computer

बोभाटा बाजार गप्पा : बॉम्बे बर्मा ट्रेडिंग कार्पोरेशन शेअर्स....बाजारातली 'गुप्त खजिना' कंपनी !!

बॉम्बे-बर्मा ट्रेडिंग कॉर्पोरेशन ही अगदी नावाला जागणारी ट्रेडिंग कंपनीच आहे. चहा-कॉफीचे मळे, ऑटो इलेक्ट्रिक पार्ट्स, प्रिसिजन वेईंग मशीन (वजनाचं यंत्र), अशा आणि इतर अनेक उद्योगात ट्रेडिंग करणारी ही कंपनी आहे. १५० हून अधिक वर्ष अस्तित्वात असलेल्या कंपनीचे हे दर्शनी स्वरूप आहे.

या दर्शनी स्वरूपाच्या आड एक खानदानी रईस कंपनी लपलेली आहे. ब्रिटानिया या कंपनीच्या जवळजवळ ५०% शेअर्सची मालकी बॉम्बे-बर्मा ट्रेडिंग कॉर्पोरेशनकडे आहे. थोडक्यात ब्रिटानियाचा अर्धा मालकी हक्क या एका कंपनीकडे आहे. या आधीच्या लेखात आपण एलसीड इन्व्हेस्टमेंट कंपनीचे उदाहरण बघितलेच आहे, ज्यामध्ये एशियन पेंट्सचे २ कोटी ८३ लाख शेअर्सची मालकी आहे. बॉम्बे-बर्मा ट्रेडिंग कॉर्पोरेशनकडे ५०% ब्रिटानियाचे शेअर्स तर आहेतच, सोबत बॉम्बे डाईंगसारख्या कंपनीच्या शेअर्सची थप्पी पण आहे. याखेरीज वाडिया ग्रुपच्या गो-एअरचे पण शेअर बॉम्बे-बर्मा ट्रेडिंग कॉर्पोरेशनकडे आहेत

शेअर बाजाराच्या भाषेत वाडिया ग्रुपची ही होल्डिंग कंपनी आहे. सर्वसाधारण गुंतवणूकदाराला या माहितीचा काय उपयोग असतो ते आपण समजून घेऊया !!

जेव्हा बाजार मंदीत असतो तेव्हा या कंपन्यांचे शेअर्स ६० ते ७० टक्के डिस्काउंट मध्ये उपलब्ध असतात. उदाहरणार्थ बाजार पडला तर ब्रिटानियाचे शेअर्स ज्या प्रमाणात पडतील त्यापेक्षा होल्डिंग कंपन्यांचे शेअर्स जास्त पडतात. अशावेळी जर होल्डिंग कंपन्यांचे शेअर्स घेतले तर पुढच्या तेजीत जास्त फायदा होतो.

प्रश्न असा आहे की या होल्डिंग कंपन्यांमध्ये नियमित गुंतवणूक का करायची नाही ? याचे साधे सरळ सोप्पे उत्तर असे आहे की होल्डिंग कंपन्यांचे ‘व्हॉल्यूम्स’ फार कमी असतात. आता तुम्ही विचाराल व्हॉल्यूम्सची भानगड काय आहे ? तर, व्हॉल्यूम्स म्हणजे खरेदी विक्रीसाठी उपलब्ध असलेले शेअर्स.

होल्डिंग कंपनीपेक्षा मूळ कंपनीचे ‘व्हॉल्यूम्स’ जास्त असतात. व्हॉल्यूम्स जास्त असले की गुंतवणूकदाराला ट्रेडिंग अपॉर्च्यूनिटी (व्यापाराची संधी) सहज आणि वारंवार मिळते. लक्षात ठेवा मंदीमध्ये होल्डिंग कंपनी तर तेजीमध्ये मूळ कंपनी. अशी व्यापारनीती बाजारात वापरली जाते.

आता थोडा गृहपाठ करा.

“इंडियन पॅरॉक्साइड” या कंपनीची होल्डिंग कंपनी कोणती आहे ते शोधून काढा.

वेगवेगळे उद्योगसमूह अशा होल्डिंग कंपन्या स्थापन करतात. गुंतवणूकदाराला माहिती असावी म्हणून काही प्रसिद्ध होल्डिंग कंपन्यांची यादी आम्ही सोबत देत आहोत.

१. कल्याणी इन्व्हेस्टमेंट्स. कल्याणी ग्रुपची होल्डिंग कंपनी.

२. पिलानी इन्व्हेस्टमेंट्स. बिर्ला ग्रुपची होल्डिंग कंपनी.

३. बजाज होल्डिंग कंपनी. या कंपनीकडे बजाज ऑटोचे ३१% शेअर्स आहेत, तर बजाज फिनसर्वचे ४०% शेअर्स आहेत.

(एका लग्नाची गोष्ट, एका लग्नाची दुसरी गोष्ट, एका लग्नाची पुढची गोष्ट असे चित्रपट आणि नाटकं तुम्ही बघितलीच असतील, पण शेअर बाजाराशी संबंधित एका घटस्फोटाची गोष्ट या नाटकाची कथा उद्या आपण बाजार गप्पांमध्ये वाचूया.)

 

बोभाटा बाजार गप्पांमध्ये शेअर बाजाराचा आढावा घेते. कुठल्याही कंपनीचे शेअर खरेदी-विक्री करणं हा सल्ला देत नाही. बोभाटाची कोणतीही जबाबदारी तुमच्या निर्णयाला बांधील नाही.

सबस्क्राईब करा

* indicates required