जगातील सर्वात महाग मसाला आहे शुध्द व्हॅनिला... पण का? जाणून घ्या...
मंडळी व्हॅनिला (Vanilla) फ्लेवर कोणाला नाही आवडत? अगदी दही, आईस्क्रीम आणि बिस्कीटांपासून ते परफ्यूम्स, बॉडीलोशन्स आणि साबणांपर्यंत, अनेक उत्पादनांमध्ये व्हॅनिलाचा स्वाद आणि सुगंध वापरला जातो. या व्हॅनिला फ्लेवरची लोकप्रियता आता वेगळी समजून सांगायला नको, पण तुम्हाला माहीतीये? केसरानंतर जगात सर्वात महाग मसाला कोणता असेल तर तो हा नैसर्गिक व्हॅनिला आहे. आज रोजी एक किलोग्रॅम शुध्द व्हॅनिलाची घाऊक किंमत ३५,००० ते ४०,००० रूपयांपर्यंत आहे!! या व्हॅनिलाला इतकी मोठी किंमत मिळण्यामागेही काही कारणं आहेत...
(स्त्रोत)
काही उत्पादनांमध्ये वापरला जाणारा व्हॅनिला हा कृत्रिम व्हॅनिला असतो. जो लाकडाच्या लगद्यावर विशिष्ट प्रक्रिया करून मिळवला जातो. हा कृत्रिम व्हॅनिला स्वस्त मिळतो. याउलट नैसर्गिक व्हॅनिला मिळवण्यासाठी खुपच परिश्रम घ्यावे लागतात. म्हणूनच तो अत्यंत महाग असतो.
नैसर्गिक व्हॅनिला मिळवला जातो तो 'अॉर्किड' जातीच्या व्हॅनिला वनस्पतींपासून. खुल्या किंवा ग्रिनहाऊस पध्दतीने याची शेती केली जाते. झाडाच्या खोडांवर चढत जाणारी लांब पाणांची, मांस देठाची ही वेल असते. या वेलीला व्हॅनीलाची फुलं येतात. पण या फुलांना कोणताही सुगंध नसतो बरं का! या फुलांपासून ज्या शेंगा बनतात, त्यांचा हा सुगंध येतो. या शेंगा सुर्यप्रकाशात वाळल्यानंतर हा सुगंध आणखी वाढतो.
(स्त्रोत)
आपण विज्ञानात शिकल्याप्रमाणे फुलांपासून फळ बनण्यासाठी 'परागीभवन' नावाची क्रिया होणं गरजेचं असतं. परागीभवनात फुलातील परागकण किटकांच्या, मधमाशांच्या पायाला चिकटून किंवा वार्याने उडून स्त्रीकेसराशी जाऊन मिळतात. आणि त्यानंतर फुलाचं फळात रूपांतर होतं. पण इथे सर्वात मोठा अडथळा हा की व्हॅनिलाच्या फुलांमध्ये परागीभवनाची नैसर्गिक क्रिया खुपच कमी प्रमाणात होते. त्यामुळे शेतकरी स्वतःच लाकडाच्या तुकड्याने फुलातील परागकणांना काळजीपूर्वक स्त्रिकेसरात दाबून परागीभवनाची क्रिया घडवतात आणि या व्हॅनिलाच्या शेंगा मिळवतात. हाताने परागीभवन घडवून आणण्याची ही पध्दत १८४१ मध्ये एडमंड एल्बीयस नावाच्या एका गुलामाने शोधून काढली होती. हीच पध्दत वापरून आज जगभर प्रचंड प्रमाणात व्हॅनिलाचं उत्पादन घेतलं जातं.
(स्त्रोत)
व्हॅनिलाची ही शेंग वेगाने वाढत असली तरी ती पिकल्याशिवाय तोडली जात नाही. आणि ती पिकण्यासाठी १० महिन्यांचा कालावधी लागतो! त्याचबरोबर पिकलेली शेंग फाटण्याचा धोका असल्यामुळे या शेंगा हातानेच काळजीपूर्वक तोडाव्या लागतात. शेंगेची कींमत ही तीच्या लांबीवरच ठरत असते. शेंग जितकी लांब, तीची गुणवत्ता तितकीच जास्त.
शेंगाच्या आत बियांवर हे सुंगधी आवरण असते. (स्त्रोत)
शेंगांच्या तोडणीनंतर त्यांना वाळवणं, सुगंध वाढण्यासाठी उबवणं, हवाबंद डब्यात ठेवणं, अशा एक ना अनेक प्रक्रिया केल्या जातात. या सगळ्यासाठी १-२ महिन्यांचा कालावधी लागतो. आणि त्यानंतर ही शेंग बाजारात येते.
व्हॅनिलाच्या लागवडीपासून त्याला बाजारात आणण्यासाठी लागणारा हा दिर्घ काळ, आणि उत्पादन घेण्यासाठी करावे लागणारे अथक श्रम, या कारणांनीच व्हॅनिला अत्यंत महाग आहे. जगात व्हॅनिलाचं उत्पादन घेणारे प्रमुख देश आहेत मादागास्कर, इंडोनेशिया, मेक्सिको, आणि कोमोरो. याशिवाय भारतात कर्नाटक आणि तामिळनाडूमध्येही व्हॅनिलाची शेती केली जाते.