दुचाकीपुराण : अपयश आणि दिवाळखोरी पचवून दिमाखात उभी असलेली बुलेट!!
काही गोष्टी अशा असतात की पिढ्या बदलतात मात्र या गोष्टींचे गारूड कधीही कमी होत नाही. उलट नव्या पिढीला जास्त भुरळ पडते. हे वाचत असताना अनेक गोष्टी तुमच्या डोक्यात तरळून गेल्या असतील. तर आज आपण गोष्ट वाचणार आहोत, बुलेटची!!! गेली अनेक दशके बुलेट भारतीय मनावर राज करत आहे. बुलेटचा भन्नाट आवाज कानावर येणे म्हणजे सुकून!!! ही भावना अनेकांची असते.
बुलेट म्हणजे बाईक नव्हे, तर इमोशन आहे... पासून तर एकदा बुलेट घेऊन लडाखला जायचंय असे म्हणणे असो, बुलेट म्हणजे लोकांचे प्रेम आहे. पण बुलेटचा इतिहास काही सदैव यशाची कहाणी नाहीय. एक काळ असा होता की कंपनी बंद पडण्याची वेळ आली होती. दिवाळखोरी ते पुन्हा एका यशस्वी ब्रँड हा बुलेटचा प्रवास खरोखर रंजक आहे. चला जाणून घेऊया...
बुलेट भारतात आली देश स्वतंत्र झाल्याच्या दोन वर्षानंतर, म्हणजे १९४९ साली. त्याआधी १८९१ पासून हळूहळू एक सायकल ते सर्वांची लाडकी बुलेट असा प्रवास रॉयल एनफिल्ड कंपनीच्या या बाईकचा झाला होता. १८९८ साली चारचाकी गाडी तयार झाली त्यावेळेस कंपनीचे नाव द एनफिल्ड सायकल्स कंपनी लिमिटेड असे ठेवण्यात आले होते. १९०१ साली एनफिल्डने पहिल्यांदा मोटरसायकलची निर्माती केली. बॉब वॉकर स्मिथ आणि फ्रेंचमन ज्यूल्स गोबियट यांनी या मोटरसायकलचे डिझाईन केले होते.
या मोटरसायकलच्या वाटचालीचा इतिहासही मोठा रंजक आहे. पहिली मोटारसायकल बनवल्यानंतर एनफिल्डने १९०९ साली पहिल्यांदा वी ट्विन २९७ सी सी इंजिन लॉन्च केले. दुचाकी गाड्यांच्या अनेक स्पर्धा भरवल्या जाण्याचा तो काळ होता. या सगळ्या स्पर्धांमध्ये नव्या वी ट्विन २९७ सी सी इंजिन मोटरसायकलने विजय मिळवला. याच काळात जगात पहिल्या महायुद्धाचे वारे वाहू लागले होते. युद्ध जरी अनेकांसाठी डोकेदुखी ठरत असले, तरी काही लोकांसाठी ते संधी ठरले. या एनफिल्ड बाईकसाठी दुचाकी व्यवसायाच्या दृष्टीने युद्ध लाभदायक ठरले.
आता कंपनीने दोन स्ट्रोक असलेली बाईक लॉन्च केली. युद्धकाळात ब्रिटन, बेल्जियम, फ्रान्स, अमेरिका, रशिया यांना या गाड्या पुरवण्यात आल्या. एनफिल्डच्या हातात आता मुबलक पैसा होता. त्यामुळे त्यांना या बाईकवर विविध प्रयोग करता येणार होते. १९२४ साली कंपनीकडून पहिल्यांदा पायाजवळ गिअर असणारी ४ स्ट्रोक्सची ३५० सीसी बाईक बाजारात आणली गेली. या काळात कंपनीला अजून बिजनेस हवा असल्याने त्यांनी लेडीज मॉडेल देखील बाजारात आणले. यात २२५ सीसी असलेली दोन स्ट्रोकची बाईक होती.
या कंपनीचा इतिहास साधा सरळ नाही. अनेक चढउतार या कंपनीने बघितले. सुरुवातीचा चढ संपून आता उताराची वेळ होती. अचानक एके दिवशी कारखान्यात आग लागली आणि कंपनीचे वाईट दिवस सुरू झाले. पण यातूनही एनफिल्ड सहीसलामत बाहेर निघाली. वर्ष १९३४ आता उगवले होते. रॉयल एनफिल्ड कंपनीकडून २५०, ३५० आणि ५०० सीसीची तीन सारखी मॉडेल्स लॉन्च केली गेली. ही बाईक लंडन येथील ऑलिंपिया मोटर सायकल शो मध्ये उतरविण्यात आली. या गाडीने चांगलाच धुमाकूळ घातला. या मॉडेलचे नाव होते, बुलेट!!!
