आणखी एक सहकारी बँक बुडण्याच्या मार्गावर ? PMC बँकेच्या ग्राहकांचे पैसे मिळणार का ?
पंजाब आणि महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह (PMC) बँकेच्या ग्राहकांना आज सकाळीच एक मोठा धक्का बसला. PMC च्या सर्व ग्राहकांना बँकेच्या मॅनेजिंग डायरेक्टरकडून व्हॉट्सअप आणि ‘एसएमएस’द्वारे एक धक्कादायक निरोप मिळाला. मूळ संदेश इंग्रजीत आहे, पण त्याचा मराठीत घोषवारा खाली दिल्याप्रमाणे आहे.
“मी, जॉय थॉमस (मॅनेजिंग डायरेक्टर) अत्यंत खेदाने हे सूचित करत आहे, की PMC बँकेवर RBI ने त्वरित निर्बंध घातले आहेत. सेक्शन-३५A बँक रेग्युलेशन अॅक्टनुसार पुढील ६ महिने हे निर्बंध लागू झाले आहेत. बँकिंग व्यवहारातील अनियमितता या कारणासाठी हे निर्बंध घालण्यात आले आहेत. ही अनियमितता दूर करण्याचे आमचे सर्वतोपरी प्रयत्न चालू आहेत. हा काळ आपल्या सर्वांना अत्यंत वेदनादायक आहे याची आम्हाला कल्पना आहे. क्षमायाचनेचे कोणतेही शब्द आपले दुःखं निवारण करणार नाहीत याची आम्हाला कल्पना आहे. कृपया सहकार्य करा. या संकटातून आम्ही पुन्हा एकदा सशक्त होऊन बाहेर येऊ.”
PMC बँकेचे बहुतेक ग्राहक हे गरीब आणि मध्यमवर्गी असल्यामुळे त्यांना हा मेसेज न कळल्याने त्यांनी बँकेच्या जवळच्या शाखेत धाव घेतल्यावर त्यांना असे कळले की बँकेच्या आर्थिक बेशिस्तीमुळे व्यवहारावर अनेक निर्बंध आले आहेत. परिणामत: ग्राहकाला एका दिवशी १ हजार रुपयापेक्षा जास्त पैसे खात्यातून काढता येणार नाही.
PMC बँकेची ही अवस्था मागच्या ३-४ वर्षात जे सीकेपी को-ऑपरेटिव्ह बँकेच्या ग्राहकांची होती तशीच दिसते आहे. सीकेपी बँक जेव्हा बंद पडली तेव्हा सुरुवात अशाच १ हजार रुपयाच्या नियंत्रणापासून झाली होती. आजच्या तारखेस या घटनेस बरीच वर्षे झाली आहेत, पण बँकेच्या मुदत ठेव आणि आवर्ती ठेव असलेल्या खातेदारांना आजही त्यांचे पैसे मिळालेले नाहीत.
हे असे का होते ?
बऱ्याचशा सहकारी बँकांमध्ये अर्धा एक टक्का व्याज जास्त मिळतो या कारणामुळे सेवानिवृत्त लोक आपली आयुष्यभराची जमापुंजी बँकेकडे ठेवतात. त्यांना रिझर्व बँकेच्या कोणत्याही नियमांची माहिती नसते. सहकारी बँका त्यांच्या निवडून आलेल्या पॅनेल मार्फत कारभार चालवत असतात. कर्ज देताना सर्व प्रथम मर्जीतल्या लोकांना दिले जातात. अनेकवेळा कर्ज देण्याचे नियम पायदळी तुडवले जातात. परिणामतः कर्जाची थकबाकी वाढत जाते. PMC बँकेच्या बाबत RBI ने घेतलेला हा निर्णय बराच लवकर घेतला असावा असे वाटते. कारण, PMC बँकेकडे NPA चे प्रमाण ३ टक्क्याच्या आसपास आहे.
इतर बंकेशी तुलना करता PMC छोटी बँक नाही. या बँकेच्या ७ राज्यांमध्ये एकूण १३७ शाखा आहेत. त्यापैकी सर्वात जास्त मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात ८१ शाखा आहेत.
खातेदारांना पैसे कधी मिळतील ?
हे सांगणे फारच कठीण आहे. कारण, RBI चे निर्बंध येऊन अजून २४ तासही झालेले नाहीत, पण येत्या ६ महिन्यात जर बँक या संकटातून सावरली नाही तर खातेदारांना डिपॉझिट इन्शुरन्सच्या नियमाप्रमाणे जेवढे पैसे मिळतील त्यावर समाधान मानावे लागेल.
एकीकडे RBI वारंवार टीव्हीवर सतर्क राहण्याच्या जाहिराती दाखवत असते, पण स्वतः मात्र सहकारी बँकांच्या गोंधळावर नियंत्रण करण्यास अपयशी ठरलेली आहे.
आपल्याला आठवत असेल तर एप्रिल २० २०१८ मध्ये सिटी को-ऑपरेटिव्ह बँक बुडली तेव्हा या विषयावर विस्तृत माहिती आम्ही तुम्हाल दिली होती.