computer

महात्मा गांधी आणि क्रिकेट कनेक्शन...गांधीजी इंग्लंडच्या क्रिकेट टीममध्ये होते?

महात्मा गांधींना नाटक-चित्रपट याबद्दल नावडच होती हे सुप्रसिध्द आहे. तीच गोष्ट क्रिडा-खेळ संबंधात म्हणता येईल. अर्थात हे पूर्ण सत्य नव्हे !

महात्मा गांधींच्या शालेय काळातील त्यांच्या आठवणी त्यांच्या वर्गमित्रांनी लिहिल्या आहेत. त्यापैकी एक रतिलाल घेलाभाई मेहता यांनी ते आणि गांधी राजकोट इथे आल्फ्रेड हायस्कूलमध्ये ते एकत्र असतानाच्या आठवणी लिहिल्या आहेत. त्यांनी असं म्हटलंय की गांधीजी तेव्हा क्रिकेट खेळत असत. ते चांगले फलंदाज आणि गोलंदाजही होते.

आता मोठ्या लोकांना ते मोठे झाल्यावर त्यांचे पाय पाळण्यात असतानाच दिसत होते असं म्हणत त्यांच्या नावावर अनेक गोष्टी खपवल्या जातात. असंही होत असतं.

पण महात्मा गांधी कधीकाळी एमसीसी-मेरीलीबोर्न क्रिकेट क्लबचे-म्हणजे इंग्लंडच्या संघाचे राखीव खेळाडू होते असं सांगितलं तर तुमचा नक्कीच विश्वास बसणार नाही. हो ना? पण ही गोष्ट गांधीजींच्या सहीनिशी उपलब्ध आहे म्हटल्यावर तुम्हाला विश्वास ठेवावाच लागेल नाही का?

१९३३-३४ साली एमसीसीचा संघ भारताच्या दौर्‍यावर आला होता. डग्लस जार्डीन या संघाचा कॅप्टन होता तेव्हाची ही गोष्ट आहे.

ही पहा त्या संघाच्या खेळाडूंची स्वाक्षरीसहीत यादी आणि शेवटच्या खेळाडूची देवनागरीतली स्वाक्षरी बघा! ही आहे महात्मा गांधींची स्वाक्षरी! खरंच महात्मा गांधी क्रिकेट टीममध्ये होते? हे काय गौडबंगाल आहे?

आता आम्ही तुम्हाला ह्या मागे एक कथा आहे ती सांगतो!

सुप्रसिध्द क्रिकेटपटू विजय मर्चंट यांची बहीण लक्ष्मी हिला स्वाक्षर्‍या घेण्याचा छंद होता. त्यांनी एमसीसीच्या संघातल्या सोळा खेळाडूंच्या स्वाक्षर्‍या एका पानावर घेतल्या होत्या. विजय मर्चंट यांची बहीण असल्याने त्यांच्यासाठी हे काम सोपं होतं. शिवाय विजय मर्चंट पण लक्ष्मीला या स्वाक्षर्‍या गोळा करण्यात मदत करीत असत. म्हणजे ते स्वतः कुणाच्या विशेष भेटीगाठीसाठी जात तेव्हा ते लक्ष्मीसाठी स्वाक्षरी घेत असत.

यानंतर काही दिवसांनी विजय मर्चंट आणि महात्मा गांधी यांची एका समारंभात गाठभेट झाली तेव्हा विजय मर्चंट यांच्याकडे लक्ष्मीचे स्वाक्षरी पुस्तक होते. अर्थात त्यांनी गांधीजींना स्वाक्षरीसाठी विनंती केली. तेव्हा गांधीजींनी स्वाक्षरीची वही हतात घेतली. आणि ते ती चाळू लागले. तेव्हा त्यांनी एमसीसीखेळाडूंनी स्वाक्षर्‍या केलेलं पान बघितले.

गांधीजींच्या मनात काय आलं कुणास ठाऊक? त्यांनी सोळा खेळाडूंच्या स्वाक्षर्‍या असलेल्या पानावर १७ वा क्रमांक टाकून स्वाक्षरी केली. एकापरीने गांधीजींनी क्रिकेटच्या टीममध्ये त्यांचा अंतर्भाव केला होता. १६ खेळाडूंच्या सह्या अर्थातच इंग्रजीत होत्या, पण महात्मा गांधींनी मात्र देवनागरीत स्वाक्षरी केली!
पुढे हा किस्सा विजय मर्चंट यांनी त्याच्या स्टाइलमध्ये 'अ मेमोरीबल इन्सीडंट' म्हणून कथन केला होता.

पण या आठवणीचा आणखी एक अपवादात्मक विशेष सांगायला हवाच. एरवी महात्मा गांधी स्वाक्षरी देताना किमान १ रुपया मागत आणि तो रुपया हरिजन मदत फंडात जमा करीत असत. विजय मर्चंट यांच्याकडून मात्र गांधीजींनी तो १ रुपया घेतला नाही.

हे कसं घडलं असेल? गांधीजींच्या मनात तेव्हा नक्की काय असेल? कदाचित गांधीजींनी पुढच्या काळात त्यांच्या कार्यासाठी हक्काने मदत मागितली असेल आणि आधीची कसर भरून काढली असेल. विजय 'मर्चंट' होते तर गांधीजी 'बनिया' होते.

पण या घटनेने गांधीजींच्या असंख्य आठवणीत ही मजेदार रंजक आणि कदाचित एकमेव अशा आठवणीची भर पडली हे निश्चित!

आज २ ऑक्टोबरच्या निमित्ताने इतर बर्‍याच कथा तुम्हाला वाचायला मिळतील. पण ही खास 'बोभाटा'च्या शैलीतील आठवण तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला जरूर सांगा!

 

लेखक : रविप्रकाश कुळकर्णी

 

आणखी वाचा:

गांधीजींनी सुरू केले होते ३ फुटबॉल क्लब!! पण कशासाठी?

महात्मा गांधींबद्दलच्या १० गोष्टी ज्या तुम्हाला नक्कीच माहित नसतील..

सबस्क्राईब करा

* indicates required