computer

त्रावणकोरच्या महाराजांच्या हट्टामुळे एका भारतीय कार कंपनीचा जन्म कसा झाला ?

१९४७ साली भारत स्वतंत्र झाला आणि देशात स्वकियांचे राज्य आले. त्यासोबतच स्वकीयांच्या कर्तृत्वाची नांदी सुरू झाली. भारत स्वतंत्र झाला तेव्हा देशात काही तयार होत नव्हते असे नाही, पण एकेक करत अनेक पठ्ठे मैदानात उतरले आणि देशात अनेक गोष्टी बनायला सुरुवात झाली. काही नव्या गोष्टी होत्या, तर काही जुन्याच गोष्टी नव्या पद्धतीने आणि भारतीय बनावटीने बनू लागल्या.

मोटारी हा असाच भारतीयांचा जिव्हाळ्याचा विषय!! सुरुवातीच्या काळात मोटारनिर्मितीमध्ये अनेक कंपन्यांनी नाव कमावले. त्यातल्या टाटासारख्या कंपन्या आजही दिमाखात उभ्या आहेत. पण काही कंपन्या मात्र काळासोबत पडद्याआड गेल्या. अशीच एक कंपनी म्हणजे अरविंद कार कंपनी!!

आजही भारतात हा वाद सुरू असतो की भारतात पहिली कार हिंदुस्थान मोटर कंपनीने बनवली नाही, तर तो मान अरविंद कार कंपनीकडे जातो. पहिली कार कोणी बनवली हा वाद बाजूला ठेवला तरी अरविंद कार कंपनीचा इतिहास मात्र रंजक आहे. गोवा राज्य भारतात सामील झाले तेव्हा अनेक लक्झरी कार्स भारतात विक्रीसाठी उपलब्ध झाल्या. तेव्हा त्रावणकोरच्या महाराजांनासुद्धा त्यांच्या इतमामाला शोभेल अशी गाडी हवी होती. या कामाची जबाबदारी त्यांनी त्यांचे सचिव वी. पी तापी आणि बाळकृष्ण मेनन यांच्यावर सोपवली.

तापी आणि मेनन यांनी गोव्याला जाऊन अनेक कार पाह्यला. पण महाराजांना शोभेल अशी गाडी काही त्यांना मिळाली नाही. ते दोघे निराश होऊन आपल्या हॉटेलवर परतले. पण मेनन यांना कार्सबद्दल प्रचंड उत्सुकता होती. त्यांनी हातात पेन घेतला आणि एका कागदावर कारची डिझाईन उतरवायला लागले. तापींनी त्यांना विचारल्यावर ते म्हणाले, की जर त्यांना महाराजांसाठी योग्य गाडी मिळाली नाहीतर ते स्वतः नविन गाडी तयार करतील!! हे ऐकल्यावर तापींना वाटले की गाडी न मिळाल्याच्या निराशेत मेनन काहीही बरळत आहेत. पण मेमन यांनी त्यांना समजावून सांगितल्यावर नवीन गाडी बनवण्याचा प्रस्ताव महाराजांसमोर ठेवण्यासाठी ते तयार झाले. तापींनी ही गोष्ट महाराजांच्या कानावर घातली आणि सांगितले की मेनन महालाच्या अंगणात शोभेल अशी दिमाखदार गाडी तयार करणार आहेत. काहीसा विचार करून महाराजांनी या प्रस्तावास मंजुरी दिली. पण सोबत त्यांनी एक अट ठेवली की जर ही कार त्यांच्या पसंतीस उतरली नाहीतर कार तयार करण्याचा सर्व खर्च मेनन यांना स्वतःच्या खिशातून द्यावा लागेल.

(बाळकृष्ण मेनन)

मेनन आता जोरदारपणे कामाला लागले होते. एका छोट्या गॅरेजमध्ये तुटपुंज्या साहित्यानिशी ते कार तयार करणार होते. त्यांच्या मेहनतीला यश आले. कार तयार तर झाली. पण खरे आव्हान होते ते गाडी महाराजांच्या पसंतीस उतरते की नाही याचे. महाराजांपुढे गाडीचे अनावरण झाले आणि महाराज गाडी बघताच अतिशय आनंदित झाले. महाराजांनी मेनन यांचे अभिनंदन केले. या कारचे अनावरण झाले त्यावेळी पत्रकार सुद्धा उपस्थित होते. सगळीकडे मेनन यांचे आणि त्यांनी बनवलेल्या कारचे प्रचंड कौतुक झाले.

मेनन यांनी कंपनीचे नाव अरविंद ऑटोमोबाईल कंपनी असे ठेवले. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की एवढी चांगली गाडी तयार करूनही ही कंपनी बंद का पडली? तर याचे सरळ कारण आहे आर्थिक आधार नसल्याने. मेनन यांनी पुढे प्रचंड प्रयत्न केले. त्यांनी या कामासाठी सरकारची मदत मागून पाह्यली. त्याकाळी ही कार फक्त ५ हजार रूपयांत मिळू शकणार होती. पण...... पण सरकरकडून अरविंद कार कंपनीला मदत मिळू शकली नाही. देश एका प्रतिभावान व्यक्तीचे कौशल्य आणि सर्नजशीलतेला मुकला आणि भारतीयसुद्धा खऱ्या अर्थाने भारतीय असलेल्या एका कारला मुकले.

याचा शेवट काही झाला असला तरी भारतीय मोटर उद्योगातील हा हिरा तुमच्यापुढे यावा अशी आमची इच्छा होती. इतरांनासुद्धा मेनन यांच्याबद्दल माहिती व्हावी म्हणून हा लेख जास्तीत जास्त शेयर करा...

सबस्क्राईब करा

* indicates required