ट्रेकिंगचे किती प्रकार आहेत? ट्रेकिंगची पूर्वतयारी आणि सुरुवात कशी करायची? सोप्या भाषेत समजून घ्या !!
काही दिवसांपूर्वी मी हायकिंग, ट्रेकिंग आणि माउंटेनियरिंग म्हणजे काय हे माझ्या अनुभवावरून सांगितले. त्यावर वाचकांच्या आलेल्या उत्तम प्रतिसादासाठी मनापासून आभार...
ट्रेकिंग, माऊंटनेरिंग करायची खूप इच्छा आहे. पण कशी आणि कुठून सुरुवात करू? तयारी काय करावी लागेल? मला जमेल का? प्रशिक्षण असते का? काही कोर्सेस आहेत का? वयाच काही बंधन आहे का?
असे अनेक प्रश्न मला बऱ्याच जणांनी विचारले आणि हे प्रश्न तुम्हालाही पडले असतीलच तर, आजचा हा लेख तुमच्यासाठीच आहे. आपण भारतात म्हणजेच गिर्यारोहणाच्या पंढरीमध्ये जन्माला आलो आहोत असेच समजा. भारत हा भौगोलिकदृष्ट्या समृद्ध देश आहे. आपल्याला उंच, भव्य, मनमोहक आणि तितक्याच अवघड अशा पर्वतांचा वारसा लाभला आहे. भारतात १०००/८००० मीटर उंचीवरच्या अशा सर्वच श्रेणींमधल्या पर्वत/गड/डोंगररांगा आहेत. थोडक्यात सांगायचे तर गिर्यारोहणातील पाळणाघर पासून सर्वात उच्च शिक्षण आपण इकडे घेऊ शकता.
पण, ह्यासाठी आपण स्वतः शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम आहोत का? हे जाणून घेणे गरजेचे आहे. नकाशावर बोट ठेवावे आणि फिरायला बाहेर पडावे असे फक्त सहलींसाठी शक्य आहे. आपल्याला सोशल मिडियावर पाहिलेली बर्फाच्छादित शिखरे पाहण्याची इच्छा होत असेल. पण चित्रपटात पाहिलेली पर्वतराजी आणि व्हिडिओ बघून आपण भारावून जाणे आणि स्वतः पर्वतरोहण अनुभवणे ह्यात खूप अंतर आहे. पण, काळजी करू नका, हा लेख तुम्हाला ट्रेकिंगसाठी नक्कीच प्रोत्साहित करेल आणि एक दिशा देईल.ट्रेकिंग हे नक्कीच आव्हानात्मक आहे. कारण ट्रेकिंग म्हणजे दिवसाला कमीतकमी ५/६ तास म्हणजेच अंदाजे १२/१५ किमी चालणे. कधीकधी अंतर कमी किंवा जास्तही असू शकते. ट्रेकिंगचे तीन प्रकारात वर्गीकरण केले जाते.
१. सुलभ/सोपा ट्रेक:
सहसा २/३ दिवसात करता येणारे ट्रेक. यामध्ये तुम्ही सह्याद्रीतले प्रसिद्ध कलावंतीण- प्रबळगड, साल्हेर - सालोटा, अंधरबन जंगल ट्रेक, कळसूबाई, कात्रज ते सिंहगड असे ट्रेक हिवाळ्यात करू शकता. निसर्गरम्य वातावणात पहाटेची गुलाबी थंडीचा अनुभव घेण्यासाठी असे आल्हाददायी, पण थोडे दमछाक करणारे ट्रेक करू शकता. हे जरी सोपे ट्रेक असले तरीही आपली शारीरिक आणि मानसिक तयारी झाल्यानंतरच जाण्याचे साहस करावे. सह्य़ाद्रीतल्या भटकंतीचा अनुभव घेतल्यानंतर असे ट्रेक करायला हरकत नाही.
