शनिवार स्पेशल : भारतातील १० अग्रगण्य एथिकल हॅकर्स !!
हल्लीच्या सायबर हल्ल्यामुळे हॅकर्स बद्दल आपल्या मनात एक ठराविक चित्र तयार झालं आहे. हॅकर म्हणजे तुमच्या पैश्यांवर डल्ला मारणारा किंवा तुमच्या कम्प्युटर सिस्टम मधून तुमची माहिती चोरणारा अशीच समजूत असते. पण फार क्वचित लोकांना हे माहित आहे की हॅकर्सचा आणखी एक प्रकार आहे जो ‘निरुपद्रवी’ असतो. अशा हॅकर्सना “Ethical hacker” म्हणतात. यातला फरक आधी जाणून घेऊया.
एथिकल हॅकर हा अधिकृतरीत्या हॅकींगचं काम करत असतो. म्हणजे उदाहरणार्थ, जेव्हा एखादी कंपनी हॅकरला नोकरीवर ठेवून घेते तेव्हा या हॅकरचं काम असतं कंपनीच्या मौल्यवान माहितीची सुरक्षा पाहणे. ही सुरक्षा कशी केली जावी याचा सगळा आराखडा एथिकल हॅकर तयार करतो. सोप्प्या भाषेत, कोणत्याही ‘चोर’ हॅकरने कंपनीची माहिती चोरू नये म्हणून एथिकल हॅकर सुरक्षा निर्माण करत असतो. अनेक देशांमध्ये असे एथिकल हॅकर्स शत्रू राष्ट्राच्या सुरक्षा यंत्रणेला भेदण्याचं काम करत असतात.
मंडळी, एथिकल हॅकर म्हणजे काय हे तर आपण समजून घेतलं. आजचा शनिवार स्पेशलचा विषय आहे भारतातील १० अग्रगण्य हॅकर्स. भारतात आज अनेक एथिकल हॅकर्स विविध क्षेत्रातल्या सायबर सुरक्षेची काळजी घेत आहेत. या मध्ये १० असे एथिकल हॅकर्स आहेत ज्यांना एथिकल हॅकर्सच्या गोटात ‘हिरो’ समजलं जातं.
चला तर पाहूयात भारतातले १० अग्रगण्य एथिकल हॅकर्स !!
१. त्रिशनित अरोरा
त्रिशनित अरोरा सायबर सुरक्षा कंपनी TAC Security चा संस्थापक आणि संचालक आहे. त्याने आजवर सायबर सुरक्षा, एथिकल हॅकिंग आणि वेब संरक्षणावर अनेक पुस्तकं लिहिली आहेत. त्रिशनित अरोराला हॅकिंग हिरो म्हटलं जातं. तो ज्या बड्या कंपन्यांचा डाटा सुरक्षित ठेवण्याचं काम करतो त्यात रिलायंस इंडस्ट्रीज, CBI, पंजाब पोलीस, गुजरात पोलीस यांचा समावेश होतो. सायबर हल्ल्याचा छडा लावण्यात त्याने पोलिसांना मदत तर केलीच आहे पण त्यासोबतच पोलीस अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्याचंही काम केलं आहे.
२. अंकित फडिया
अंकित फडियाला वयाच्या १० व्या वर्षी त्याच्या आईवडिलांनी कम्प्युटर आणून दिला. जवळजवळ एक वर्षांनी एका वर्तमानपत्रात हॅकिंग बद्दल लेख वाचल्यानंतर त्याला हॅकिंग विषयात रस वाटू लागला. चक्क १४ व्या वर्षी त्याने एथिकल हॅकिंगवर पुस्तकही लिहिलं. अंकितच्या कौशल्याबद्दल आणि नैतिकतेबद्दल अनेक वाद आहेत. त्याने आजवर १४ पुस्तकं लिहिली असून त्याच्यावर साहित्य चोरीचाही आळ घेण्यात आला होता.
३. कौशिक दत्ता
कौशिक हा अॅन्ड्रॉइड मोबाईल फोन्स हॅक करण्यासाठी प्रसिद्ध आहे. त्याने ClockworkMod ही सॉफ्टवेअर कंपनी स्थापन केली आहे. ClockworkMod कंपनी अॅन्ड्रॉइड स्मार्टफोन्ससाठी विविध सॉफ्टवेअर तयार करते. या कंपनीच्या माध्यमातून तो अॅन्ड्रॉइडची सुरक्षा वाढवण्यासाठी सध्या काम करतोय.
