ॲडा लव्हलेस: कॉम्प्युटर येण्यापूर्वीच १८० वर्षांपूर्वी प्रोग्राम लिहिणारी जगातली पहिली प्रोग्रामर!!
आज कॉम्प्युटर आणि स्मार्टफोन यांनी आपलं आयुष्यच व्यापून टाकलंय. किती सहजपणे आपण त्याच्यावर कमांड्स देतो! अगदी सकाळचा अलार्म लावण्यापासून वेगवेगळ्या वेब सीरिज बघण्यापर्यंत आणि ऑनलाईन शॉपिंगपासून ऑफिसच्या कामकाजापर्यंत प्रत्येक गोष्टीत त्याने शिरकाव केलाय. पण ही सगळी कामं इतक्या सहज, झटपट आणि अचूकपणे करत असताना त्या यंत्राच्या आत कितीतरी गोष्टी घडत असतात. अमुक एक गोष्ट कर म्हटल्यावर ती कशी करायची याबद्दलच्या सूचना या यंत्रांना आधीच दिलेल्या असतात. या सूचना किंवा आज्ञावली म्हणजे कॉम्प्युटर प्रोग्रॅम!! जगातला हा पहिला प्रोग्राम लिहिणारी व्यक्ती होती- ऑगस्टा ॲडा किंग!! लव्हलेस परगण्याची वतनदारीण!! या ॲडा लव्हलेसने सुमारे १८० वर्षांपूर्वी जगातला पहिला प्रोग्रॅम लिहिला आणि आज्ञावलीतल्या त्रुटीही शोधल्या. त्यामुळं तिला जगातली पहिली प्रोग्रॅमर आणि पहिली डिबगर (Debugger) म्हणूनही ओळखलं जातं.
ॲडा लव्हलेस ही अशी महिला होती, जी एका प्रख्यात, प्रतिभासंपन्न कवीच्या घरात जन्माला आली होती, पण लहानपणीच तिच्या वडिलांनी तिला नाकारलं, आईनेही वरवरचं (जगाला दाखवण्यासाठी) प्रेम केलं, आणि तिचं छोटंसं आयुष्य ही शोकांतिकाच ठरली. जिच्या स्मरणार्थ १९८०मध्ये एका संगणकीय भाषेला ॲडा हे नाव देण्यात आलं, त्या लेडी ऑगस्टा लव्हलेसबद्दल आजच्या बोभाटाच्या या लेखात जाणून घेऊयात.
ऑगस्टा ॲडा (१८१५-१८५२) ही लेडी बायरॉन आणि सुप्रसिद्ध कवी लॉर्ड बायरॉन(Lord Byron) यांची मुलगी. हा कवी प्रणयकविता लिहिण्यासाठी जितका प्रसिद्ध, तितकाच तो त्याच्या प्रेमप्रकरणांसाठी कुप्रसिद्ध होता. त्याचे त्याच्या नात्यातल्या दूरच्या बहिणींसोबतही प्रेमसंबंध होते. साहजिकच ॲडाच्या आईला या सगळ्या प्रकरणांची झळ तिच्या मुलांना बसावी असे वाटत नव्हते. त्यातच ॲडाच्या जन्माच्या वेळी कवी बायरॉनला मुलगा व्हावा असं वाटत होतं आणि प्रत्यक्षात मुलगी जन्माला आली, त्यामुळे त्याची घोर निराशा झाली. त्याचाच परिणाम म्हणूनही आणि त्याचे अभिनेत्र्यांशी आणि बहिणींशी विवाहबाह्य संबंध, मारहाण या सगळ्या कारणांमुळे ॲडाच्या जन्मानंतर अवघ्या महिन्याभरातच तिचे आईवडील वेगळे झाले. त्यानंतर चार महिन्यांनी बायरॉन कायमचा इंग्लंड सोडून गेला. ॲडा तिच्या वडिलांना आयुष्यात कधीही भेटू शकली नाही. कवी बायरॉन १८२३ मध्ये ग्रीसमध्ये मृत्यू पावला तेव्हा ती आठ वर्षांची होती. तिची आई लेडी बायरॉन हिनेच तिचं संगोपन केलं.
या लग्नातून ॲडाच्या आईला काही सुखसमाधान मिळालं नव्हतं. साहजिकच आपल्या नवऱ्याबद्दल निर्माण झालेली कटुता लेडी बायरॉन वारंवार व्यक्त करी.ॲडाला मात्र आपल्या न पाहिलेल्या वडिलांबद्दल एक सुप्त कुतूहल आणि आकर्षण होतं. हे ओळखल्यावर ॲडाने डिडलांच्या प्रेमाच्या वेडातून बाहेर यावं यासाठी आईने जंगजंग पछाडलं. तिला आपल्या मुलीवर वडलांचा अगदी कुठल्याही प्रकारचा प्रभाव नको होता. त्यामुळे तिने जाणीवपूर्वक मुलीमध्ये गणिताची आवड निर्माण केली, जेणेकरून मुलीचा कविता वगैरे प्रकारांशी फारसा संबंध राहणार नाही. तिची आई लेडी बायरॉन हिला स्वतःला गणितात विशेष गती होती. इतकी की खुद्द बायरॉनने तिला 'प्रिन्सेस ऑफ पॅरललोग्राम्स' असं संबोधलं आहे. त्याकाळी सामान्य स्त्रियांसाठी गणित वगैरे विषयांचा अभ्यास करणं विशेषच होता. आईने मात्र ॲडाला गणिताचा अभ्यास करायला उद्युक्त केलं. ॲडालाही अभ्यासात रस होता. वास्तविक लहानपणी ती सतत आजारी असायची. पण तरी तिने अभ्यास करणं सोडलं नाही.
