जाणून घ्या तिबेटमधली रामायणाची कथा. या कथेचा शेवट तुम्हांला नक्कीच आवडेल!!
भारतीय संस्कृतीत रामायणाला अढळ स्थान आहे. फक्त भारतीय संस्कृतीच नाही तर रामायणाच्या कथेने आशियातील मोठ्या भूभागावर आपला प्रभाव पाडला आहे. वाल्मिकी ऋषींनी साधारण २५०० वर्षांपूर्वी रामायण लिहिलं. हे रामायण व्यापारी, प्रवासी यांच्या मार्फत संपूर्ण आशिया खंडात पोहोचलं.
परिणामी रामायणाने भारतासोबत मलेशिया, चीन, म्यानमार, फिलिपाईन्स या देशांवर तर प्रभाव पाडलाच, पण रामायणाची अनेक रूपे तयार झाली.
आज उपलब्ध असलेल्या माहितीप्रमाणे रामायणाच्या जवळजवळ ३०० पेक्षा जास्त आवृत्या आहेत. म्हणजे तब्बल ३०० प्रकारे रामायण सांगितलं गेलं आहे. यात भारतातील जैन रामायण, बंगाली रामायण, तमिळ रामायण, अद्भुत रामायण, बौद्ध रामायण, अध्यात्म रामायण, तुलसीदासकृत रामचरितमानस, कालिदासचं रघुवंश इत्यादींचा तर समावेश होतोच पण मलेशिया, चीन, कंबोडिया, लाओस, म्यानमार, या भागातल्या रामायण कथांचाही समावेश होतो.
(थायलंडची रामायण आवृत्ती रामकेन नावाने ओळखली जाते.)
मंडळी, या सगळ्यात वाल्मिकी ऋषींनी सांगितलेलीच कथा आहे, पण त्यात काही लहानसहान बदल आहेत. जसे की आज आपल्याला माहित असलेल्या रामायणाचा लक्ष्मण रेषा हा अविभाज्य भाग आहे, पण वाल्मिकी रामायणात लक्ष्मण रेषेचा उल्लेख आढळत नाही. तसा उल्लेख रामचरितमानस आणि इतर काही रामायण कथांमध्ये आढळतो.
या सर्व रामायण कथांमध्ये काय फरक आहे हे आम्ही पुढे केव्हा तरी सांगूच, पण आज रामनवमीच्या निमित्ताने आम्ही तिबेटीयन रामायणाची कथा घेऊन आलो आहोत. तिबेटीयन रामायण आणि त्याच्या मागचा इतिहास फारच रोचक आहे.
२० व्या शतकाच्या सुरुवातीला तिबेटच्या रामायणाचा शोध लागला. तिबेटच्या दूनहुआंग येथील गुहेत काही धार्मिक ग्रंथांचे हस्तलिखित सापडले होते. यात रामायणाच्या ६ हस्तलिखितांचा समावेश होता. ही हस्तलिखिते अपूर्ण होती. कालांतराने या सहा हस्तलिखितांना जोडल्यानंतर संपूर्ण असं तिबेटी रामायण जगासमोर आलं. असं म्हणतात की रामायणाची ही आवृत्ती त्या भागात ४ आणि ११ व्या शतकात प्रचलित होती.
तिबेटी रामायणाची कथा आपल्याकडच्या प्रचलित रामायणापेक्षा थोडी वेगळी आहे. तिबेटी रामायणात सीता चक्क रावणाची मुलगी म्हणून समोर येते. रावणाचं नाव असतं दशग्रीव म्हणजे १० डोकी असणारा.
तर, गोष्टीच्या सुरुवातीला रावणाच्या पोटी एका मुलीचा जन्म होतो. या मुलीमुळे राक्षसांचा सर्वनाश होईल अशी भविष्यवाणी झाल्यानंतर रावण आपल्या मुलीला तांब्याच्या पेटीत बंद करून नदीत सोडून देतो. एक शेतकरी आपल्या शेतीसाठी कालवा बांधत असताना त्याला ही पेटी सापडते. आत असलेल्या मुलीला तो आपल्या मुलीप्रमाणे वाढवतो. शेतकरी या मुलीला रौलरेंडमा नाव देतो.
