बुक कॅफे ऐकलेलं, पण हे कॅट कॅफे काय आहे? कॅफेचा हा नवीन प्रकार तुम्हाला आवडतो का पाहा !!
तुम्ही आजवर वेगवेगळ्या कॉफी शॉप्सबद्दल ऐकले असेल. या सगळ्यांत हिट आहेत ते बुक कॅफेज!! पुस्तक विकत घ्यायचे नसेल तरी कॅफेत लावलेले एखादे पुस्तक उचलायचे आणि कॉफीचा आस्वाद घेत ते तिथेच वाचत बसायचे अशी ही एकंदरीत संकल्पना. पण तुम्हांला आणखी एका प्रकारच्या वेगळ्याच प्रकारच्या कॅफेपद्धतीबद्दल माहित आहे का? कोणता कॅफे? कॅट कॅफे!!!!
हा कॅफेसुद्धा इतर कॅफेज सारखाच असतो. म्हणजे तिथे तुम्ही लॅपटॉपवर काम करू शकता, कॉफी मागवू शकता. मित्रांसोबत गप्पा करू शकता किंवा बाहेरील सौंदर्य न्याहाळू शकता. इतर कॅफे आणि कॅट कॅफे यातील फरक हा याच्या नावातच आहे. म्हणजेच कॅट कॅफेत या सगळ्यांसोबतच मांजरी पण असतात. काही कॅफेतर बेडरूमसारखी जागा सुद्धा उपलब्ध करून देतात, जिथे तुम्ही मांजरांच्या पिल्लांसोबत मनसोक्त खेळू करू शकता.
हे काही आजचं फॅड नाहीय. अशाप्रकारचा पहिला कॅट कॅफे सुरू झालाय तब्बल २२वर्षांपूर्वी!! १९९८ साली तैवानमधील तैपेई शहरात पहिला कॅट कॅफे चालू झाला असं इंटरनेट म्हणतं. सुरुवातीला या कॅफेचं नाव कॅट फ्लॉवर गार्डन होतं. पुढे जाऊन ते कॅफे डॉग्ज अँड कॅट्स झालं. मात्र सुरुवात जरी तैवानमध्ये झाली असली तरी अशा कॅफेजचं महत्व जपानला जास्त समजलं असं म्हणायला हरकत नाही.
जपानमध्ये कॅट कॅफे खूप लवकर लोकप्रिय झाले. जपानमध्ये कॅट कॅफे येण्याचे एक कारण हे ही होतं की काही जपानी पर्यटक तैवानमधल्या कॅफेला भेट देऊन आले होते. आपल्या देशात पण असा कॅफे असावा या इच्छेतून जपानमधल्या ओसाका इथं २००४ साली पहिला नेको नो जिकान नावाचा कॅट कॅफे उभा राहिला. पुढच्याच वर्षी जपानची राजधानी टोक्योमध्येसुद्धा कॅट कॅफे उघडला आणि बघता बघता जपानमध्ये एका मागोमाग एक कॅट कॅफे उघडत गेले. आजच्या घडीला आशियात ४०० च्या वर कॅट कॅफे आहेत. त्यात जपान, तैवान, चीन, थायलंड, मलेशिया, सिंगापूर, व्हिएतनाम, इंडोनेशिया हे देश आघाडीवर आहेत.
आता आशियात एखादी भन्नाट आयडिया पसरत आहे तर युरोप कसे मागे राहील? २०१२ मध्ये ऑस्ट्रियाची राजधानी व्हिएन्ना येथे कॅफे नेको म्हणून कॅफे उघडला गेला. लेडी दिनाहचे कॅट एम्पोरियम हा युरोपमधला सर्वात प्रसिद्ध कॅट कॅफे समजला जातो. हा कॅफे २०१४ ला सुरू झाला आणि तेव्हापासून सातत्याने इथे गर्दी असते. युरोपात साधारण १००तरी कॅट कॅफे असतील. आशियानंतर कॅट कॅफेंच्या संख्येच्या बाबतीत युरोपचाच नंबर लागतो.
उत्तर अमेरिकेत मात्र हॉटेलिंग आणि जागेसंबंधीचे नियम हे थोडे कडक आहेत. याकारणाने तिथे कॅट कॅफे लोकप्रिय व्हायला थोडा वेळ लागला. पण लवकरच त्यांनी संख्येच्या बाबतीत युरोपशी बरोबरी केली आहे. तिथला पहिला कॅफे उघडला गेला ते २०१४ साली. कॅलिफोर्नियातील ओकलॅंडमध्ये हा कॅफे सुरू झाला होता. २०१४ नंतर अमेरिका आणि जवळच्या देशांत जवळपास ८१ कॅफे सुरू झाले. यात कॅनडातल्या १६ आणि मेक्सिकोतल्या 3 कॅट कॅफेंचा समावेश आहे. जगात सध्या नवे १० कॅफे हे घोषित झाले आहेत आणि ते लवकरच बनून पूर्ण होतील.