१८३३ मध्ये वयाच्या सतराव्या वर्षी ॲडा चार्ल्स बॅबेजला एका पार्टीत भेटली. चार्ल्स बॅबेज हा महान ब्रिटिश गणिती. आजही त्याला कॉम्प्युटरचा जनक म्हणून ओळखलं जातं. त्याने मुख्यत: दोन संगणकीय इंजिन्स तयार केली: ॲनालिटिकल इंजिन आणि डिफ्रन्शिअल इंजिन. यातल्या ॲनालिटिकल इंजिनमध्ये ॲडाला खास रस होता. आता हे ऍनालिटिकल इंजिन म्हणजे काय, तर कॉम्प्युटरचं अगदी पहिलं मॉडेलच. यात मेमरी, ॲरीथमॅटिक अँड लॉजिकल युनिट, इनपुट-आऊटपुट प्रकरण सांभाळणारी पंच कार्ड्स आणि बेसिक फ्लो कंट्रोल सांभाळणारी यंत्रणा असे विभाग होते. पुढे बॅबेजसोबत ॲडानेही त्या मॉडेलवर काम केलं.
(चार्ल्स बॅबेज)
१८३५ मध्ये विल्यम किंगशी तिचं लग्न झालं. १८३८ मध्ये त्याला अर्ल ऑफ लव्हलेस किताब मिळाल्यावर ॲडा काऊंटेस बनली. १८४०मध्ये चार्ल्स बॅबेजने त्याच्या ॲनालिटिकल इंजिनवर एक भाषण दिलं होतं. या भाषणाचा १८४३मध्ये लुईगी मेनाब्रिया या इटालियन अभियंत्याने फ्रेंचमध्ये अनुवाद केला. हा लुईगी पुढे जाऊन इटलीचा पंतप्रधान बनला. या लुईगीच्या लेखात त्याच्या स्वत:च्या टिपणांचाही अंतर्भाव होता. या लेखाचा ॲडाला इंग्रजीत अनुवाद करायला सांगितल्यावर तिने नुसते भाषांतर न करता त्यासोबत तिने स्वत:च्या विस्तृत नोट्स जोडल्या. या नोट्समध्ये गणिती समस्या सोडवण्यासाठी टप्प्याटप्प्याने कायकाय ऑपरेशन्सच्या करायला हवीत याबद्दल विवेचन केलं होतं. त्या अर्थी ॲडा ही 'पहिली कॉम्प्युटर प्रोग्रॅमर' ठरली. तिनं हे सगळं जेव्हा केलं तेव्हा ती तीन मुलांची आई होती आणि वय होतं २८-२९वर्षे!!
पहिला प्रोग्रॅम लिहिणं तर महत्त्वाचं आणि खासच. पण कदाचित त्याहीपेक्षा महत्त्वाची होती या लेखात ॲडाने आधुनिक दृष्टिकोनातून केलेली काही विधाने!! तोपर्यंत कॉम्प्युटर हे मशीन मुख्यतः संख्यांवर प्रोसेसिंगचं काम करतं असा सर्वमान्य समज होता. ॲडाच्या मते हे इंजिन भविष्यात संख्येव्यतिरिक्त इतरही गोष्टींवर काम करू शकत होतं. ही कल्पना स्पष्टपणे स्पष्ट करणारी ॲडा पहिली व्यक्ती होती आणि यात तिचा द्रष्टेपणा चार्ल्स बॅबेजपेक्षाही पुढचा होता. आज इमेज, वर्ड, व्हिडीओ अशा सगळ्याच प्रकारच्या डेटावर संगणक जितक्या सहजतेने काम करतो ते पाहिल्यावर तिचा अंदाज किती अचूक होता याची खात्री पटते. आजचा संगणक अस्तित्वात येण्याच्या जवळजवळ १०० वर्षे आधी केलेलं हे ॲडाचं विधान खरंच क्रांतीकारी होतं. मात्र तिने तेव्हा संगणक फक्त आज्ञा दिलेलीच कामे करु शकतो आणि स्वत:हून त्याला विचार करता येणार नाही, असं विधान केलं होतं. काही अंशी हे विधान आजच्या घडीला खरं असलं तरी आजकालची मशीन लर्निंग आणि आर्टिफिशिअल इंटेलिजन्सची झेप पाहता संगणकाला विचार करायलाही शिकवता येऊ शकतं हे सिद्ध झालं आहे.
मशीन लर्निंग आणि आर्टिफिशिअल इंटेलिजन्स आज आपल्या फ्रीज, वॉशिंग मशीन आणि इतर सगळ्या गोष्टींत आज घुसलेलं असताना सुमारे १८०वर्षांपूर्वी ॲडा लव्हलेस या एका परगण्याच्या सरंजामदार स्त्रीला माणसाचा मेंदू कसा काम करतो याचं गणितीय मॉडेल बनवण्याच्या स्वप्नानं पछाडलं होतं. मात्र हे स्वप्न पूर्ण होऊ शकलं नाही. इतकी विलक्षण बुद्धिमत्ता असलेली ही स्त्री अल्पायुषी ठरली. वयाच्या अवघ्या छत्तिसाव्या वर्षी गर्भाशयाच्या कर्करोगाने तिची घोडदौड कायमची थांबवली. तिच्या इच्छेनुसार तिचं दफन वडिलांच्या शेजारीच करण्यात आलं. तिच्या संगणकीय क्षेत्रातल्या योगदानासाठी हे जग तिचं कायमचं ऋणी राहिल!!
लेखिका: स्मिता जोगळेकर