त्रिस्ता द कुन्हा: मधोमध ज्वालामुखी असूनही खऱ्या अर्थाने निवांत आणि शांत असलेलं अनोखं बेट!!
आजूबाजूची वर्दळ, गाड्यांचे आणि हॉर्नचे आवाज, मोबाईलवर पिंग होणारे मेसेजेस, हॉटेल, रेस्टॉरंटची चंगळ, मॉलची बिलाची यादी हे सगळं सोडून शांत, सुंदर, साध्या ठिकाणी निवांत राहायला जायचं आहे, पण अशी ठिकाणे आता उरलेतच कुठे? इतका निवांतपणा मिळवण्यासाठी कदाचित ध्रुवावरच जावे लागेल, असा जर विचार तुम्ही करत असाल तर थांबा. आधी हा लेख वाचा. कारण असे एक ठिकाण आहे जिथे तुम्हाला हा मनाजोगता निवांतपणा अनुभवता येईल. तुम्ही त्रिस्ता दा कुन्हा हे नाव कधी ऐकलंय? नाही ना? हेच ते ठिकाण आहे जिथे तुम्ही मनाजोगता निवांतपणा अनुभवू शकता. कुठे आहे हे त्रिस्ता द कुन्हा? तिथे जायचं कसं? आणि तिथे आहे तरी काय? हे सगळे प्रश्न तुम्हाला पडले असतीलच. तर वेळ न दवडता वाचा ‘त्रिस्ता दा कुन्हा’ या सुदंर बेटाविषयी.
यापूर्वीही तुम्ही अनेक सुंदर बेटे पाहिली असतील. जिथे निवांतपणे समुद्राच्या पाण्यात पोहण्याचा आनंद लुटता येतो. समुद्रातील साहसी खेळ खेळता येतात. आजूबाजूला असलेल्या मोठ्या प्रशस्त हॉटेलातील चमचमीत मेजवानीवर ताव मारता येतो. पण या सर्वांपेक्षा हे त्रिस्ता दा कुन्हा बेट अगदीच निराळे आहे. कारण, इथे असली काहीच मौजमजा करता येत नाही. इथे महागडी रेस्टॉरंट्स नाहीत की हॉटेल्स नाहीत. क्रेडिट कार्ड स्वीकारण्याची सोय नाही. समुद्रातील पाण्यात डुंबून राहण्याची मजा घेता येईल अशी सुरक्षित समुद्र किनारे नाहीत. उलट इथे दर महिन्यातील पंधरा ते वीस दिवस तुफान पाऊस कोसळत असतो. या बेटाच्या बरोबर मध्ये एक जिवंत ज्वालामुखी आहे. इतर बेटांप्रमाणे कुठल्याही सुखसोयी इथे नाहीत. मग आहे काय? तर फक्त निवांतपणा, शांतता आणि निसर्गाच्या अद्भूत किमयेची अनुभूती.
दक्षिण अटलांटिक समुद्रातील हे बेट म्हणजे ब्रिटनचाच एक भाग आहे. या बेटाचे वैशिष्ट्य हेच की, हा भाग उर्वरित जगापासून काहीसा तुटलेला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या केप टाऊन शहरापासून १,७४३ मैल अंतरावर वसलेले हे बेट फक्त आठ मैल विस्तारलेले आहे.
इथे जाण्यासाठी बस तर सोडाच, विमानाचीही सोय नाही. कारण या बेटावर विमानतळच नाही. इथे पोहोचण्यासाठी केप टाऊनपासून जहाजाने प्रवास करावा लागतो. तोही सात दिवसांचा. वाटेत वादळ आले किंवा हवामानात काही बिघाड झाला तर प्रवासाचा हा कालावधी आणखी लांबला जाऊ शकतो. प्रवासाचे अंतर पाहता हा प्रवास तसा धोकादायकच.
१९ व्या शतकाच्या सुरुवातीला इथे मानवी वस्ती निर्माण झाली. आज या बेटावरची लोकसंख्या आहे फक्त २६९! या बेटावर सध्या सत्तर कुटुंबे राहत आहेत. हे सगळे लोक फक्त शेतीवरच आपला उदरनिर्वाह करतात. शेती व्यतिरिक्त हस्तकलेच्या वस्तू बनवणे हाही त्यांचा एक उद्योग आहे. या वस्तूंची ते ऑनलाईन विक्रीही करतात. इथे वीज तयार होत नाही. इथे जनरेटरच्या सहाय्याने वीज पुरवठा केला जातो.