२. मध्यम ट्रेक:
य्या प्रकारामधले ट्रेक हे आपण किती उंचीवर जातो आहोत यावर अवलंबून आहे. समुद्रसपाटीपासून आपण जर ३००० मी./ अंदाजे १०००० फूट उंच गेलो तर अशा ट्रेकला अंदाजे ४/६ दिवस लागू शकतात. यामध्ये बऱ्याच वेळा आपल्याला एका विशिष्ट पातळीवर (Altitude) तग धरण्याची गरज असते आणि अनेक दिवस कठीण परिस्थितीत चालणे समाविष्ट असते. अशा ट्रेक्समध्ये ट्रेकरला जास्त प्रमाणात आव्हान असते आणि दिवसामध्ये ५ ते ७ तास चालणे समाविष्ट असते. उदाहरण द्यायचंच तर हिमाचलमधला मॅकलिओडगंज जवळील इंधरार पास, त्रिऊंड ट्रेक, करेरी लेक ट्रेक हे काही मध्यम श्रेणीमधले निसर्गरम्य आणि प्रसिद्ध ट्रेक्स आहेत.
हे जरी मध्यमश्रेणी ट्रेक असले तरीही आपली शारीरिक आणि मानसिक तयारी झाल्यानंतरच जाण्याचे साहस करावे. सह्य़ाद्रीतल्या भटकंतीचा अनुभव घेतल्यानंतर असे ट्रेक करायला हरकत नाही. अनेकदा तीन ते चार दिवसांत ट्रेक करताना लागणारे आपले सामान आपल्यालाच घेऊन जावे लागते. संपूर्ण प्रवास पायीच करायचा असतो. त्यामुळे हे सामान पाठीवर घेऊन सलग दोन ते तीन दिवस चालण्याची क्षमता असावी. काही ठिकाणी अवघड चढण असली तर गिर्यारोहणाच्या पद्धती वापरून चढावे वा उतरावे लागते. त्याचा पूर्वानुभव असेल, तर ट्रेक अजून सोपा जातो. अनुभव नसेल तर अनुभवी मित्रांसोबत किंवा अनुभवी ट्रेक ऑर्गनायझर सोबत जावे.
३. हार्ड ट्रेक:
खरंतर ह्या ट्रेकला दिवस किती लागणार यापेक्षा महत्वाचे आहे ते म्हणजे, येणाऱ्या अडचणी आणि त्यासाठी लागणारी तयारी. हार्ड/कठीण ट्रेकला तुम्हाला जास्त वेळ चालावे लागते. अशा ट्रेकमध्ये फक्त शारीरिकच नाही तर सहनशीलतेची कसोटी लागते. या ट्रेकिंग प्रकारामध्ये आपण अंदाजे १५०००/१८००० फूट उंची गाठता. एव्हरेस्ट बेस कॅम्प ट्रेक, आफ्रिका खंडातील सर्वोच्च शिखर माऊंट किलीमांजारो (नॉन टेक्निकल), युरोप खंडातील सर्वोच्च शिखर माऊंट एल्ब्रुस (सेमी टेक्निकल) ही हार्ड ट्रेकची चांगली उदाहरणं मानली जाऊ शकतात. तसेच सह्याद्रीमधला प्रसिद्ध पन्हाळगड ते विशाळगड (पावनखिंड) हा ट्रेक म्हणजे तुमच्या शारीरिक आणि मानसिक क्षमतेचा कळस आहे असे म्हणू शकता. बरेच जिद्दी गिर्यारोहक हा ५५ किमीचा ट्रेक सलग २०/२२ तासांत किंवा त्याहीपेक्षा कमी वेळात पूर्ण करतात. याशिवायही अजुन बरेच कठीण ट्रेक्स आहेत पण जे ट्रेक मी स्वतः केले आहेत त्याचीच उदाहरणे दिली आहेत.
या लेखाच्या दुसऱ्या भागात ट्रेकिंगचं प्रशिक्षण आणि कोर्सेसबद्दल जाणून घेऊया.
लेखक : वैभव ऐवळे