लोकल ट्रेनने प्रवास करताना काही सेकंदासाठी फॅन आणि लाईट बंद पडतात. जाणून घ्या त्यामागचे कारण...
तुम्ही लोकलने प्रवास करता आहात, प्रचंड गर्दी आहे आणि बाहेरच्या उकाड्याने तुम्ही वैतागला आहात.. अशावेळेस डोक्यावर घरघरणारा पंखा तुमचा आधार असतो. पंखा बंद असेल तर तुम्ही कंगवा वापरून त्याला धक्का स्टार्ट करता. थोडंसं तुम्हाला बरं वाटतं आणि अचानक काही सेकंदांसाठी लाईट आणि पंखे बंद पडतात. तुम्हाला हे असं का घडतं असा प्रश्न पडला असेल तर, आज आम्ही याचं उत्तर घेऊन आलो आहोत.
हे समजावून घेण्यासाठी थोडं विज्ञानाकडे जावं लागेल. पण आमची शाळेत असताना विज्ञानाच्या नावाने बोंब होती. तरीसुद्धा आम्ही शक्य तितक्या साध्या भाषेत सांगायचा प्रयत्न करू. यासाठी सगळ्यात आधी आपण ओव्हरहेड वायरकडे वळूयात. हो, ओव्हरहेड वायर. जी तुटून तुमचा नेहमी तुमचा खोळंबा होतो तीच ती. तर ही ओव्हरहेड वायर आपल्या गाडीला वीज पुरवते. लोकलला लागणारा वीज सप्लाय हा सिंगल फेज २५ KV एसी सप्लाय असतो. पण असा सप्लाय उपलब्ध नसतो. MSEBचे सबस्टेशन हे ३३ केव्हीए किंवा १३२ केव्हीएचे असतात. येथून येणारा सप्लाय हा Tranfsormer वापरून स्टेप डाऊन केला जातो
आता एक सबस्टेशन हे अंदाजे ५० किमीच्या अंतरापर्यंत वीज सप्लाय करू शकते. पण स्टेप डाऊन करताना ट्रान्सफॉर्मरला विजेचा एकच सप्लाय असणे गरजेचे असते. जेथे हे अंतर संपते, तिथला साधारणत: १०० मीटरचा भाग हा विना विजेच्या पुरवठ्याचा ठेवण्यात येतो. यालाच न्यूट्रल झोन असे म्हणतात. या न्यूट्रल झोनमध्ये गाडी स्वत:च्या वेगावर चालते आणि विजेचा पुरवठा वापरत नाही. या भागात गाडीला ओव्हरहेड वायरशी जोडणारा पेंटोग्राफसुद्धा खाली करण्यात येतो. या न्यूट्रल झोनची रचना अशी केली असते, की गाडी आपल्या वेगाने सहज दुसऱ्या सबस्टेशनच्या भागात जाऊ शकते. आता या भागात पेंटोग्राफ खाली करण्यात आल्यामुळं गाडीला विजेचा पुरवठा नसतो. म्हणूनच गाडीतले पंखे लाईट बंद पडतात
तर आहे ना गंमत, तर नेक्स्ट टाइम आपल्या मित्रमैत्रिणींना हे उत्तर सांगून शाईन मारून घ्या..