कसोटी सामन्यात भारतासाठी १०,००० धावा करणारा 'लिटिल मास्टर' कधी प्रशिक्षक का झाला नाही?
भारतीय क्रिकेटने गेल्या अनेक वर्षांमध्ये अनेक बदल अनुभवले आहेत. आजच्या घडीला भारताचा संघ हा जागतिक स्तरावर अतिशय सक्षम संघ म्हणून ओळखला जातो. या सर्व प्रवासात अनेक खेळाडूंचे मोठे योगदान आहे. त्याचबरोबर भारतीय संघाच्या प्रशिक्षकांचे योगदान देखील मान्य करावे लागेल. अनेक महत्त्वाच्या खेळाडूंनी आधी खेळाडू म्हणून आणि नंतर प्रशिक्षक म्हणून भारतीय क्रिकेटसाठी काम केले आहे. सध्याचा भारतीय संघाचा प्रशिक्षक रवी शास्त्री पण कधीकाळी भारतीय संघासाठी खेळत असे.
पण भारतीय क्रिकेटचा पहिला सुपरस्टार ज्यांना म्हटले जाते ते लिटिल मास्टर सुनील गावस्कर आजवर कधीही भारताचे प्रशिक्षक झाले नाहीत. सुनील गावस्कर यांच्या नावावर कित्येक विक्रम नोंदवले गेले होते. भारतासाठी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात आधी १० हजार धावा पूर्ण करण्याचा मान त्यांच्या नावावर नोंदवलेला आहे. जगभरच्या अनेक दिग्गज बॉलर्सना घाम फोडण्याचं काम त्यांनी केलं आहे. एवढा दांडगा अनुभव त्यांच्या पाठिशी असताना या अनुभवाचा मोठा उपयोग भारताला होऊ शकला असता, पण तरी देखील गावस्कर यांनी आजवर प्रशिक्षक होणं टाळलं. आता यामागे काय कारण असेल याची उत्सुकता क्रिकेटप्रेमींना नेहमीच लागून राहिलेली असते. पण या विषयावर स्वतः लिटिल मास्टर गावस्कर यांनी महत्त्वाचा खुलासा केला आहे.
सुनील गावस्कर यांनी द ऍनालिस्ट या युट्युब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत या रहस्याचा उलगडा केला. गावस्कर सांगतात, 'प्रशिक्षक होण्यासाठी तुम्हाला संपूर्ण सामन्यातील एकेक बॉलचे निरीक्षण करावे लागते. एवढा संयम माझ्यात नाही. मी कुठलाही सामना हा तुकड्या तुकड्यांमध्ये बघत असतो. जेव्हा मी स्वतः खेळत होतो, तेव्हा देखील आऊट झाल्यावर मी जास्त काळ सामन्याचे निरीक्षण करत नसे. त्याऐवजी वाचन करणे किंवा पत्रांना उत्तरे देणे असे काम मी करत असे. माधव मंत्री आणि गुंडापा विश्वनाथ यांच्या सारखे एकेक बॉल्स बघून सामना संपविण्याएवढा संयम माझ्यात नाही.'
तर हे कारण आहे ज्यामुळे भारताचा हा महान खेळाडू प्रशिक्षकपदापासून चार हात लांब असतो. प्रशिक्षक नसले तरी गावस्कर भारतीय खेळाडूंना वेळोवेळी क्रिकेटसाठी महत्वाचे टिप्स देत असतात. सचिन, गांगुली, द्रविड, सेहवाग यांच्यासारखे दिग्गज नेहमी गावस्कर यांच्याकडून सल्ला घेत असत. गावस्कर यांनी खेळाडू म्हणून दिलेले योगदान हे प्रचंड मोठे आहे तसेच निवृत्तीनंतर देखील ते या ना त्या मार्गाने क्रिकेटशी संलग्न आहेत, हे पण महत्वाचे आहे. प्रशिक्षक न होणे हा त्यांचा स्वतःचा निर्णय असल्याने या त्यांच्या निर्णयाचा देखील सन्मान व्हायला हवा.