computer

अस्सल भारतीय ब्रँड- रावळगाव कॅन्डीजची गोष्ट...

आंबट गोड गोळी किंवा इंग्रजीत ज्याला कॅन्डी म्हणतात ती आपल्या प्रत्येकाच्याच बालपणाचा एक भाग आहे. ह्या रंगीत गोळ्यांचा विचार आला की लहान असो की मोठे सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटते. ८० आणि ९० व्या दशकात ज्यांनी बालपण अनुभवले त्यांना तर लाल हिरव्या रंगाच्या चकचकीत कागदातील लाल रंगाचे पान पसंद नक्कीच आठवत असेल. त्यावेळी चॉकलेट, गोळ्या, या सगळ्या गोष्टींचे कौतुकच वेगळे होते. आज पाच रुपयापासून पाचशे रुपयापर्यंतचे वेगवेगळ्या ब्राँडच्या कॅन्डीज बाजारात उपलब्ध आहेत, पण तेव्हा मिळणाऱ्या या रुपयाच्या गोळीची मजाच वेगळी होती. 

मुळात त्याचा तो लाल आणि हिरव्या रंगाचा चकचकीत कागद आणि ती गोळी खाल्ल्यावर जिभेला येणारी पान खाल्ल्याची चव आणि रंगत यांची पण गंमत वेगळी होती. पान लहान मुलांनी खायचं नसतं म्हणून पालक पान खायला मनाई करत असत तेंव्हा मुलांना ही गोळी खाऊनच समाधान मानावं लागे. असे ते दिवस. भारतातील पहिली-वहिली मेड इन इंडिया कॅन्डी म्हणजे पान पसंद.

आज अनेक मोठमोठ्या ब्रँडच्या कॅन्डीज बाजारात मिळत असल्या आणि त्यांनी ब्रँड कसा उभारला यावरही भरभरून बोलले जात असले तरी, रावळगावच्या कॅन्डीज म्हणजे ब्रँडपेक्षा भावानिकतेशी जोडलेली बाब आहे. आज अनेक बड्या ब्रँडच्या तुलनेत हा ब्रँड मागे पडला असला तरी, एकेकाळी याने भारतीय मनात आगळेवेगळे स्थान निर्माण केले होते.

पान पसंद, मँगो मूड, कॉफी ब्रेक अशा कॅन्डीज मिळण्याच्या आमिषाने तेव्हाची मुलं निदान शाळेत जायला तरी शिकली. तर मुलांना शाळेची गोडी लावण्यास कारणीभूत ठरलेली ही चॉकलेट्स आणि कॅन्डीज कुठून येत होती? कुठे तयार होत होती? हे तेंव्हा माहित असण्याची शक्यता नव्हतीच, पण ज्या चॉकलेटच्या आमिषाने आपण त्याकाळी शाळेत जात होतो त्याची जन्मकथा नक्की आहे तरी काय, हे आज जाणून घेऊया. 

(वालचंद हिराचंद दोशी)

सोलापूरमध्ये जन्मलेले 'वालचंद हिराचंद दोशी' यांनी व्यवसाय क्षेत्रात काही तरी मोठं काम करण्याचं स्वप्न पाहिलं होतं. त्यांनी भारतात अनेक नव्या व्यवसायांची त्याकाळी मुहूर्तमेढ केली आणि ते यशस्वीही करून दाखवले. रावळगाव कॅन्डीज हे देखील त्यांच्याच सुपीक कल्पकतेचे फळ होते. भारतीय कॅन्डीजचा पहिला ब्रँड म्हणून आजही पान पसंद ओळखले जाते. 

नाशिक जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी वालचंद यांना पत्र लिहून कळवले की, नाशिक मध्ये १५०० एकर जमीन पडून आहे आणि तिचा वापर उद्योगधंद्यासाठी करता येऊ शकतो. तेंव्हा वालचंद स्वतः नाशिक जिल्ह्यात गेले आणि त्यांनी या जमिनीची पाहणी केली. ही १५०० एकर जमीन विकत घेऊन तिला लागवडी योग्य बनवण्यासाठी प्रयत्न सुरु केले. 

मग या शेतात नेमकं काय पिकवता येईल त्यासाठी प्रयोग सुरु झाले. तेव्हा इथे ऊसाचे पिक चांगले येईल असे आढळले. वालचंद यांनीच महाराष्ट्रात ऊस पिकाची क्रांती घडवून आणली. त्यांनी नाशिक परिसरातील शेतकऱ्यांना ऊसाचे पिक घेण्यासाठी प्रोत्साहन दिले. यासाठी स्वतःचा साखर कारखानाही उभारला आणि याच साखरेपासून कॅन्डीज कारखाना. तेव्हा जाऊन कुठे आपण पान पसंदची चव चाखू शकलो आणि भारताला स्वतःची कॅन्डी मिळाली. 