४. सनी वाघेला
वयाच्या १८ व्या वर्षी सनी वाघेलाने SMS आणि कॉल फोर्जिंग सारख्या मोबाईल नेटवर्क्स मध्ये पळवाट शोधून काढली होती. पुढच्याचवर्षी त्याने ओर्कुट सारख्या त्याकाळातील प्रसिद्ध सोशल मिडिया नेटवर्क मधल्या सुरक्षेच्या त्रुटी शोधून काढल्या होत्या. त्याने वयाच्या २० व्या वर्षी यशस्वीपणे अनेक सायबर गुन्हेगारांचा छडा लावला होता. तो आज सुरक्षा विशेषज्ञ म्हणून काम करत आहे.
५. विवेक रामचंद्र
विवेक रामचंद्र हे कम्प्युटर, नेटवर्क व वायरलेस सुरक्षेचे विशेषज्ञ म्हणून जगभरात प्रसिद्ध आहेत. अमेरिका युरोप मधल्या सुरक्षा परिषदांमध्ये त्यांना वक्ता व प्रशिक्षक म्हणून बोलावलं जातं. त्यांनी हॅकिंग विषयावर लिहिलेल्या “Kali Linux: Wireless Penetrating Testing", "Make your own Hacker Gadget" आणि "Backtrack 5” या पुस्तकांच्या आजवर हजारो कॉपीज विकल्या गेल्या आहेत. याशिवाय त्यांनी एथिकल हॅकिंगसाठी Pentester Academy आणि SecurityTube Training या दोन शिक्षण संस्था उभारल्या आहेत.
६. साई सतीश
सरकारी संकेतस्थळांच्या सुरक्षेसाठी साई सतीशने महत्वाचं काम केलं आहे. त्याने सरकारी संकेतस्थळांमध्ये असलेल्या लहानमोठ्या त्रुटी शोधून काढल्या. तो Indian servers कंपनीचा संस्थापक व संचालक आहे. त्याने आजवर अनेक विद्यार्थ्यांना हॅकिंगचे धडे दिले आहेत.
७. राहुल त्यागी
कम्प्युटर सायन्स मध्ये पदवीत्तर शिक्षण पूर्ण केल्यानंतर राहुल त्यागीने ५ वर्षांमध्ये जगभरात १०० पेक्षा जास्त प्रशिक्षण शिबीर घेतले. भारतातील अँटी हॅकिंग संस्था व सायबर सुरक्षा संस्थांना त्याने मदत केली आहे.
८. राजेश बाबू
राजेश हा भारतातील अग्रगण्य एथिकल हॅकर म्हणून ओळखला जातो. त्याने सरकारी कार्यालये व संस्थांच्या सुरक्षेसाठी महत्वाचं काम केलं आहे. त्याने केरळ मध्ये Mirox Technopark ही कंपनी उभारली आहे. सध्या तो या कंपनीच्या माध्यमातून सायबर सुरक्षेवर काम करत आहे.
९. बेनिल्ड जोसेफ
बेनिल्ड जोसेफ हा एका नावाजलेला एथिकल हॅकर आहे. सिलिकॉनच्या भारतीय मासिकाने व Microsoft social forum ने भारतातील १० अग्रगण्य एथिकल हॅकर्स मध्ये बेनिल्ड जोसेफचा समावेश केला होता. त्याने फेसबुक, याहू, सोनी पिक्चर्स, टेस्को, वोडाफोन, डच टेलोकॉम, AstraZeneca, ब्लॅकबेरी अशा बड्या कंपन्यांच्या संकेतस्थळांमधल्या त्रुटी शोधून काढल्या होत्या.
१०. फाल्गुन राठोड
इंडिया टुडे व भारतीय सिलिकॉन मासिकानेने जाहीर केलेल्या १० अग्रगण्य एथिकल हॅकर्स मध्ये फाल्गुनचाही समावेश होता. फाल्गुनने आजवर अत्यंत जटील सायबर गुन्ह्याच्या केसेस सोडवल्या आहेत. त्याच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे International Security मासिकात त्याचा फोटो झळकला होता.
मंडळी, शोले मधला एक प्रसिद्ध संवाद आहे “लोहे को लोहा काटता है”. याच उक्तीप्रमाणे एथिकल हॅकर्स हे ठग हॅकर्सपासून आपल्या माहितीचं संरक्षण करत असतात. वरती दिलेले १० हॅकर्स हे त्यातले मातब्बर खेळाडू आहेत.