आयफेल टॉवरचे नाकारलेले डिझाईन्स की लंडन टॉवरचे? पण मग लंडन टॉवर आहे तरी कुठे?
इंटरनेटवर व्हायरल होणाऱ्या गोष्टी आपल्याला गोंधळात पडतात. आता हेच बघा ना. आयफेल टॉवरचे वेगवेगळे डिझाईन सध्या व्हायरल होत आहेत. या फोटोवर लिहिलंय की हे आयफेल टॉवरचे नाकारण्यात आलेले डिझाईन्स आहेत. इंटरनेटवर लगेचच विश्वास ठेवता येत नाही म्हणून आम्ही थोडा तपास घेतला. आमच्या हाती लागलेल्या माहितीनुसार हे डिझाईन्स आयफेल टॉवरचे नसून लंडन टॉवर उर्फ वॉटकिन्स टॉवरचे आहेत.
आता तुम्ही म्हणाल की वॉटकिन्स टॉवरबद्दल पहिल्यांदाच ऐकतोय. त्याचं असं आहे की वॉटकिन्स टॉवर अस्तित्वातच नाही. वॉटकिन्सटॉवर कधी बनू शकला नाही. त्याचा आणि आयफेल टॉवरचा फार जवळचा संबंध आहे. आजच्या लेखात या सर्व गोष्टी जाणून घेऊया.
(आयफेल टॉवर)
तर, ही गोष्ट श्रेष्ठत्वाच्या स्पर्धेची आहे. १८८९ साली आयफेल टॉवर तयार झाल्यावर त्याच्याबद्दल लोकांमध्ये प्रसिद्धीची एक लाट आली. आजही ही प्रसिद्धी ओसरलेली नाही. लंडनमध्ये राहणाऱ्या सर एडवर्ड वॉटकिन यांना आयफेल टॉवरची प्रसिद्धी रुचली नाही. त्यांनी ठरवलं की आयफेल टॉवरच्याच तोडीचा किंवा त्याहीपेक्षा उंच टॉवर आपण लंडनमध्ये बांधू
लंडन येथील वेम्बली पार्क भागात हा टॉवर बांधण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. आयफेल टॉवर बांधणारे गुस्ताव आयफेल यांनाच लंडन टॉवरच्या डिझाईनचं काम देण्यात आलं, पण काही कारणांनी ते यशस्वी झालं नाही. अखेर एक स्पर्धा घेऊन डिझाईन्स मागवण्यात आली. आयफेल टॉवरचे डिझाईन म्हणून जे डिझाईन्स व्हायरल झाले आहेत ते लंडन टॉवरसाठी घेतलेल्या स्पर्धेतील डिझाईन्स आहेत. हे पाहा फोटो.
स्पर्धेच्या अखेरीस स्टुअर्ट, मॅकलॅरेन आणि ड्युन यांनी मिळून तयार केलेलं डिझाईन निवडण्यात आलं. या डिझाईनप्रमाणे टॉवर हा ८ खांबांवर उभा राहणार होता. टॉवर एकूण ३६६ मीटर उंचीचा असणार होता. म्हणजे आयफेल टॉवरपेक्षा या टॉवरची उंची ४२मीटरने जास्त असणार होती. हा पहा निवडण्यात आलेल्या डिझाईनचा फोटो.
(स्टुअर्ट, मॅकलॅरेन आणि ड्युन यांनी तयार केलेलं डिझाईन)
कागदावर दिसणारं डिझाईन खरं रूप घेता घेता बदललं. त्याचं मुख्य कारण हे आर्थिक होतं. टॉवर उभारण्यासाठी पुरेसा पैसा नसल्याने डिझाईनशी तडजोड करण्यात आली. सर एडवर्ड वॉटकिन यांनी मूळ डिझाईन मधले ८ पाय काढून ४ पाय ठेवले. हे डिझाईन आयफेल टॉवरशी बऱ्याच प्रमाणात मिळतं जुळतं होतं. वर दिलेल्या फोटोत हे तुम्ही पाहूच शकता.
(सर एडवर्ड वॉटकिन)
१८९१ साली टॉवरच्या बांधकामाला सुरुवात झाली. १८९४ साली टॉवरचा काही भाग तयार असतानाच तो लोकांसाठी खुला करण्यात आला. १८९५ पर्यंत टॉवर पाहण्यासठी १२००० लोकांनी गर्दी केली. यादरम्यान एक महत्त्वाची गोष्ट लक्षात येऊ लागली. ती म्हणजे टॉवरचा पाया भक्कम नव्हता. टॉवरचे चार पाय पूर्ण भार उचलण्यास असमर्थ होते. यावेळी सर एडवर्ड वॉटकिन यांनी निवृत्ती घेतली होती आणि ते आजारी होते. १९०१ साली त्यांचा मृत्यू झाला. टॉवरची कल्पना त्यांची असल्यामुळे हा टॉवर वॉटकिन्स टॉवर म्हणून इतिहात प्रसिद्ध झाला.
(अर्धवट बांधलेला टॉवर)
या सर्व घडामोडींमध्ये टॉवर बांधायला मिळणारा पैसा थांबला होता. पैसाच नसल्याने काम थांबलं. टॉवरची जागा लोकांसाठी धोकादायक ठरवण्यात आली. अखेरीस १९०६-०७ या वर्षांमध्ये टॉवरचा अर्धवट भाग डायनामाईटने जमीनदोस्त करण्यात आला. अशा प्रकारे आयफेल टॉवरचा प्रतिस्पर्धी तयार होण्यापूर्वीच धुळीस मिळाला होता.
वॉटकिन्स टॉवर नसला तरी वेम्बली पार्कने लोकांना आकर्षित केलंच. वेगवेगळे खेळ या जागी खेळता येतात. पहिल्या महायुद्धानंतर अनेक स्पोर्ट्स क्लब या भागात तयार झाले.
(टॉवर तयार झाला असता तर काहीसा असा दिसला असता)
तर मंडळी, व्हायरल झालेल्या टॉवर मागे एवढा मोठा इतिहास होता. कशी वाटली ही पोस्ट? कमेंटबॉक्समध्ये नक्की सांगा.