आतापर्यंत आपण बघितला तो होता रॉयल एनफिल्ड बाईकचा इतिहास. यापुढे तो असणार आहे बुलेटचा इतिहास!! बुलेटचे आगमन झाले आणि बॉब स्मिथ यांचे निधन झाले. आता कंपनीची धुरा बॉबचा मुलगा मेजर थँक्स स्मिथ याच्या खांद्यावर आली. आता नव्या पद्धतीने कंपनीचा प्रवास सुरु होणार होता. मधल्या काळात अनेक बदल झाले. १९४९ साली कंपनीने ३५० सीसी मॉडेल नव्या पद्धतीने लॉन्च केले. याचवेळी के. एस. सुंदरम अय्यर यांनी मद्रास मोटर्स सुरू केली. या कंपनीचे काम युकेहून मोटारसायकल भारतात आणण्याचे होते.
१९५२ साली पहिल्यांदा भारतीय सैन्याकडून ५०० आणि ३५० सीसी बुलेट्स मागविण्यात आल्या. भारतात बुलेटची हवा झाली ती याच काळात. भारतात बुलेटची लोकप्रियता वाढत होती. ही गोष्ट लक्षात घेऊन १९५५ साली मद्रास मोटर्स आणि रेड्डीज यांनी पार्टनर होत भारतात एनफिल्ड इंडिया सुरू केली. सुरुवातीला लंडहून मशीन मागवून मग मद्रासला त्यांना असेंबल करणे असा प्रकार होत असल्याने बुलेट महाग येत असे. म्हणून सुरुवातीला मोजक्या लोकांकडे बुलेट दिसे. याचा फायदा असाही झाला की सर्वांना आपल्याकडेही बुलेट असायला हवी असे वाटू लागले.
बुलेट जसजसे लोकांकडे येत गेली तसतशी तिची लोकप्रियता वाढत गेली. हा तोच काळ होता जेव्हा बुलेट स्टेटस सिम्बॉल बनली होती. आता बुलेट यशाच्या शिखरावर होती. यश बघितले की अपयश बघावे लागणे हे बुलेटचे प्राक्तन असल्याने ९० च्या दशकात बुलेटची विक्री झपाट्याने कमी झाली. राजदूत, सीडी १०० गाड्यांसोबत स्पर्धा करण्यात बुलेट कमी पडू लागली. बुलेटला आत बस्तान आवरावे लागेल की काय असे वातावरण निर्माण झाले होते. पण या काळात आयशरने बुलेटवर विश्वास दाखवला. १९९४ साली आयशरने ही कंपनी खरेदी केली आणि बुलेट कशीबशी तगली. पण नव्या झगमगाटी बाईक्ससमोर अजूनही बुलेट टिकत नव्हती.
वर्ष २००० आले. जग २१ व्या शतकात प्रवेश करताना बुलेट मात्र जुन्या जमानाची बाईक झाली होती. लोकांना नवे हवे होते. म्हणून आयशरच्या बोर्डाने बुलेटचे प्रोडक्शन बंद करावे असा सल्ला मालकांना दिला. पण कंपनीचे मालक विक्रम लाल यांचा मुलगा सिद्धार्थ लाल याने बुलेटला पुन्हा गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी दोन वर्षांचा वेळ मागून घेतला. हा सिद्धार्थ खमक्या होता. काही झाले तरी आपण प्रोडक्शन बंद करणार नाही. भलेही अजून दहा वर्ष बुलेटला मार्केटमध्ये जागा तयार करण्यासाठी लागले तरी चालेल असे त्याने ठरवून टाकले होते.
त्याने आता १८ ते ३५ या वयोगटातील युवकांना समोर ठेवून लांबचा प्रवास करू शकणारी बुलेट तयार करायचे ठरवले. २००१ साली ३५० सीसी बुलेट इलेक्ट्रा त्यांनी बाजारात आणली. ही बुलेट विविध कलर आणि इग्नेशनमध्ये लॉन्च करण्यात आली. तसेच या बाईकची मार्केटिंग नव्या जमान्याची बाईक म्हणून करण्यात आली. सिद्धार्थच्या अपेक्षाप्रमाणे इलेक्ट्रा लोकांच्या आवडीस उतरू लागली आणि पुन्हा एकदा बुलेटने मार्केट काबीज करण्यास सुरुवात केली. २००२ साली कंपनीने थंडरबर्ड मार्केटमध्ये आणली. ब्रेक्स आणि गियर आधी इतर गाड्यांच्या तुलनेत बरोबर उलटे असणे हा तो काळ होता.
नव्या गाड्यांमध्ये ब्रेक आणि गिअर यांची जागा बदलण्यात आली आणि कंपनी नफ्यात आली. बुलेटने यानंतर कधीच मागे वळून बघितले नाही. एकामागून एक भन्नाट मॉडेल्स बाजारात येत गेल्या आणि लोकांनी त्यांना उचलून धरले. २००९ साली क्लासिक ३५० आणि ५०० बाजारात आल्या आणि २०१६ साली हिमालया मॉडेल बाजारात आले. हे सर्व मॉडेल तुफान हिट ठरले. आजही बुलेट बाजारात टॉपवर टिकून आहे. जर कधीकाळी विक्री होत नाही म्हणून बुलेट बंद करण्यात आली असती तर आज आपल्याला बुलेटची मजा घेता आली नसती.