computer

'हे' आहेत भारतातले टॉप टेन शेफ्स- ज्यांच्या प्रेरणेने या क्षेत्रात मुलं करीयर घडवत आहेत !

कुकरी शो असो वा खास पाहुण्यांसाठीची मेजवानी...  त्यात नेहमी तीन गोष्टींना महत्त्व असतं - सोच, स्वाद, सूरत. थोडक्यात एखादा पदार्थ तयार करताना त्यामागचा विचार, त्या पदार्थाचं प्रेझेंटेशन, आणि अर्थातच त्याचा स्वाद! निगुतीने रांधणं, नजाकतीने पेश करणं, आणि रसिकतेने खाणं या सगळ्या गोष्टी बरोब्बर जमून आल्या तर खरी मजा. 
या सगळ्या बाबी लक्षात ठेवून त्यांचा समतोल साधणं आणि समोरच्या खवय्यांकडून वाहवा मिळवणं खूप अवघड आहे. आणि हा बॅलन्स सांभाळण्यासाठी सर्वस्वी जबाबदार असतो तो म्हणजे शेफ.आज शेफ बनणं हे अगदी सिनेमाइतकं ग्लॅमरस करिअर ठरलं आहे, आणि त्यासाठी काही मंडळी कारणीभूत ठरली आहेत.आज इंटरनॅशनल शेफ डे आहे त्या निमित्ताने  बघुयात त्यांची नावं आणि प्रोफाइल.  

१. संजीव कपूर

शेफ या शब्दाला भारतात सर्वप्रथम ग्लॅमर मिळवून दिलं असेल तर ते संजीव कपूर याने. आजही भारतातल्या टॉप टेन शेफ्समध्ये तो पहिल्या क्रमांकावर आहे. 'खानाखजाना' हा कुकरी शो आणि 'फूड फूड' हे टीव्ही चॅनेल यासाठी संजीव कपूरने काम केलं आहे. त्याची मुशाफिरी केवळ खाणं आणि खिलवणं इतपतच मर्यादित नाही. अनेक लोकप्रिय खाद्यपदार्थाच्या पुस्तकांचा तो लेखक आहे आणि अनेक खाद्यपदार्थाच्या स्पर्धांमध्ये तो विजेता ठरला आहे. जगभरात भारतीय खाद्यसंस्कृतीचा प्रसार व्हावा आणि भारतीय खाद्यपदार्थ सहज उपलब्ध व्हावेत हे त्याचं स्वप्न आहे. त्याला भारत सरकारने सर्वोत्कृष्ट शेफ म्हणून गौरवलं आहे. अमेरिकेतल्या क्लीन कूक स्टोव्ह्ज या संस्थेसाठी त्याची अँबेसेडर म्हणून नियुक्ती झालेली आहे. ही संस्था लाकूड, शेण, कोळसा, केरोसीन यासारख्या पारंपरिक आणि हवेचं प्रदूषण करणाऱ्या इंधनांचा वापर करण्याऐवजी एलपीजी, बायोगॅस, सौर ऊर्जा यांचा वापर करण्यास प्रोत्साहन देते. 

२. विकास खन्ना

मिशलीन स्टार असलेला आणि 'ट्विस्ट ऑफ द टेस्ट' सारख्या शोच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेला स्टार शेफ विकास खन्ना या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. अमृतसरमध्ये आपल्या आजीच्या स्वयंपाकघरात विविध प्रयोग करताना त्याच्या मनात कलिनरी क्षेत्राबद्दल आवड निर्माण झाली आणि तिथूनच त्याच्या करिअरची सुरुवात झाली. गॉर्डन रामसे, बॉबी फ्ले यांच्यासारख्या जागतिक स्तरावरच्या फुड एक्स्पर्ट्सबरोबर विकास खन्नाने काम केलं आहे. 'जुनून' या नावाने त्याने न्यूयॉर्क येथे रेस्टॉरंटही सुरू केलं आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्यासाठी डिनर बनवण्याचा बहुमानही त्याला मिळाला आहे. आणि हो! अनेक तरुण मुलींच्या गळ्यातला ताईत असलेल्या या शेफला २०११ मध्ये पीपल मॅगझिनने 'सेक्सीएस्ट मॅन अलाईव्ह' पुरस्काराने सन्मानित केलं आहे.   

