पर्वतरोहणाचे प्रशिक्षण देणाऱ्या प्रमुख संस्था आणि अभ्यासक्रमाचे प्रकार जाणून घ्या !!!
मागील लेखात आपण ट्रेकिंगची सुरुवात कशी करायची, ट्रेकिंगचे प्रकार किती असतात, पूर्वतयारी कशी करायची हे जाणून घेतलं. आजच्या दुसऱ्या भागात गिर्यारोहक वैभव ऐवळे पर्वतरोहणाचे प्रशिक्षण देणाऱ्या प्रमुख संस्था, अभ्यासक्रमाचे प्रकार आणि ट्रेकिंगपूर्वी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत याबद्दल सांगत आहेत.
एका आठवड्यात किंवा त्याहून अधिक काळपर्यंतचा प्रवास असतो त्याला सहसा कठोर किंवा कठीण ट्रेक मानले जाते. असा ट्रेक आपल्या अनेक पैलूंची चाचणी करतो. प्रत्येक ट्रेकचे आव्हान वेगळे असते. बऱ्याचदा हवामानात होणारे बदल, उणे तापमान, ऑक्सिजनची कमी झालेली पातळी, तसेच हाय अल्टीटयुडमुळे शरीरात होणारे बदल उदा. चिडचिड येणे, भूक न लागणे, उलटी होणे, ताप येणे... ई. अश्या प्रकारचे आजार/ त्रास होऊ शकतात. अशा परिस्थितीत गिर्यारोहकांच्या मानसिक आणि शारीरिक क्षमतेचा कस लागतो.
पण वातावरणात होणारे बदल तसेच कुठलीही नैसर्गिक आपत्ती यावर आपले नियंत्रण नाही. पण योग्य प्रशिक्षण घेणे आणि तयारी करणे हे आपल्या हातात आहे आणि त्यासाठी भारतात पर्वतरोहणाचे प्रशिक्षण देणाऱ्या चार प्रमुख संस्था आहेत.
१. नेहरू इंस्टिट्यूट ऑफ माऊंटनिंगरिंग (एनआयएम-NIM) उत्तरकाशी१. नेहरू इंस्टिट्यूट ऑफ माऊंटनिंगरिंग (एनआयएम-NIM) उत्तरकाशी
२. हिमालय पर्वतारोहण संस्था (एचएमआय-HMI) दार्जिलिंग
३. अटल बिहारी वाजपेयी माउंटनीयरिंग अँड अलाइड स्पोर्ट्स संस्था, मनाली
४. जवाहर इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनियरिंग JIM (पहलगाम)
या चौघांव्यतिरिक्त सोनम ग्यात्सो पर्वतारोहण संस्था (एसजीएमआय) गंगटोक, इंडियन इंस्टिट्यूट ऑफ स्कीइंग अँड माउंटनियरिंग (आयआयएसएम), गुलमर्ग आणि अरुणाचल प्रदेशच्या दिरंगमध्ये नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ माऊंटनिंगरिंग अँड अलाइड स्पोर्ट्स (एनआयएमएएस) आहेत. वरील संस्थांच्या वेबसाईटवर आपल्याला कोर्सबद्दलची सर्वच माहिती उपलब्ध आहे.
पर्वतारोहण अभ्यासक्रम प्रामुख्याने चार प्रकारचे आहेत
१. बेसिक पर्वतारोहण कोर्स (बीएमसी -BMC)
२. अॅडव्हान्स पर्वतारोहण कोर्स (एएमसी-AMC)
३. शोध आणि बचाव (एसएआर -SAR)
४. मेथड ऑफ इंस्ट्रक्शन (एमओआय-MOI)
थोडक्यात, पर्वत चढण्याची तयारी करत असाल तर सर्वात आधी आपल्या शरीरावर/फिटनेसवर काम सुरू करा. मोहिमेच्या आव्हानांसाठी सक्षम होण्यासाठी आपण पुरेसे तंदुरुस्त असले पाहिजे. मोहिमेसाठी बाहेर पडण्यापूर्वी एकदा आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. एकदा आपण प्रवास सुरू करण्याचा विचार केला की आपण हे कराल यासाठी आपले मन आणि आत्म्याची तयारी करा. प्रबळ इच्छाशक्ती असेल तर आपल्याला काहीही अशक्य नाही. आपला कोर्स/ ट्रेक सुरू होण्याच्या कमीतकमी चार महिने आधी जॉगिंग/वॉकला प्रारंभ करा. आपण जिममध्ये नियमित असल्यास अधिक कार्डिओ व्यायाम करा.
चालण्यासोबतच तुम्ही ट्रेकमध्ये ठेवण्याचे ठरविलेल्या वजनासारखे बॅकपॅक घेऊन चालणे निश्चितच मदत करते. कोर्ससाठी आपला फिटनेस चांगला असणे सर्वात गरजेचे आहे. २८ दिवसांच्या कोर्ससाठी आपण आपली तयारी करायला हवी. कमीतकमी ४/५ महिने हा सराव करायला हवा. आपण नियमितपणे ८/१० किलोमीटरचे अंतर कमीतकमी ५ किलोचे वजन घेऊन चालायची सवय करा आणि जसे तुम्हांला वाटेल तसे हळूहळू अंतर आणि वजन दोन्ही वाढवा. तसेच, सूर्यनमस्कार, पुशअप्स असे व्यायामाचे प्रकार तुम्ही घरच्याघरी करू शकता. योगासने आणि श्वासोच्छ्वासाचा व्यायाम करा. ट्रेकिंग करण्यासाठी कुठलीही वयाची मर्यादा नाही पण वर नमूद केलेले कोर्स करण्यासाठी वयाचे बंधन आहे. माझा एव्हरेस्ट बेस कॅम्पचा प्रवास खाली दिलेल्या लिंक वर पाहू शकता...
मी काही वर्षांपूर्वी एक वाक्य वाचले होते. या वाक्यामुळे मला नेहमी प्रोत्साहन मिळते.. नवीन प्रवास सुरू करण्याची उमेद येते.... ते म्हणजे, जीवनात एकच अशक्य प्रवास आहे, जो तुम्ही अजून सुरू केला नाहीत. मग आता कशाची वाट पाहत आहात? वरीलपैकी कोणत्याही संस्थेच्या वेबसाइटवर लॉग इन करा आणि कोर्ससाठी साइन अप करा.