बेटावर प्रवेश करताच तुम्हाला एक अरुंद रस्ता दिसेल, रस्त्याच्या एका बाजूला बंगल्याप्रमाणे बांधलेले कॉटेजेस आणि दुसऱ्या बाजूला बटाट्याची शेती, कुरणात चरणारी जनावरे दिसतील. या बेटावर असलेला एक ज्वालामुखी हे इथले खास आकर्षण म्हणता येईल. या ज्वालामुखीचा कधी उद्रेक होईल सांगता येत नाही, ही एक गोष्ट सोडली तर इथल्या लोकांना कसलीच चिंता भेडसावत नाही.
पूर्वी १९६१साली हा ज्वालामुखी फुटला होता, भूकंप झाल्याने इथली जमीन खचली आणि ज्वालामुखी उफाळून वर आला. सुरक्षेसाठी सर्व लोकांना बोटीवरून केप टाऊन शहरात स्थलांतरित करण्यात आले होते. निसर्गाच्या कुशीत आणि निवांत राहण्याची सवय असणाऱ्या, शहरी वर्दळ आणि शहरी जीवन माहीत नसलेल्या इथल्या लोकांना केप टाऊनच्या वातावरणाशी जुळवून घेणे खूपच अवघड गेले. नंतर दोन वर्षांनी जेव्हा इथला ज्वालामुखी शांत झाला तेव्हा पुन्हा हे लोक इथे राहायला आले. कुठलीही भौतिक सुखसुविधा नसली तरी इथल्या लोकांना आपले बेट सोडून जावेसे वाटत नाही.
रोजच्या गरजेच्या आणि दैनंदिन जीवनासाठी आवश्यक असणाऱ्या वस्तूही इथे महिन्यातून एकदाच मिळतात. तेही माल वाहून आणणारे जहाज वेळेत बंदरावर पोहोचले तर. इथे एक साधासा दवाखाना आहे, जिथे फक्त मुलभूत आरोग्य सुविधा मिळू शकतात. बाकी काही गंभीर कारण असलेच तर रुग्णाला इथून बोटीने केप टाऊन किंवा ब्रिटनला न्यावे लागते. तसे इथल्या दवाखान्यात एक्स रे मशीन, सुसज्ज प्रसूती गृह, ऑपरेशन थियेटर, अतिदक्षता विभाग, दातांचे उपचार अशा सुविधा उपलब्ध आहेत.
इथल्या स्त्रिया विशिष्ट प्रकारचे सॉक्स विणतात. इथले पारंपरिक लव्ह सॉक्स खूपच प्रसिद्ध आहेत. यामध्येही फ्रेंड्स फॉरेव्हर, हेड ओव्हर हिल्स इन लव्ह असे काही मजेदार प्रकार आहेत. सॉक्सच्या आकारावरून त्याचा प्रकार ठरतो. इथले दैनंदिन जीवन निवांत आणि धकाधकीपासून मुक्त असले तरी, नियोजन आणि संयामाची कसोटी पाहणारे आहे, हे मात्र नक्की.
तुमच्यात जर संयम असेल तर नक्कीच ‘त्रिस्ता दा कुन्हा’ची ट्रीप तुम्ही एन्जॉय कराल. डिसेंबर ते एप्रिलच्या दरम्यान इथे प्रवासी वाहतूक सुरु असते. इथे जाण्यासाठी तुम्हाला व्हिजाची आवश्यकता नाही. फक्त आइसलँड ऑफिसरची परवानगी घ्यावी लागेल.
ज्यांना खरेच धकाधकीपासून मुक्त, शांत वातावरणात काही दिवस घालवण्याची इच्छा आहे, त्यांनी पुढच्या वेळी सुट्ट्यांचे नियोजन करताना त्रिस्ता दा कुन्हाचा विचार करायला हरकत नाही. काय मग आवडेल का तुम्हाला अशा दुर्गम बेटावर जायला?
लेखिका: मेघश्री श्रेष्ठी