३. रणवीर ब्रार

भारतातल्या टॉप टेन शेप्स मधले रणवीर ब्रार सगळ्यात तरुण. वयाच्या पंचविसाव्या वर्षी त्याने फाईव्ह स्टार हॉटेल मध्ये ऑफिशियल कलिनरी एक्स्पर्ट म्हणून काम केलं. इतक्या लहान वयात फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये या पदापर्यंत पोहोचलेला हा पहिलाच शेफ आहे. सध्या मुंबईच्या जुहू येथील 'नोवोटेल' येथे तो सीनियर कलिनरी एक्स्पर्ट म्हणून काम करतो. याव्यतिरिक्त केंब्रिजमधील 'द डोसा फॅक्टरी' आणि 'शालिमार' तसंच बोस्टन येथील 'मंत्रा' या रेस्टॉरंटमध्ये त्याने पर्यवेक्षक म्हणून काम केलं आहे. साध्या, सरळ, सोप्या तरीही टेस्टी आणि आरोग्यदायी रेसिपीज ही त्याची खासियत आहे. झी खाना खजाना या चॅनलवरील 'हेल्थ भी टेस्ट भी' या कुकरी शो मध्ये तो साधेसोपे आणि तरीही हटके असे पदार्थ तयार करून दाखवतो. 

४. मधुर जाफरी

दिल्लीच्या मधुर जाफरी यांचा या यादीत चौथा क्रमांक आहे. पन्नासच्या दशकात ब्रिटनमध्ये गेल्यावर त्या सर्वप्रथम स्वयंपाक शिकल्या. पंधराहून जास्त कुकबुक्स त्यांच्या नावावर आहेत. सध्या त्या न्यूयॉर्कमध्ये राहतात.

५. अंजुम आनंद

अंजुम यांचा जन्म कोलकात्याचा. सुरुवातीला त्यांना स्वयंपाकापेक्षा संगीतात जास्त रस होता. त्यांनी काही रॉक ग्रुपमध्ये ड्रमर म्हणूनही काम केलं. त्यानंतर मात्र त्यांची शेफगिरी सुरू झाली. त्रिवेंद्रम येथील एका कुकिंग स्कूल मध्ये त्यांनी स्वयंपाकाची बाराखडी गिरवली. टॉप टेन शेफ्स मध्ये स्थान मिळवण्यासाठी त्यांनी दिवस-रात्र कष्ट केले. सुरुवातीला ताज ग्रुप बरोबर त्यांनी काम सुरू केलं. त्यानंतर बँकॉक येथून त्यांनी खाद्य क्षेत्रातील व्यावसायिक पदवी मिळवली. बँकॉक येथील रेड नावाच्या रेस्टॉरंट मध्ये त्यांना भारतीय खाद्यपदार्थांबद्दल अधिक ज्ञान मिळालं. पुढे त्यांनी कलिनरी एक्सपर्ट म्हणून अनेक ठिकाणी काम केलं. हे करताना बहुतेक रेस्टॉरंट्स स्वयंपाकाच्या प्रांतात काही वेगळे प्रयोग करायला उत्सुक नाहीत हे त्यांना जाणवलं. या गोष्टीचं त्यांना सखेद आश्चर्य वाटलं. त्यातूनच त्यांनी स्वतः गग्गन हे रेस्टॉरंट उभारलं.

६. हरी नायक

'प्रेझेंट इंडियन कुकिंग' चा ऑथर असलेला हरी नायक हा भारतीय शेफ आणि कलिनरी टीचर आहे. त्याने पाककृतीबद्दल अनेक पुस्तकं लिहिली आहेत. त्यापैकी फ्रेंच शेफ डॅनियल बोलूड याच्या साह्याने लिहिलेलं 'माय इंडियन किचन' हे कुकबुक प्रचंड यशस्वी झालं. या पुस्तकात भारतीय पद्धतीचे अन्नपदार्थ साध्या सरळ पद्धतीने कसे तयार करावेत याचं विवेचन केलेलं आहे. हरी नायक याने न्यू जर्सी येथे अमेरिकेतली पहिली फ्रोजन योगर्ट पॅटिसरी - हॅलो फेटे - उघडली आहे. 

