एका बादलीच्या चोरीमुळे दोन राज्यांत २००० सैनिक धारातीर्थी पडेपर्यंत झालेल्या लढाईची गोष्ट!! कुठे आणि केव्हा घडलं हे प्रकरण!!
बादली म्हणजे आपल्या रोजच्या भाषेत बालटी चोरीला जाणे हा अनुभव आता इतिहासजमा झाला आहे. एकेकाळी चाळकर्यांच्या बादल्याच काय, टमरेलं पण चोरीला जायची. चाळीत त्यावरून मोठ्ठी भांडणं वगैरे व्हायची आणि संपायची. पण एक बादली चोरीला गेल्यामुळे एक युध्द झालं आणि २००० सैनिक मृत्युमुखी पडले असाही एक इतिहास आहे. चला तर आज वाचूया या चोरीला गेलेल्या बादलीच्या युध्दाची कथा!
हे अनोखे युद्ध होऊन आता तशी ८०० वर्षं होऊन गेली आहेत. पण आजही हे युद्ध त्याच्या आगळ्यावेगळ्या कारणामुळे चर्चेत असते. तो काळ असा होता जेव्हा इटलीमध्ये धार्मिक तणाव शिगेला पोहोचला होता. त्याठिकाणी दोन राज्यं होती, एक म्हणजे बॉलोग्ना आणि दुसरे मोडेना. बॉलोग्नाला समर्थन होते ख्रिस्त धर्मगुरू पोप यांचे, तर मोडेनाला समर्थन होते रोमन सम्राटाचे. बॉलोग्नाच्या लोकांसाठी पोप श्रेष्ठ होते आणि मोडेनाकरांसाठी रोमन सम्राट श्रेष्ठ होता.
याचा परिणाम म्हणून १२९६ साली दोन्ही राज्यांत युद्ध झाले होते. तणाव चांगलाच वाढला होता. यात मग रिनाल्डो बोनोकोलसी नावाचा थोडा जास्तच आक्रमक राजा मोडेनाच्या गादीवर बसला. सातत्याने तो छोटे मोठे हल्ले बॉलोग्नावर करत असे. कधी कशावरून भांडण पेट घेईल सांगता येत नाही अशी परिस्थिती झालेली होती. १३२५ साली एके दिवशी मोडेना सैनिक बॉलोग्नाच्या किल्ल्यात घुसले आणि एक लाकडी बादली चोरून घेऊन गेले.
आता यात ट्विस्ट असा आहे की ती बादलीही काही साधीसुधी नव्हती. कितीही जुना काळ असला तरी राजाचे सैनिक साधी बादली चोरी करतील का? या बादलीत प्रचंड हिरे, दागिने ठेवले होते. जेव्हा इकडे बातमी आली तेव्हा त्यांनी आधी प्रेमाने बादली परत मागितली. समोरून जेव्हा बादली परत मिळणार नाही असा प्रतिसाद मिळाला तेव्हा बॉलोग्नाने थेट युद्धाची घोषणा केली.
बॉलोग्नाकडे ३२ हजार सैनिकांची फौज होती आणि मोडेनाकडे फक्त ७ हजार सैनिक होते. युद्धाचा निकाल काय असेल हे तुम्हाला समजले असेल. सकाळी युद्ध सुरू झाले. अर्धी रात्र होईपर्यंत घनघोर युद्ध झाले आणि काय विशेष, फक्त ७ हजार सैनिक असून मोडेना युद्धात विजयी झाले. यात दोन्ही बाजूचे २ हजार सैनिक मरण पावले.
कमी सैन्य असूनही मोडेना अतिशय धैर्याने लढले. बॉलोग्ना सैनिक अक्षरशः पळून गेले. यांनी त्यांचा पाठलाग करत थेट बॉलोग्नाचे दरवाजे गाठले. शहराला पाणी पुरवणाऱ्या रेनो नदीवरील पाणी पुरवू शकणाऱ्या साधनांची नासधूस करून बॉलोग्नाला पाण्यापासून पण वंचित केले. त्यांनी ठरवले असते तर शहर ताब्यात घेतले असते, पण तसे न करता शहराच्या दरवाज्याबाहेर नाचगाण्याचा कार्यक्रम घेत त्यांनी बॉलोग्नाला खिजवले.
बॉलोग्नाहून परतताना अजून एक बादली चोरी करत बॉलोग्नाला खिजवण्याचा एकही चान्स त्यांनी सोडला नाही. अशा या ऐतिहासिक लढाईला 'वॉर ऑफ द बकेट' म्हणजे बादलीची लढाई म्हणून ओळखले जाते. आता ज्या बादलीमुळे एवढे युद्ध झाले आणि २ हजार लोकांनी जीव गमावला तशी बादली जपून ठेवणे साहजिक होते. आजही त्या बादलीची प्रतिकृती एका म्युझियममध्ये सुरक्षितपणे ठेवली आहे.