सरकारने नव्याने आणलेला हेल्थ आयडी काय आहे? तो कसा आणि का तयार करावा? यातून फायदा काय होईल?
सोमवारी सरकारकडून आयुष्यमान भारत डिजिटल मिशन सुरू करण्यात आले. भारतातील आरोग्य व्यवस्थेतील मैलाचा दगड समजले जाणारी ही महत्वाची डिजिटल मोहीम आहे. या मोहिमेअंतर्गत प्रत्येक नागरिकांसाठी डिजिटल हेल्थ आयडी असणार आहे. या माध्यमातून सामान्य लोकांच्या आरोग्याची संपूर्ण माहिती ठेवली जाणार आहे. यासाठी उपयोगास सोपे असा एक ऑनलाइन प्लॅटफॉर्म तयार केला जाणार आहे.
याआधी जनधन,आधार आणि मोबाईल (JAM) या तीन आघाड्यांवर काम सुरू झाले तसे आरोग्य संबंधी माहितीसाठी हे मिशन सुरू करण्यात आले आहे. एखाद्याला जर या मिशनचा भाग व्हायचे असेल तर त्यासाठी हेल्थ आयडी तयार करावा लागेल. यात १४ अंकी क्रमांक तयार होईल. हा आयडी तीन कामांसाठी वापरला जाईल. युनिक आयडेंटिफिकेशन, प्रमाणीकरण आणि तुमच्या आरोग्याचे दस्तावेजीकरण ही ते तीन कामे असतील.
हेल्थ पोर्टलवर रजिस्ट्रेशन करून किंवा ABMD हेल्थ रेकॉर्ड ऍप डाउनलोड करून हेल्थ आयडी मिळवता येऊ शकतो. त्याचप्रमाणे आरोग्य विषयक संस्था जसे सरकारी किंवा खासगी दवाखाने तसेच वेलनेस सेंटर यांना विनंती करून हेल्थ आयडी तयार करता येऊ शकेल. लाभार्थ्यांना स्वतःचा आरोग्यविषयक इतिहास (PHR) सेट करता येणार आहे. स्वतःच्या इच्छेने हे रेकॉर्ड शेअर करण्याची त्यांना मुभा असेल.
PHR हे स्वघोषित युजरनेम असेल. लाभार्थ्याला health Information exchange and consent manager (HIE-CM) येथे साइन करावे लागेल. प्रत्येक हेल्थ आयडी हा कन्सेंट(परवानगी) मॅनेजरसोबत जोडलेला हवा जेणेकरून हेल्थ रेकॉर्डसचा डाटा शेअरिंगसाठी एनेबल करता येईल. HIE-CM हे ॲप्लिकेशन वापरकर्त्याचे पर्सनल हेल्थ रेकॉर्ड लिंक आणि शेअर करण्यात भूमिका बजावेल. या ॲप्लिकेशनवर हेल्थ आयडीद्वारे साइन-अप करता येणार आहे.
सध्या मोबाईल किंवा आधारच्या माध्यमातून हा हेल्थ आयडी तयार करता येणार आहे. पण लवकरच पॅन किंवा ड्रायव्हिंग लायसेन्सच्या माध्यमातूनही आपल्याला आयडी मिळवता येणार आहे. हेल्थ आयडी बनवत असताना तुम्हांला नाव, जन्मतारीख, लिंग, पत्ता, आधार क्रमांक या गोष्टी द्याव्या लागणार आहेत. या ठिकाणी तुम्ही शेअर केलेले तुमचे पर्सनल हेल्थ रेकॉर्ड पूर्णपणे सुरक्षित राहतील असे सांगण्यात आले आहे.
त्याचप्रमाणे जसे तुम्ही तुमचे सोशल मीडिया अकाउंट कधीही तात्पुरते किंवा कायमचे डिलीट करू शकता, तसाच हा आयडीही तुम्हाला डिलीट करता येईल. जर तुम्ही आयडी कायमचा डिलीट केलात तर साहजिक तुमची सर्व माहिती कायमची डिलीट होईल, पण आयडी तात्पुरता डिलीट केला असेल तर डिलीट केलेल्या कालावधीपुरती तुमची माहिती ऍक्सेस होणार नाही.
यातून नेमक्या काय सुविधा आहेत असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर, तुम्ही एखाद्या दवाखान्यात ऍडमिट होताना तसेच डिस्चार्ज होताना तुमचे सर्व डिजिटल हेल्थ रेकॉर्ड तुम्हाला मिळू शकतील. तसेच यात भविष्यात आणखी काही गोष्टींची भर पडणार आहे जसे यात तुम्हाला देशभरातील वेरीफाईड डॉक्टर्सचा ऍक्सेस मिळणार आहे. तसेच जन्मापासून मुलांचे आईवडील त्यांचा आयडी बनवू शकतील. तसेच आपली माहिती कुणाला द्यावी यासाठी नॉमिनी नेमता येणार आहे.
आता तुम्ही म्हणाल हे सर्व तर ठीक आहे. पण हे नेमके का करावे ? यातून फायदा काय होणार? तर समजा तुम्ही आज पुण्यात ऍडमिट आहात आणि तुम्हांला मुंबईला हॉस्पिटलमध्ये शिफ्ट व्हायचे असेल तर सर्व हेल्थ रिपोर्ट्स सोबत वागण्याची गरज नाही. तुमच्या आयडीद्वारे सर्व रिपोर्ट्स मिळवता येतील. तसेच डॉक्टर आणि दवाखान्यांची निवड तुम्ही ऐकीव माहितीवर करत असता, पण या आयडीद्वारे तुम्हांला जवळचे चांगले डॉक्टर आणि दवाखान्यांची माहिती मिळवता येईल. एवढेच नव्हेतर जवळच्या लॅब आणि केमिस्ट पण चांगले कोण हे जाणून घेता येईल.
कल्पना तर चांगली आहे, डिजिटल वावराकडे आपली सुरुवात झाली आहेच, आता अशा सुविधांमुळे गोष्टी अधिकाधिक सुलभ होत जातील असेच एकंदरीत चित्र दिसत आहे.