१९३३ मध्ये त्यांनी रावळगाव साखर कारखाना लिमिटेडची स्थापना केली. यानंतर सात वर्षांनी याच रावळगाव ब्रँडच्या नावाने कॅन्डीजची निर्मिती केली जाऊ लागली. १९३४ मध्ये त्यांनी कळंब मध्ये आणखी एक साखर कारखाना उभारला. एकाच परिसरात त्यांनी दोन साखर कारखाने उभे राहिल्याने शेतकऱ्यांनाही आपला ऊस कुठे पाठवावा ही चिंता उरली नाही. पूर्ण नाशिक पट्ट्यात या दोन कारखान्यांनी भरपूर रोजगार निर्माण केला. 

रावळगाव-मालेगाव पट्ट्यातील घरटी एका व्यक्तीला तरी यामुळे खात्रीचा रोजगार निर्माण झाला. एकतर ऊस उत्पादक शेतकरी म्हणून किंवा कारखान्याचा कर्मचारी म्हणून.  पुढे याच साखरेतून चॉकलेट आणि गोळ्यांची निर्मिती केली जाऊ लागली. शंभर टक्के शाकाहारी आणि नैसर्गिक घटक वापरून बनवलेल्या कॅन्डीच हीच त्यांची खरी ओळख होती. 

या कारखान्यातून केवळ स्वतःचाच नफा कसा होईल याचा त्यांनी विचार केला नाही. शेतकऱ्यांचे उत्पादन चांगले होण्यासाठी त्यांनी कोणकोणते प्रयोग केले पाहिजेत याबद्दल ते नेहमी शेतकऱ्यांना माहिती देत राहिले. कारण चांगले उत्पादन मिळाले तर चांगली साखर निर्माण होईल, असे त्यांचे गणित होते. 

संपूर्ण कारखान्यात पाण्याचा काटकसरीने वापर केला जात असे. कारखान्यातील टाकाऊ उत्पादनापासून वीजनिर्मिती केली जात असे आणि हीच वीज कारखान्यासाठी वापरली जात असे. कारखान्यामुळे प्रदूषणात वाढ होते. हवेतील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते. हे सगळे पर्यावरणावरील परिणाम लक्षात घेऊन त्यांनी कारखान्याभोवती भरपूर वृक्षारोपण केले. प्रदूषणाला आळा बसेल अशा अनेक उपक्रमांनाही त्यांनी चालना दिली. इथल्या कर्मचाऱ्यांनाही नेहमी घरच्या माणसांसारखी वागणूक मिळाली. 

या कारखान्यातून निर्माण होणारे प्रत्येक उत्पादन शुद्ध असेल याची दक्षता घेतली जात असे. गोळ्यांवरचा कागद हा पारदर्शी असे, ज्यात ऑरेंज, रास्पबेरी, आणि लिंबाच्या चवीच्या गोळ्या असत. त्याच्या कागदावर रावळगावचे नावही स्पष्ट दिसत नसे. आपल्या नावाचा गाजावाजा न करता त्यांनी आपल्या उत्पादनाचा दर्जा आणि त्यातील सातत्य राखण्याचा कसोशीने प्रयत्न केला. पारदर्शी कागद ठेवण्यामागे हाच उद्देश होता की, ग्राहकांच्या त्याच्या पारदर्शीपणावर विश्वास बसावा. शिवाय, मुलांना कागदावरील नाव वाचून नाही तर चॉकलेट किंवा कॅन्डीचा रंग बघूनच गोळी कोणती आहे हे कळते म्हणूनच या कॅन्डीजवरील कागद पारदर्शी होता आणि हेच त्यांचे एक आगळेवेगळे वैशिष्ट्य होते.

पान पसंदची टीव्ही वरील जाहिरात तर फारच मोहक होती. कुणाही रागात असणाऱ्या व्यक्तीला जर पान पसंद खायाला दिले तर क्षणात तिचा राग नाहीसा होईल आणि तिला जे काही सांगायचे आहे ते ती तुम्हाला प्रेमळ भाषेत समजावून सांगेल. अशा आशयाच्या या जाहिरातीने तर प्रेक्षकांच्यावर मोहिनीच घातली होती. उदाहरणार्थ. या जाहिरातीतील आई मुलांना अभ्यास केला नाही म्हणून ओरडत असते. जेंव्हा तिला पान पसंद खायला दिले जाते तेंव्हा ती राग विसरून मुलांना प्रेमाने धमकी देते. जाहिरातीतील ही कल्पकता देखील त्यांच्या उत्पादनाप्रमाणेच एकदम वैशिष्ट्यपूर्ण. आजही लाल कागदातील  पान पसंदचे चित्र जरी पाहिले तरी आजही जिभेवर चव रेंगाळते आणि मन बालपणीच्या रंगीत दुनियेत हरवून जाते.

लेखिका: मेघश्री श्रेष्ठी

सबस्क्राईब करा

* indicates required