computer

इंटरनेटवर व्यवहार करताना अशी घ्या खबरदारी...या ६ गोष्टी लक्षात ठेवा !!

सध्याचं जग इंटरनेटचं आहे. बहुतेक ठिकाणी विविध सेवा पुरवणं आणि घेणं हे दोन्ही इंटरनेटच्या माध्यमातून चालतं. या सगळ्या सेवांची जंत्री बरीच मोठी आहे. हॉटेल्स, रेस्टॉरंट यांच्याकडच्या ऑर्डर्स, इ-टिकीट्सची सुविधा, इ-बिल्स, वेगवेगळ्या पेड ऍप्सची सबस्क्रीप्शन्स ही वानगीदाखल काही उदाहरणं. या सगळ्यात बँका तरी कशा मागे राहतील? खरं तर सर्वच बँका आणि वित्तीय संस्था आपल्या ग्राहकांना इ-सेवा पुरवतात. ग्राहकाला प्रत्यक्ष बँकेत न जाता घरबसल्या या माध्यमातून त्या NEFT, RTGS सारखे पैशांशी संबंधित व्यवहार उत्तम प्रकारे पार पाडता येतात. पण प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात. अगदी इंटरनेट, डिजिटल सेवासुविधाही याला अपवाद नाहीत. या सुविधांच्या वापराची दुसरी बाजू म्हणजे आज आर्थिक बाबींशी संबंधित सायबर क्राईममध्ये झालेली प्रचंड वाढ. त्यामुळेच की काय, या सेवा सोयीस्कर आणि वापरायला सोप्या असूनही अनेकजण त्यांचा लाभ घ्यायला कचरतात. बरं, अशी धास्ती तरी किती काळ बाळगणार? शेवटी जगाबरोबर चालावं तर लागणारच! मग करायचं काय? खरंतर प्रश्न आहे तिथे उत्तर आहेच. या बाबतीतलं उत्तर म्हणजे असे व्यवहार करताना ग्राहकाने घ्यावयाची खबरदारी.

१. व्हर्च्युअल किबोर्ड

पहिला उपाय म्हणजे व्हर्च्युअल किबोर्डचा वापर. आजकाल बँका त्यांच्या ग्राहकांना व्हर्च्युअल की बोर्डची सुविधा देतातच. बहुतेक ठिकाणी जिथे कीबोर्डचा वापर करावा लागतो तिथे हा व्हर्च्युअल कीबोर्ड असतो, जो स्क्रीनवर दिसतो. याचा फायदा म्हणजे ग्राहकांचा अत्यंत गोपनीय तपशील (पासवर्ड वगैरे) hackers पासून सुरक्षित राहतो. जेव्हा प्रत्यक्ष लॅपटॉप किंवा कॉम्प्युटर कीबोर्ड वापरला जातो त्यावेळी प्रेस केलेल्या की(key)चा कोड स्टोअर केला जाऊ शकतो, आणि त्यावरून हॅकर्सना पासवर्ड क्रॅक करणं सोपं जातं. व्हर्च्युअल कीबोर्डमध्ये तुम्ही प्रत्यक्ष कोणतीही की प्रेस करत नसल्यामुळे असं होण्याची शक्यता नसते.

२. एसएमएस वा इ-मेल अलर्ट

एसएमएस वा इ-मेल अलर्ट सुरू करणे हा दुसरा पर्याय. ह्यात व्यवहार होत असतानाच त्याबद्दलची माहिती एसएमएस किंवा इमेलद्वारे मिळते. आपण हा व्यवहार केला नसेल तर ताबडतोब बँकेला कळवता येतं. ह्याचं सेटिंग सेट करताना ते कमीत कमी रकमेचं ठेवावं जेणेकरून कमी रकमेच्या व्यवहाराबद्दलही अलर्ट मिळेल. बँकेच्या सिक्युरिटी अलर्ट सिस्टीमपासून वाचण्यासाठी हॅकर्स व्यवहार करताना एकच मोठ्या रकमेचा व्यवहार करण्यापेक्षा कमी रकमेचे अनेक व्यवहार करतात, अशा वेळी लोएस्ट लेव्हल सेटिंगचा फायदा होतो.

३. ओटीपीचा वापर

लॉगिन करताना ओटीपीचा वापर करणे हा अजून एक सुरक्षित पर्याय आहे. आजकाल बँका ऑनलाइन व्यवहार करण्यासाठी ग्राहकांना ओटीपी(One Time Password) ची सुविधा देतात. ज्यावेळी इंटरनेट कॅफे किंवा सार्वजनिक ठिकाणी व्यवहार केले जातात, अशावेळी ओटीपी हा सर्वात सुरक्षित पर्याय मानला जातो. ज्यावेळी ऑनलाइन ट्रान्झॅक्शन केले जाते तेव्हा हा ओटीपी रँडमली जनरेट होतो आणि एसएमएस किंवा इ-मेल वर ठरावीक कालावधीसाठी पाठवला जातो. त्या वेळेनंतर तो निकामी होतो. त्यामुळे आर्थिक गैरव्यवहारांना आळा घालता येतो.

४. सुरक्षित पिन सेट करणं

सर्वात महत्त्वाचं म्हणजे बँकेच्या कार्डसाठी सुरक्षित पिन सेट करणं. हा पिन सेट करताना आपली किंवा घरातील कोणत्याही व्यक्तीची बर्थडेट, तुमच्या वाहनाचा नंबर वगैरे सारखी खाजगी माहिती देऊ नका. कार्ड चुकीच्या हाती लागलं तर तुमचा मोबाईल किंवा कॉम्प्युटर हॅक करून तुमच्या जोडलेल्या कागदपत्रातून जन्मतारीख सहजपणे मिळू शकते. तुमच्या मोबाईलच्या नोट्समध्ये, कॉम्प्युटरवर सेव्ह करून ठेवणंही धोकादायक ठरू शकतं. वेगवेगळी ऍप्स डाऊनलोड होताना ती तुमच्या मोबाईल, कॉम्प्युटरचा ऍक्सेस मागतात, तेव्हा तुमच्या नोट्समधील नोंदी हॅक होण्याचा धोका असतो. तुमचा पिन नंबर आणि पासवर्ड ठरावीक कालावधीनंतर बदलत राहा.

५. लिमिट सेट करणं

याशिवाय कार्डसाठी लिमिट सेट करणं हाही एक पर्याय आहे. बहुतेक बँका तुम्हाला ही सुविधा देतात. यामुळे चुकून जरी तुमचं कार्ड चुकीच्या हाती लागलं तरी त्या व्यक्तीला एका वेळी ठरावीक रकमेपेक्षा जास्त रक्कम काढता येणार नाही आणि तुमचं कमीत कमी आर्थिक नुकसान होईल.

६. बँक स्टेटमेंट्स

बँकेकडून इमेलवर येणारी स्टेटमेंट्सदेखील सेव्ह करायच्या आधी पासवर्डने संरक्षित करा.

खरंतर हे उपाय तसे खूप साधेसोपे आहेत. गरज आहे ते डोळसपणे अंमलात आणण्याची. आपला कष्टाचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठी निदान एवढंतरी करायलाच हवं, नाही का? तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.

सबस्क्राईब करा

* indicates required