पेपरवेट, गणपती आणि संगीत सौभद्रचा शेवट!! वाचा सौभद्र गणपतीची कथा..
गणेश पुराणात काय किंवा बर्याच इतर पोथ्या पुराणात काय, श्रीगणेशाची पारंपारीक अनेक नावं आपण वाचत असतो. गणपतीच्या प्रतिष्ठापनेच्या दिवशी १०८ नावांच्या नामावलीचे वाचन आपण करत असतोच. पण याखेरीज अनेक देवस्थाने अशी आहेत की ज्यात उल्लेख असलेली नावं कोणत्याच पुराणात नाहीत. उदाहरणार्थ, वाईचा 'ढोल्या' गणपती, पुण्यातला ' गुपचूप' गणपती, 'चिमण्या' गणपती किंवा नाशिकचा 'नवश्या' गणपती!! अर्थात ही नावं त्या दैवताच्या कौतुकाच्या पोटी किंवा ममत्वाच्या भावनेतून आलेली असतात.
आज आम्ही तुम्हाला माहिती असलेल्या नावात आणखी एक भर टाकणार आहोत ते नाव म्हणजे 'सौभद्र गणपती'!
आता 'सौभद्र' म्हटलं की नाटकवेड्या मराठी मनांत एकच विचार येतो तो म्हणजे 'संगीत सौभद्र' या नाटकाचा! हे नाटक लिहिलं गेलं १८८२ साली, म्हणजे जवळजवळ १३८ वर्षांपूर्वी. पण आजही सौभद्र हे नाव उच्चारलं की 'राधाधर मधुमिलिंद', 'प्रिये पहा', 'वद जाऊ कुणाला शरण गं', 'कोण तुजसम सांग मज गुरुराया' ही नाट्यगीतं आठवतात. त्याकाळी नाटकात इतकी पदं असत की त्यांचा आकडा आज ऐकला तर चक्क्करच येईल. सौभद्र नाटकात तब्बल १४५ नाट्यगीतं होती. असं असूनही आजही या नाटकाचे प्रयोग होत असतात. एकही अशी नाटक कंपनी नाही की ज्या कंपनीने ' सौभद्र' नाटकाचा प्रयोग केला नाही. पण मग या नाटकाचा आणि गणपतीचा काय संबंध?
ही कथा पण नाटकाइतकीच रंजक आहे. सौभद्र हे अण्णासाहेब किर्लोस्कर यांनी लिहिलेले दुसरे नाटक. पहिले नाटक होते 'शाकुंतल'. पण ते भाषांतर असल्याने अण्णासाहेबांना आपले असे नवे नाटक लिहायचे होते. नाटक लिहिण्याचे काम सुरु झाले आणि तीन अंक लिहून तयार झाले आणि अण्णासाहेबांना पुढे काय लिहावे हेच सुचेना. आपण 'रायटर्स ब्लॉक' म्हणतो अशी त्यांची मनःस्थिती झाली. रसिक प्रेक्षक मात्र नाटकाची आतुरतेने वाट बघत होते. शेवटी लिहिलेल्या तीन अंकाचाच एक प्रयोग १८८२ साली रंगमंचावर करण्यात आला. अपूर्ण नाटक असूनही नाटक प्रेक्षकांना आवडले.
(अण्णासाहेब किर्लोस्कर)
पण अण्णासाहेब किर्लोस्करांना मात्र पुढचा अंक लिहिता येईना. लिहायला सुरुवात करायची. चार ओळी लिहिल्या की त्या पसंत न पडल्याने कागद फाडून टाकायाचा असं सारखं सारखं व्ह्यायला लागलं. किर्लोस्कर विमनस्क झाले. माझी कवित्व शक्ती गायब झाली की काय या प्रश्नाने त्यांना घेरून टाकलं.
अशा विमनस्क अवस्थेत ते घराबाहेर पडले. बाहेर एका दुकानात शोकेसमध्ये अनेक निरनिराळ्या वस्तू विक्रीसाठी मांडून ठेवल्या होत्या. त्याकडे त्यांचे लक्ष गेले. त्या रंगीबेरंगी वस्तूत त्यांना एक काचेचा पेपरवेट दिसला. त्या पेपरवेटमध्ये गणपती होता!
(प्रातिनिधिक फोटो)
अण्णासाहेबांना वाटलं की हा गणपती आपल्याला साद घालतो आहे. मनोमन वंदन करून त्यांनी तो पेपरवेट खरेदी केला. घरी येऊन त्यांनी परत बैठक मारली. समोरचे कागद उडू नयेत म्हणून नवीन खरेदी केलेला पेपरवेट ठेवला. तेव्हा त्यांना वाटलं की आपल्याकडे गणपती बघतो आहे. अण्णासाहेबांनी मनोमन प्रार्थना केली आणि काय आश्चर्य समोर कथानक उलगडत गेले-डोळ्यासमोर नाटक दिसायला लागले. काही वेळात चौथा अंक लिहून तयार झाला देखील!! अर्थातच पेपरवेटमधल्या या गणपतीला नाव मिळालं 'सौभद्र गणपती'!
आजही हा पेपरवेट बेळगावात बघण्यासाठी उपलब्ध आहे असे म्हटले जाते. आपल्या सर्वांच्या मनात गणपती असतोच. तोच अधूनमधून प्रकट होतो असेच म्हणावे लागेल.
लेखक : रविप्रकाश कुलकर्णी