युपीच्या डॉक्टरला अलादिनचा चिराग विकत घेऊन २.५ कोटींचा चुना लागलाय !!
अनेक शिकले सवरलेले लोक तांत्रिकमांत्रिकांच्या जाळ्यात फसताना दिसतात. टेक्नॉलॉजी एवढी पुढे जाऊन देखील मांत्रिकांवरचे लोकांचे अवलंबित्व कमी झालेले नाही.त्यातूनच मग नरबळी आणि कसल्याकसल्या बातम्या वाचायला मिळतात. या तांत्रिकांकडून होणारी फसवणूक तर नेहमीचीच. आज हा विषय निघण्याचं कारण आहे नुकतीच घडलेली एक घटना.
ही घटना एका डॉक्टरसोबत घडलीय. त्यांचं नाव आहे डॉ. लईक खान. हे साधेसुधे नाहीत, तर लंडन रिटर्न्ड डॉक्टर आहेत. साहजिक उच्चशिक्षित असलेल्या या महोदयांकडून यांत्रिकांच्या नादी न लागण्याची अपेक्षा केली जाऊ शकते. तर हे लईक खान समीना नावाच्या एका पेशन्टच्या घरी तिची ट्रीटमेंट करण्यासाठी जात असत. समीनाने त्यांना एका तांत्रिकाबद्दल सांगितले. इस्लामुद्दीन नावाचा हा तांत्रिक अल्लाउद्दिनच्या दिव्यासारखा चिराग घासून त्यातून जीन बाहेर काढतो, आणि आपण आपल्या डोळ्यांनी जीनला पाहिले आहे असे देखील तिने सांगितले.
लईक खान यांना पण आता जीनला चिरागमधून बाहेर काढून स्वतःच्या इच्छा पूर्ण करून घ्यायच्या होत्या. त्यांनी इस्लामुद्दीन आणि त्याच्या एका सहकाऱ्यावर विश्वास ठेवला. इस्लामुद्दीन आणि त्याचा सहकारी एक अत्तर घेण्यासाठी १२ हजार रुपये हवेत असे लईक खानला सांगत असत. या अत्तराच्या मदतीने जीन बाहेर येणार होता.
लईक खान जेव्हा कधी चिरागला हात लावायचा विषय काढायचे तेव्हा योग्य वेळ अजून आली नाही असे सांगून इस्लामुद्दीन विषय टाळायचा. अत्तराचे एकावेळचे १२,००० देऊनदेऊन शेवटी एकवेळ तर अशी आली की लईक खान यांनी इस्लामुद्दीनला दिलेल्या पैशांचा हिशोब तब्बल अडीच कोटी झाला होता.
शेवटी आपल्याला काय जीनचे दर्शन होत नाही हे डॉक्टर साहेबांना कळून चुकले. त्यांनी थेट पोलीस स्टेशनचा आसरा घेतला. पोलिसांनी इस्लामुद्दीन आणि त्याच्या सहकाऱ्यांना अटक केली आहे. यात अजून एक ट्विस्ट म्हणजे इस्लामुद्दीन हा समीनाचा पती होता. दोन्ही नवरा बायकोने मिळून डॉक्टर साहेबांसोबत गुलीगत धोका केला होता.
उदय पाटील