रौलरेंडमा मोठी झाल्यानंतर तिच्यासाठी योग्य वर निवडण्यात येतो. म्हणजे रामाशी तिचा विवाह होतो. तिबेटी रामायणात रामाला रामन म्हटलं आहे. हा रामनच रौलरेंडमाला सीता हे नाव देतो.
यापुढची कथा प्रचलित रामायाणाप्रमाणेच आहे. रामाला वनवास भोगण्यासाठी सर्व गोष्टींचा त्याग करावा लागतो. त्याच्या सोबत सीता आणि लक्ष्मण (तिबेटी रामायणात ‘लग्सन’) दोघेही वनवासला निघतात. या कथेत शूर्पणखाचं नाक कापण्याचा प्रसंग नाही. रावणाला सीतेच्या सौंदर्यबद्दल माहिती मिळते. त्याला मदत करण्यासाठी शूर्पणखा मृगाचं रूप घेऊन येते. रामन तिच्या शिकारीसाठी तिच्या मागे धावतो. त्याच्या मागे लक्ष्मणही धावतो. एकट्या पडलेल्या सीतेला कपटाने घेऊन जाण्यासाठी रावण हत्ती आणि घोड्याचं रूप घेऊन येतो. सीता दोन्ही प्राण्यांवर बसण्यास नकार देते. सीतेला हात लावल्यास आपण जाळून जाऊ या भीतीने रावण सीता उभ्या असलेल्या भूमीच्या तुकड्यालाच घेऊन लंकेला रवाना होतो.
पुढे रामन आणि लग्सन यांची भेट पग्सू, सिंदू आणि हनुमंत या वानरांशी होते. या पुढच्या कथेत तसे फारसे बदल झालेले दिसत नाहीत. हनुमान सीतेकडे रामाची अंगठी आणि पत्र घेऊन जातो आणि सीता पत्राद्वारे उत्तर पाठवते.
रावण वधाची कथा तिबेटी रामायणात फारच वेगळ्या प्रकारे सांगण्यात आली आहे. शेवटच्या युद्धात रावण अदृश्य होतो, पण राम त्याचं पहिलं डोकं कापण्यात यशस्वी होतो. हे पहिलं डोकं एका घोड्याचं असतं. हे पहिलं डोकं अत्यंत महत्त्वाचं असल्याने त्यावाटे रावणाचा जीव जातो. प्रचलित रामायणाप्रमाणे तिबेटी रामायणात रावणाचा जीव नाभीवर बाण लागल्याने होत नाही.
तिबेटी रामायणाची एक खासियत म्हणजे त्याचा शेवट गोड आहे. रावणाचा वध करून सीतेला परत मिळवल्यानंतर कालांतराने राम संशयापोटी तिला पुन्हा वनवासात पाठवतो. यावेळी हनुमान रामाची मनधरणी करून सीतेला पुन्हा आणण्याची विनंती करतो. हनुमानाचं ऐकून राम सीता आणि तिच्या दोन मुलांना घरी घेऊन येतो आणि सगळे मिळून सुखाने नांदतात.
रामायण म्हणजे राम आणि सीता यांची ही गोष्ट अनेक वर्षांपासून आशिया खंडात प्रचलित आहे. साहजिकच ती इतक्या वेळा ऐकवली गेली की त्यात सूक्ष्म बदल होत गेले. कथेत हे लहानसहान बदल झाले असले तरी मूळ कथा तीच आहे. वाईटावर चांगल्याचा विजय, अहंकारावर नम्रतेचा विजय याच गोष्टी त्यातून सांगण्याचा प्रयत्न होतो. तुम्हाला तिबेटीयन रामायण कसं वाटलं ते आम्हाला नक्की सांगा.