हे कॅफे कशापद्धतीने चालवले जातात याबद्दल तुम्हाला उत्सुकता असेलच! कॅफेत जेवढा वेळ तुम्ही मांजरीसोबत घालवाल त्यानुसार कॅफेची फी आकारली जाते. म्हणजे आपल्या जुन्याकाळच्या इंटरनेट कॅफेसारखं हो.. उदाहरणार्थ, १०० रुपयांला १ तास यापद्धतीने. काही कॅफे या फीमध्ये तुम्हाला कॉफी किंवा इतर ड्रिंकही देतात. याप्रकारचे कॅफे दक्षिण कोरिया आणि जपानमध्ये जास्त आहेत, तर काही कॅफेजमध्ये तुम्हाला कॉफीचे वेगळे पैसे द्यावे लागतात. हे कॉफीचे जादा पैसे आकारणारे कॅफे जास्त करून युरोप आणि अमेरिकेत दिसतात. फ्रान्स, जर्मनीसारख्या देशात एंट्री फी घेतली जात नाही, पण कॅफेत मिळणारी कॉफी किंवा इतर ड्रिंक्स इतर ठिकाणच्या तुलनेत खूप महाग असतात.
आपल्याकडे कॅफे म्हटले म्हणजे जिथे कॉफी मिळते असे ठिकाण अशी सर्वसाधारण समज आहे. पण या कॅट कॅफेमध्ये तुम्हाला केक, पेस्ट्रीज, सँडविच यासारखे पदार्थ सुद्धा विकत घेता येतात. जर तुम्हाला तिथल्या मांजरींना काही खाऊ घालायचे असेल तर ते पदार्थसुद्धा तिथेच विकत मिळतात.
आता काहींना प्रश्न पडला असेल कॅफे म्हटले म्हणजे तिथेच अन्नपदार्थ शिजवले आणि बनवले जात असतील. आणि अशातच मांजरीचा वावर पूर्ण कॅफेभर असेल तर स्वच्छतेची, मांजरींच्या शी-शूची काळजी कशी घेतली जाते? तर या मांजरी स्वयंपाकघरांपासून दूर ठेवल्या जातात. त्याचबरोबर त्यांची सर्व स्वच्छता वेळच्यावेळी राखली जाते. तुम्ही कॅफेत शिरल्याबरोबर अँटी बॅक्टरीअल जेलही वापरावा लागतो.
आपल्या हौशी लोकांना असाही प्रश्न पडला असेल की जर मी घरूनच मांजर कॅफेत घेऊन गेलो तर? तर उत्तर आहे- नाही!!! तिथे घरून तुम्ही मांजर घेऊन जाऊ शकत नाही. एका कॅफेत जवळपास ८ ते १२ मांजरी असतात. जास्त गर्दी पण वाटायला नको आणि त्यांच्यात भांडणे पण नको हा विचार करूनच मांजरींची संख्या ठरवली जाते.
हे कॅफे एकाच प्रकारचे असतात असंही नाहीय. लोकांनी डोकी लढवून आपला कॅफे हटके ठेवायचा प्रयत्न केलाय.
काही कॅफेजमध्ये जंगलातून किंवा रस्त्यावर फिरणाऱ्या मांजरी आणून कॅफेत त्यांची देखभाल केली जाते. जगभरात ही पद्धत मोठ्या प्रमाणावर अवलंबली जाते.
दुसऱ्या प्रकारच्या कॅफेत विविध संस्थाकडून मांजरी दत्तक घेतल्या जातात. त्यांना माणसांची सवय व्हावी हा हेतू त्यामागे असतो. ही पद्धत युरोपमध्ये खूप लोकप्रिय आहे. आशियात ही पद्धत अजून तरी रुळलेली नाही.
तिसऱ्या प्रकारचे कॅफे आपण म्हणू शकतो जिथे विशिष्ट जातीच्या मांजरी पाळल्या जातात. जसे नॉर्वेजियन फॉरेस्ट कॅटस किंवा सायबेरीयन कॅटस.
चौथ्या प्रकारचे कॅफे म्हटले तर तिथे बाहेरून आणलेल्या आणि वेगवेगळ्या जातींच्या अशा मांजरींचे वैशिष्ट्य पाहायला मिळते.
कॅट कॅफेची रचना ही शिस्तबद्ध पध्दतीने केलेली असते. इंटेरिअरपासून लायटिंगपर्यंत सगळ्याच गोष्टींची व्यवस्थित काळजी घेतली जाते. मांजर झोपली असेल तर तिला हात लावू देणे, मोबाईलचा फ्लॅश मारणे अशा गोष्टी केल्या जाऊ देत नाही.
तर असे असतात हे कॅट कॅफे!!! भारतातसुद्धा असे कॅफे उघडले तर अनेक मांजरप्रेमींसाठी ही मेजवानी असेल. बोभाटाच्या वाचकांपैकी कुणी कॅट कॅफे सुरू केले तर आम्हाला जरूर कळवा...