 

७. तरला दलाल

थोडं इतिहासात डोकावलं, तर पाककृतींच्या क्षेत्रात तरला दलाल यांचं नाव हमखास आढळतं. १९७४ मध्ये त्यांचं पहिलं कुकबुक 'द प्लेझर्स ऑफ व्हेजिटेरियन कुकिंग' प्रकाशित झालं. त्यानंतर त्यांनी शंभराहून जास्त पुस्तकं लिहिली, ज्यांच्या तीस लाखांहून अधिक प्रती विकल्या गेल्या आहेत. तरला दलाल यांनी पाककृती लेखक, कलिनरी एक्सपर्ट, आणि कुकरी शोच्या होस्ट अशा अनेक भूमिका निभावल्या आहेत. याव्यतिरिक्त स्वयंपाकाशी संबंधित ऑनलाइन मॅगझीन कुकिंग अँड मोर च्या त्या प्रवर्तक आहेत. 'द तरला दलाल शो' आणि 'कुक इट अप विथ तरला दलाल' हे त्यांचे कुकरी शोज आजही मोठ्या प्रमाणावर पाहिले जातात. ०६ नोव्हेंबर २०१३ रोजी हार्ट अटॅक ने त्यांचं निधन झालं. परंतु टॉप टेन शेफ्स मधलं आपलं स्थान त्यांनी आजही कायम राखलं आहे.

८. नीता मेहता

कुकिंग स्पेशालिस्ट, लेखक, माध्यमांमधील सुपरिचित चेहरा आणि कुकिंगशी संबंधित स्पर्धांचे व्हीआयपी जज म्हणून ज्यांचं नाव आहे त्या नीता मेहता यांनी टॉप टेन शेफ्सच्या यादीत आठवं स्थान मिळवलं आहे. त्यांनी ४०० पेक्षा जास्त कुकबुक्सची निर्मिती केली आहे, ज्याच्या जगभरात साठ लाखांहून अधिक प्रती विकल्या गेल्या आहेत. १९९९ मध्ये त्यांना 'फ्लेवर्स ऑफ इंडियन कुकिंग' या पुस्तकासाठी बेस्ट एशियन कुकबुक अवॉर्ड मिळालं होतं. 

९. सारांश गोईला

सारांश हाही सेलिब्रिटी शेफ! फुड महा चॅलेंज - ज्याचं परीक्षण संजीव कपूर आणि माधुरी दीक्षित यांनी केलं होतं - या शो चा विजेता ठरल्यावर तो घराघरात पोहोचला. पुढे जाऊन त्याने इंडिया का सुपर शेफ हा किताबही जिंकला. सारांश सध्या 'रोटी रास्ता और इंडिया' या शोमध्ये काम करत आहे. याव्यतिरिक्त त्याने सिंगापूरच्या चॅनेल न्यूज एशिया वरील 'मोमेंट नूडल डायरीज' या शोमध्येही काम केलं आहे. अजून एक खास गोष्ट म्हणजे लवकरच शंभर दिवसात भारतामध्ये वीस हजार किलोमीटर रस्त्याने प्रवास करणारा भारतीय कलिनरी स्पेशालिस्ट म्हणून त्याच्या नावे विक्रमही होणार आहे. 

 

१०. हरपाल सोखी

भारतीय खाद्यपदार्थ आणि आंतरराष्ट्रीय खाद्यसंस्कृती यांचा योग्य पद्धतीने मेळ घातल्याने शेफ हरपाल सिंग सोखी स्टार बनला. खाद्य क्षेत्रातील भ्रमंती व्यतिरिक्त हरपाल सिंग संगीतप्रेमी आहे. त्याला इंग्रजीव्यतिरिक्त हिंदी, पंजाबी, बंगाली, ओरिया, आणि तेलुगु या भाषा बोलता येतात. 

स्मिता जोगळेकर 

सबस्क्राईब करा

* indicates required