्याळाची निवड झाली.

ओमेगाचे अजून एक सर्वात महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे कुठल्याही ग्रहावर गेले तरी तिथल्या चुंबकीय क्षेत्राचा त्यावर परिणाम होत नाही. साधारणतः आपण हे पाहतो की लोखंडाकडे लोहचुंबक आकृष्ट होते. अनेक अँटी-मॅग्नेटिक म्हणजे लोहचुंबक रोधक घड्याळांवर चुंबकीय शक्तीचा परिणाम होतो आणि त्यामुळे त्याच्या हालचालींवर फरक पडतो. परिणामी घडयाळ बंद पडते. परंतु अमेगाच्या घड्याळ्यात नॉन-फेरस म्हणजे लोह सोडून इतर धातू वापरले जातात. त्यामुळे पृथ्वीच्या बाहेर जरी हे घड्याळ वापरले तरी ते कधी बंद पडत नाही शिवाय अचूक वेळ सांगते.

असा हा ओमेगाचा रंजक प्रवास. तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा.

 

लेखिका: शीतल दरंदळे

सबस्क्राईब करा

* indicates required